कोरोनामुळे 15 लाख बालके अनाथ

    दिनांक :21-Jul-2021
|
वॉशिंग्टन,
कोरोना महामारीने आतापर्यंत लाखो लोकांचा जीव घेतला त्यामुळे लाखो मुले या काळात अनाथ झाली आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत जगभरातील तब्बल 15 लाख बालकांनी आपले आई-वडील अथवा यापैकी कुण्या एकाला गमावले आहे. एका नव्या अध्ययनातून हे दृष्य समोर आले आहे. या रिपोर्टनुसार, ज्यांनी कोरोना काळात आपले आई, वडील, आजी, आजोबा यांपैकी कुणालातरी गमावले आहे. अश्यांपैकी एक लाख 90 हजार बालके एकट्या भारतातील आहेत. 
 
balake _1  H x
 
या अध्ययनात सांगण्यात आले आहे की, कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या 14 महिन्यांत 10 लाखहून अधिक बालकांनी आपले आई-वडील दोघेही अथवा यांपैकी कुण्या एकाला गमावले आहे. तर इतरांनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या आजी-आजोबांना गमावले आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतात मार्च 2021 ते एप्रिल 2021दरम्यान अनाथालयांतील मुलांचे प्रमाण 8.5 पट वाढले आहे. या काळात येथील अनाथ मुलांची संख्या 5,091 वरून 43,139 वर पोहोचली आहे.
 
ज्या मुलांनी आई वडील अथवा पालकांना गमावले आहे, त्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर खोलवर अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी, आजार, शारीरिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि किशोरवयीन गर्भधारणेच्या जोखमेबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन कोविड-19 रिस्पांस टीमने म्हटले आहे, की गेल्या 30 एप्रिल, 2021पर्यंत कोरोनामुळे जगभरात 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे 15 लाख मुले अनाथ झाली आहेत, असे आमच्या संशोधनात समोर आले आहे.