सरस्वती देवी : वंदना

    दिनांक :21-Jul-2021
|
नारायणी नमोस्तु ते... :
 
- म. रा. जोशी
कृष्णा नदी तीरावर नरसिंहवाडी नावाचे सुप्रसिद्ध क्षेत्र आहे. येथे दत्तात्रेयाच्या पादुका आहेत व जवळच औरवाड-गौरवाड नावांची दोन गावे आहेत. येथे श्री गुरू नरसिंह सरस्वती 12 वर्षे होते. त्यांच्या पूजनाला योगिनी येत. या योगिनीचे मंदिर आजही आहे. येथूनच श्री गुरुमहाराज गाणगापुरी गेले. त्यांच्या गाणगापूर गमनाची वार्ता ऐकून योगिनीदेवी त्यांच्या दर्शनास आल्या व वाडी सोडू नये, अशी प्रार्थना त्यांनी केली. तेव्हा त्यांच्या पूजनासी गुरुमहाराजांनी पादुका दिल्या. या पादुका ‘मनोहर पादुका’ नावाने प्रसिद्ध असून हा सर्व कथाप्रसंग गुरुचरित्रात वर्णन केला आहे. श्री गुरू गाणगापुरी गेल्यापासून दत्तात्रेयाच्या मनोहर पादुकांचे पूजन होऊ लागले.
 
edii_1  H x W:
 
एतद्संबंधी एका ऐतिहासिक घटनेविषयक दोन शब्द लिहिणे आवश्यक आहे. श्रीगुरूचे वाडी क्षेत्री 12 वर्षांचे वास्तव्य झाले त्यावेळी महाराष्ट्रावर बहामनी सुलतानाचे राज्य होते. बहामनीनंतर इ. स. 1535 पासून वाडीचा सर्वच प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीच्या अंमलाखाली आला. या घराण्यात इभ्राहिम आदिलशहा नावाचा सुलतान होऊन गेला. हा सुलतान संगीतप्रेमी होता. तसा उदार व सहिष्णूही असल्याने त्याच्या दरबारात अनेक विद्वान् पंडित होते. अशा प्रकारे साहित्य व संगीताची आवड असलेल्या या सुलतानाच्या मुलीचे डोळे गेले. तत्कालीन पद्धतीप्रमाणे उपचार होऊनही मुलीला आराम पडला नाही. तेव्हा दरबारातील एकाने राजाला वाडी क्षेत्राची हकीकत व माहात्म्य सांगितले; ती हकीकत ऐकून राजाने ब्राह्मणांच्याद्वारा मनोहर पादुकांचे अर्चन व पूजन केले आणि राजाच्या मुलीचे डोळे सुधारले; तिला दृष्टी आली. या निमित्ताने राजाने पादुकास्थानावर लहानसे मंदिर उभारले. त्या मंदिराच्या दोन बाजूच्या भिंतीवर पिंपळाची पाने कोरली. मंदिर लहानसे असून दगडी बांधकामाचे आहे. एवढेच नव्हे, तर पूजेअर्चेसाठी औरवाड-गौरवाडची सनदही दिली. (यामुळे मंदिराला धक्का न लावता गुळवणी महाराजांनी मोठे मंदिर उभारले.) या घटनेपासून सुलतान श्री गुरूचा भक्त झाला व गुरू महाराजांच्या दर्शनासाठी तळमळ करू लागला. तेव्हा गुरू महाराजांनी राजाला स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितले की, मी तुला भेटेन. त्याप्रमाणे राजवाडा व राजवाडा तटाजवळील स्थानावरून गुरुमहाराज सुलतानाला दर्शन देत. आज त्या स्थानादेवाच्या पादुका आहेत व तटाकडे चेहरा ठेवून उभे राहिल्यास राजवाडा दिसतो. हे स्थान आजही विजापूरला आहे आणि कोणीही भक्त तेथे जाऊन पादुकास्थान व राजवाड्याचा तट पाहू शकतो.
 
 
 
 
 या प्रसंगानंतर राजाने ‘सरस्वती’ नावाने एक नाणे कोरले. राजा सरस्वतीचा भक्त होता. विजापूर आदिलशाही इतिहासकारांनी उपरोक्त प्रसंगाची दखल घेतली. सुलतानाच्या सरस्वती भक्तीला श्री गुरूंचे अधिष्ठान आहे. गुरुमहाराजांचे नावच नरसिंह सरस्वती आहे. त्यांच्या गुरूंचे नावही कृष्ण सरस्वती आहे. या नावाकडे वळण्यापूर्वी गुरुचरित्रातील एका प्रसंगाची नोंद घेऊ. अ. 40 मध्ये योगेश्वर नावाच्या शिष्याला श्री गुरूंनी ‘विद्यासरस्वती’ मंत्र दिला.
 
