वन्यप्राण्याची शिकार करणारी टोळी गजाआड

    दिनांक :21-Jul-2021
|
वडनेर, 
वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या यवतमाळ जिल्हातील टोळीला वन्यप्राण्यांसह साहित्य पकडून गजाआड केले. ही कारवाई पोहणा वनक्षेत्राचे वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नजीकच्या खेकडी शिवारात सापळा रचून केली. 
 
toliii_1  H x W
 
 
हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, पोहणा वनक्षेत्र परिसरात वन्यप्राण्यांची शिकारी टोळी मागील 4-5 दिवसापासुन वन्यप्राणी ससा, लावा, तीतर, घोरपड, काळविट आदी वन्यप्राण्याचे शिकार करून नेत असल्याची माहिती वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांना मिळाली असता त्यांनी 20 रोजी पहाटे 4 वाजतापासुन मौजा खेकडी येथे सापळा रचुन वनक्षेत्रात शिकारीसाठी गेलेले आरोपींना पकडण्यासाठी बसले. सकाळी 8 वाजताच्या सुमारास दुचाकीवर तीन जण येताना दिसुन आल्याने त्यांना थांबवुन त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे 9 ससे, 1 तीतर व 1 लाव्हा तसेच शिकारीसाठी उपयोगात येणारे साहित्य आढळुन आले. त्यांना विचारपूस केले असता त्यांनी वन्यप्राणी मौजा मांढरी ता. वरोरा जि.चंद्रपुर येथुन पकडुन आणल्याचे कबुल केले.
 
 
 
त्यानंतर वनरक्षक सज्जन यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. घटनास्थळावर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अजय काळे (27), निळकंठ पवार (28), दोघेही रा. गोपालनगर ता. राळेगाव जि. यवतमाळ, अनिल पवार रा. उंबरविहिर ता. राळेगाव जि. यवतमाळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध वन गुन्हा दाखल केले. आरोपीकडुन 9 ससे, 1 तीतर, 1 लाव्हा, दुचाकी, 2 भ्रमणध्वनी, प्राणी पकडण्याचे जाळे आदी साहित्य जप्त केले.
 
 
 
आरोपींना वनपरिक्षेत्र कार्यालयात वन कोठडीत ठेवण्यात आले तर वन्यप्राणी ससे, तीतर व लावा या वन्य प्राण्यांना पीपल फॉर अ‍ॅनिमल, पिपरी (मेघे) वर्धा येथील करूणाश्रमात ठेवण्यात आले असुन सदर वन्यप्राणी आशिष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे चूमच्या देखरेखखाली आहेत. पुढील तपास उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक वनसंरक्षक भीमसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, वनपाल सचिन कापकर हे करीत आहेत.