बँकांमधील बदलांच्या निमित्ताने...

    दिनांक :21-Jul-2021
|
इतस्तत:
दत्तात्रेय आंबुलकर 
आज जागतिक स्तरावर बँक आणि वित्तीय सेवाक्षेत्रात विकसित व अद्ययावत तंत्रज्ञान आणि संगणकीय पद्धतीवर आधारित कार्यप्रणालीत संबंधित बँकांचा व्यवसाय व ग्राहकांच्या सेवाविषयक अपेक्षानुरूप सुधारणा करण्यात येत आहेत. बँकिंगमध्ये बदलत्या काळाच्या गरजांनुरूप होणार्‍या बदलांचा प्रभाव आणि परिणाम सर्वदूर दिसून येत आहे.
 
blog_1  H x W:
 
वेळोवेळी असणारी आर्थिक-व्यावसायिक स्थिती व ग्राहकांच्या तत्कालीन व बदलत्या गरजा यानुरूप विविध बँका व वित्तीय संस्था आपापल्या कार्यपद्धती व कार्यप्रणालीमध्ये बदल करीत असतात. हे आणि अशाप्रकारचे बदल बँक आणि ग्राहक या उभयतांसाठी फायदेशीर ठरतात. या संदर्भात अगदी ताजे व लक्षणीय उदाहरण म्हणजे कोरोना काळात काही बँकांनी तर कोविड नावासह नव्याने सुरू केलेल्या काही आर्थिक योजना व त्यांना मिळालेला प्रतिसाद. अशाप्रकारे बँकिंग योजनांतर्गत विविध आधुनिक व प्रगत तंत्रज्ञान आणि काळानुरूप कार्यपद्धतीद्वारा आपल्या कामकाजांमध्ये बदल करून विविध प्रकारच्या बदलांच्या माध्यमातून ग्राहक सेवेद्वारा बँकांनी जी व्यावसायिक प्रगती साधली ती म्हणूनच लक्षणीय ठरते. कर्मचारी आणि कामकाज या दोन्हींमध्ये उचित व व्यावसायिक समन्वय साधण्यासाठी व त्याला ग्राहकसेवेची जोड देण्यासाठी बँकांमध्ये जे कल्पक व्यावसायिक उपक्रम राबविले जातात, त्याचा गोषवारा यानिमित्ताने लक्षणीय ठरतो.
 
 
अ‍ॅक्सिस बँकेत चेक तपासणी प्रक्रिया अधिक अचूक व शास्त्रशुद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अशा या धनादेश तपासणी पद्धतीमुळे संपूर्णपणे सुरक्षित चेक व्यवहार पद्धती बँकेत उपलब्ध झाली आहे. बँकेद्वारा विकसित करून अंमलात आणलेल्या या पद्धतीमुळे कुणी चेकमध्ये फेरफार करून चेकचा दुरुपयोग वा ग्राहक आणि बँकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास बरेचदा कर्मचार्‍यांच्या नजरेस न पडणारा फसवणूक प्रकार आता वेळेत लक्षात येऊन, त्याद्वारे होणारे गैरप्रकार निश्चितपणे नियंत्रित झाले आहेत.
 
 
यासाठी अ‍ॅक्सिस बँकेने विशेष संगणकीय पद्धतीवर आधारित रोबोट तंत्र विकसित केले असून त्याद्वारा आयसीआयसीआय बँकेने चीफ डिजिटल ऑफिसर एम. बालकृष्णन यांनी नमूद केले आहे. बँकिंग व्यवहारांमध्ये प्रस्थापित संगणकीय व्यवहार प्रणालीला आता अधिकाधिक कार्यक्षम व ग्राहकप्रवण करण्यासाठी या संगणकीय कार्यप्रणालीला विविध प्रादेशिक भाषांची व्यावहारिक जोड देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये संगणकीय संवाद-व्यवहार करणे सहज शक्य झाले आहे. याशिवाय हे करण्यासाठी नेहमी वापरल्या जाणार्‍या संवाद संकेतांचा उपयोग करणे उपयुक्त ठरले आहे.
या संदर्भातील एक अन्य उल्लेखनीय उपक्रम म्हणून एचडीएफसी बँकेच्या ईवा या संगणकीय कार्यप्रणालीचा उल्लेख करावा लागेल. या पद्धतीमध्ये बँकेचे ग्राहक, गुंतवणूकदार, व्यवसायी व सर्वसामान्य नागरिकांशी निगडित अशा नेहमी विचारल्या जाणार्‍या व बँकेच्या व्यवसाय-व्यवहारांशी निगडित सुमारे 6,500 विशेष प्रश्नांची उत्तरे देण्याची संगणकीय क्षमता निर्माण करण्यात आल्याने ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होत आहे.
 
 
कोटक महिंद्र बँकेचे उपाध्यक्ष पूनीत कपूर यांच्या मते, अशा संगणकीय बँकिंग कार्यप्रणालीमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानांमुळे बँकेच्या सुमारे 65 टक्के ग्राहकांंना नेमके काय हवे व त्यांची गरज काय आहे, याचे अनुमान सहजगत्या व अचूकपणे लागत असल्याने त्यांचे व्यवहार त्यांच्या गरजा व अपेक्षानुसार पूर्ण होत आहेत.
 
 
सहकारी बँकिंग क्षेत्रात प्राधान्याने प्रगत व अद्ययावत प्रयोग करणार्‍या टीजेएसबी म्हणजेच ठाणे जनता सहकारी बँकेने आपल्या विशेषत: नागरी-शहरी क्षेत्रातील ग्राहकांना उपयुक्त अशा कार्यपद्धतींचा अवलंब केला आहे. आपल्या ग्राहकांना युपीआय देणारी सहकारी क्षेत्रातील टीजेएसबी ही सर्वप्रथम बँक होती. बँकेचे अध्यक्ष विवेक पत्की यांच्या मते, आता मोबाईल असल्यामुळे बँकेच्या रांगेत उभे राहून करावे लागणारे बँकिंग व्यवहार एका क्षणात होत आहेत. टाळेबंदीदरम्यान अशा व्यावहारिक व्यवस्थेचे महत्त्व अधिकच जाणवते.
 
