शेतकर्‍यांचे आंदोलन आता जंतरमंतरवर

    दिनांक :21-Jul-2021
|
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
दिल्लीच्या तीन सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता राजधानीतील जंतरमंतर परिसरात होणार आहे. उद्या, 22 जुलैपासून जंतरमंतरवर 200 शेतकरी दररोज धरणे आंदोलनासोबत किसान संसदेचेही आयोजन करतील.
 
natr_1  H x W:
 
संयुक्त किसान मोर्चाने 22 जुलैपासून संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांवरील ताण वाढला होता. संसद घेराव आंदोलनापासून संयुक्त किसान मोर्चाला परावृत्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यासंदर्भात आंदोलक शेतकरी आणि पोलिस यांच्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या. आंदोलनाच्या आपल्या भूमिकेवर शेतकरी ठाम होते.
 
 
शेवटी आज झालेल्या बैठकीत शेतकरी आंदोलनातील निवडक दोनशे प्रतिनिधींना जंतरमंतर परिसरात आंदोलन करण्याची तसेच किसान संसदेचे आयोजन करण्याची परवानगी पोलिसांनी दिली. आंदोलनस्थळावरून पोलिस रोज 200 शेतकर्‍यांना जंतरमंतर परिसरात घेऊन जातील. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात शेतकर्‍यांना जंतरमंतर परिसरात आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर पोलिस बंदोबस्तात या शेतकर्‍यांना त्यांच्या मुळ धरणेस्थळी आणण्यात येणार आहे. यामुळे जंतरमंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
 
तिन्ही सीमांवर सुरक्षा वाढवली
शेतकर्‍यांनी दिल्लीत घुसू नये म्हणून पोलिसांनी सीमांवरील तीन ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलन स्थळांवरील सुरक्षा वाढवली आहे. सिंघु सीमेवर अडीच हजार पोलिस आणि निमलष्करी दलाचे तीन हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.