 
म्हणोनि तया द्विजासी। श्री गुरू मंत्र उपदेशी।
विद्या सरस्वती या मंत्रासी। उपदेशिले परियेसा॥
तसेच अ. 39 मध्ये आपले तान्हे बाळ घेऊन दर्शनास आलेल्या स्त्री भक्ताला श्री गुरू म्हणतात-
उठोनि विनंती श्री गुरुमूर्तीशी। पुत्र न होय आमुचे कुशी।
सरस्वती आली घरासी। बोल आपुला सांभाळिजे।
कन्या लक्षण श्री गुरुमूर्ति। निरोपिले होते जेणे रीती।
प्रख्यात जाली नामे सरस्वती। महा आनंद वर्तला॥
 
 
श्री गुरू नरसिंह सरस्वतींच्या आशीर्वादाने मुलीचे नाव सरस्वती ठेवण्यात आले, यात नवल नाही. मुलीप्रमाणे मुलांचे, पुरुषांचेही नामकरण भवानी, सरस्वती झालेले आहे. सिद्धनामधारक नावाने गुरुचरित्र लिहिणार्‍यांचे नाव ‘सरस्वती’ आहे. स्त्रियांची नावे पुरुषही घेतात, असा काही प्रकार आधुनिक समजणार्‍याचा आहे की काय? हा प्रश्न येथे अपेक्षित नसून हिंदू परंपरेत मात्र स्त्री शक्ती देवतांची नावे पुरुषवर्गाने ग्रहण केलेली आहेत. सरस्वती ही विद्यादेवी आहे, अशी हिंदू परंपरा सांगते व देवीच्या नावावरून पुरुषवर्गच नव्हे, तर भूप्रदेशही ओळखण्याची परंपरा आहे. भारत ही मातृभूमी आहे, ही धारणा आपल्याकडे आहे. तेव्हा सरस्वती किंवा शारदा नावाने (शारदाप्रसाद) पुरुष वर्ग ओळखला जात होता व आहे, यात नवल नाही. दक्षिणेत तुंगभद्रा तीरावर शंकराचार्यांचा श्रृंगेरी मठ आहे. या पीठाची देवता कामाक्षा (शारदांक्षा) आहे. आचार्यांनी जे चार मठ स्थापन केले त्यामध्ये पूर्णगिरी देवी (ज्योतिर्मठ), पूर्व दिशा मठ (विमलादेवी), पश्चिम दिशा मठ भद्रकालीदेवी व दक्षिण शारदा कामाक्षा अशी शक्ती देवता आहेत. एवढेच नव्हे, तर शारदा मठातील संन्यासी वर्गांची नावे देवीपर आहेत. विद्यारण्य, विद्याशंकर भारती, नरसिंह सरस्वती ही संन्यासांची नावे देवता शक्तीपर आहेत. विद्याशंकर भारती हे श्रृंगेरी पीठावरील थोर संन्यासी. त्यांच्या नावातील ‘भारती’ पदाने सरस्वतीचाच बोध होतो. सरस्वती ही ज्ञानाची जननी आहे. शारदा नावानेही ती प्रख्यात आहे. स्फूर्ती, प्रेरणा, प्रतिभा, प्रज्ञांचा आविष्कार ज्या देवतेमुळे होतो ती असते सरस्वती देवी.
 
 
व्यक्ती, भूमी, शिक्षण, व्याकरण व साहित्य क्षेत्रांचे भरणपोषण ज्या कोणा एका शक्तीने, देवतेने केले असेल तर ती शक्ती देवता सरस्वती होय. तिचे अर्चन, पूजनच नव्हे, तर उपासना सरस्वती रूपाने पिढ्यानुपिढ्या, शतकानुशतके अव्याहतपणे चालू आहे. दक्षिणेत आजच्या आंध्रप्रदेशात बासरब्रह्मेवरी सरस्वती देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराचा उल्लेख गुरुचरित्रात आलेला आहे. बासरब्रह्मेश्वर स्थान गोदावरी तीरावर आहे. आजही आंध्रप्रदेशातील पालक आपल्या पाल्याला घेऊन प्रथम सरस्वती देवी दर्शनास जातात व सोबत पाटी-पेन्सिल घेऊन बालकाच्या अध्ययनास सुरुवात करतात. सरस्वती ही शारदाच आहे. या शारदेचे मंदिर मध्यप्रदेशात मह्यर कटनीनंतरचे नागपूर-जबलपूर महामार्गावरील स्थान प्रसिद्ध आहे. माळव्याच्या भोजराजाने भव्य सरस्वती मंदिर उभारले होते. येथे कविजन दर्शनासाठी तर विद्वान साहित्यिक व पंडित शास्त्रचर्चा व काव्यचर्चा करीत. मुस्लिम आक्रमकांनी भोजराजाने उभारलेल्या सरस्वती मंदिराचा विध्वंस केला.
 