 
बँकिंग क्षेत्रात प्रचलित डिजिटल व्यवहारांच्या विविध पर्यायांमुळे देशात डिजिटल अर्थव्यवस्थेला स्थायी स्वरूप मिळाले असून, डिजिटल अर्थव्यवस्था हे डिजिटल इंडियाचे यश असल्याचे पत्की आवर्जून नमूद करतात. संबंधित ग्राहकाच्या ऐवजी इतरांनी केलेले अथवा संबंधित ग्राहकानेच पण चुकीच्या पद्धतीने चेकवर स्वाक्षरी केल्यास असे प्रकार त्वरित लक्षात येऊन त्यावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य झाले आहे.
 
 
अ‍ॅक्सिस बँकेच्या या नव्या उपक्रमाचे सर्वच स्तरांवर स्वागत केले गेले आहे. बँकेचे उपाध्यक्ष रतन केट्टा यांच्यानुसार बँकेत दररोज चेकद्वारा लाखो व्यवहार होतात. त्यामुळे बँकेच्या या नव्या नियंत्रण पद्धतीचा फायदा बँकेच्या लाखो गरजू ग्राहकांना होत असून त्यांचा चांगला प्रतिसाद पण मिळत आहे.
 
 
भारतीय बँकांची प्रगत कार्यप्रणाली व कार्यपद्धती यामधील एक प्रमुख टप्पा म्हणून आयसीआयसीआय बँकेद्वारा विशेष स्वरूपात विकसित करण्यात आलेल्या कॅथवॉट या प्रगत प्रणाली व तंत्रज्ञानावर आधारित आयपाल या बँकिंग क्षेत्रातील व्यक्तिगत साहाय्यक प्रणालीचा अवलंब आयसीआयसीआय बँकेने 2016 मध्ये विकसित केला. आज या उपयुक्त बँकिंग प्रणालीमुळे दरमहा लाखो ग्राहकांच्या बँकिंगविषयक अडचणींचे निराकरण केले जाते.
 
 
आयसीआयसीआय बँकेच्या आयपालमुळे केवळ ग्राहकांच्या बँकिंगविषयक शंकांचे निरसन करणेच नव्हे, तर त्याशिवाय बिलांची रक्कम भरणे, रकमेचे हस्तांतर करणे, मोबाईलमध्ये रकमेचा पुनर्भरणा करणे, जीएसटीविषयक कामे करणे, बँकेच्या एटीएम व्यवहारांची माहिती घेणे, आंतरबँक व्यवहार, राशी व्यवस्थापन, रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे व नियम इ. अचूक माहिती अल्पवेळात उपलब्ध होत आहे. या नव्या व विकसित पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेतर्फे आयपालच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा बँकेच्या शाखा व ग्राहकांच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात जो आढावा घेण्यात आला, त्यानुसार या बँक प्रणालीचे 90 टक्के आर्थिक बँकिंग व्यवहार अचूकपणे होत असून त्यामुळे त्याचा वाढत्या प्रमाणावर उपयोग करण्याकडे बँक कर्मचारी व ग्राहकांचा भर दिसून येतो.
 
 
याच्याच जोडीला आयपाल प्रणाली काही कारणांनी काम करेनाशी झाल्यास आयसीआयसीआय बँकेने अशा कालावधीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून अशा कालावधीदरम्यान आपल्या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून पर्यायी ग्राहक संपर्क-सेेवेचे पाठबळ दिल्याने तर या कार्यपद्धतीची उपयुक्तता व व्यवहार्यता अधिकच वाढल्याने आपल्या अशाच पुढाकारातून सुवर्णमहोत्सवी टीजेएसबीने सोसायटी अ‍ॅपची मोठीच सोय केली आहे.
 
 
बँकेच्या सोसायटी अ‍ॅपमध्ये शहरी व महानगरांतील सहकारी रहिवासी सोसायट्यांचे दैनंदिन व्यवहार व विशेष गरजा आणि बाबी यांचा नेमका समन्वय साधण्यात आल्याने ही संगणक प्रणाली निवासी सोसायट्या व त्यांचे रहिवासी सदस्यांसाठी सारख्याच प्रमाणात उपयुक्त ठरली.
 
 
तसे पाहता जागतिक स्तरावरच बँक आणि वित्तीय सेवाक्षेत्रात विकसित व अद्ययावत तंत्रज्ञान आणि संगणकीय पद्धतीवर आधारित कार्यप्रणालीत संबंधित बँकांचा व्यवसाय व ग्राहकांच्या सेवाविषयक अपेक्षानुरूप सुधारणा करण्यात येत आहेत. बँकिंगमध्ये बदलत्या काळाच्या गरजांनुरूप होणार्‍या बदलांचा प्रभाव आणि परिणाम आता सर्वदूर दिसून येत आहे. बँकांमधील या बदलांच्या पृष्ठभूमीवर देशांतर्गत व्यापारी-खाजगी बँकांच नव्हे, तर नागरी सहकारी बँका पण यासंदर्भात नवीन व अद्ययावत अशा संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे केवळ प्रयोगच करीत नसून, त्यामध्ये आपापल्या ग्राहकांच्या व व्यावसायिक गरजांनुरूप पुढाकार घेत आहेत, ही बाब समाधानकारक आहे.
- 9822847886