 
सरस्वती ही विद्या देवता आहे, काव्य देवता आहे. आश्विन महिन्यातील नवरात्र उत्सवात पंचमीला ललिता, षष्ठी सप्तमीला ग्रंथांचे पूजन करून सरस्वतीची आराधना करण्याचा प्रघात आहे. पुढे विजयादशमीचा सीमोल्लंघनाचा उत्सव संपल्यानंतर आश्विन शु. 11 ते आश्विन शुद्ध 15 पर्यंत शारदा उत्सवाला प्रारंभ होते. तंजावरच्या भोसले राजांनी हस्तलिखितांचा प्रचंड संग्रह करून ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयाला ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ नाव आहे व सरस्वतीची वीणाधारी मूर्ती व भव्य छायाचित्र आहे. तसेच भोसले राजांनी शारदा उत्सवाला प्रारंभ केला. तंजावर सरस्वती ग्रंथालय रूपाने विद्या सरस्वती अध्ययनास अभ्यासक व संशोधक प्रारंभ करतो. अशीच अनेक उदाहरणे देता येतील.
 
 
सरस्वती वंदनाने काव्याला प्रारंभ, साहित्य निर्मितीस सुरुवात होते व स्फूर्ती, प्रज्ञादेवतेची अर्चना व उपासनेचा मार्ग होतो. सरस्वती देवीचे रूप सौम्य, निष्कलंक असल्याने शुभ्र वस्त्र धारण केले आहे. वीणेच्या झणत्काराने काव्याची मधुरता प्रत्ययास येते व आपले जाड्य, आपला आळस दूर करून साधकाला टवटवीत करते.
 
 
सरस्वती व सरस्वती अर्चना व पूजन हा वैदिक परंपरेचा अभिनव विलास आहे. काव्याची शोभा आणि सौंदर्य सरस्वती कृपेने चंद्रकिरणाप्रमाणे आल्हाद व प्रसन्नता देते. सरस्वतीचे रूप शांत, योगगम्य व समाधिस्थ पार्तचे असून अलौकिक अनुभूती व दर्शक आहे. सरस्वती कलाधारिणी आहे. चंद्राच्या आल्हादजनक कला पौर्णिमेत समाप्ती होईपर्यंतच प्रत्ययास येतात. तसे सरस्वती कलाचे नाही. योगिनी ज्याप्रमाणे नित्य भवानीसह असतात त्याप्रमाणे आपल्या अमृतकलासह देदीप्यमान, तेजस्वी भगवती वीणा झणत्कारासह वेदमय परावाचीची आहे. येथे वीणा केवळ वाद्य नाही तर वेदध्वनीचा झंकार, प्रत्ययपूर्वक प्रदान करणारी ही अलौकिक अद्भुत देवता आहे. संगीतात रागप्रधान संगीतात रागाच्या देवता व सरस्वती वीणेच्या झंकाराची प्रचिती काव्याच्या सीमा ओलांडून जेव्हा गीतामध्ये ध्वनिरूपाने प्रतीत होऊ लागते व संगीताला चैतन्यमयता आणते तेव्हा नादब्रह्माची प्रतीतीही देते. अशी ही ध्वनिमय विश्वाला गवसणारी देवता आहे. काव्य-नाद-ध्वनीच्या वलयांना मनमोहक सौंदर्याचा उठाव देणारी अद्भुत शक्ती सरस्वती आहे. तिच्या नावातच सरसत्ता आहे.
 
 
सरस्वतीदेवी वाणी- वाचा- ध्वनी रूपाने आकारीत होऊन नादब्रह्मात परिणत होते. ही देवी जलरूप आहे. पाण्याला, पावसाला, नदी प्रवाहाला गती आहे व ही गती शक्तिरूप आहे. वेदामध्ये सरस्वतीचे आलेले उल्लेख आजच्या सर्व संशोधकांना सतत आवाहन देत आहे. ज्या वेद साहित्यामध्ये सरस्वतीची वर्णने, उल्लेख, ऋचा आहेत. त्या सर्व सरस्वतीच्या प्राचीनत्वाच्या खुणा आहेत. त्या पाहता सरस्वतीची अमृतजल संपदा वैदिक परंपरेचे टवटवीत रूपदर्शन आहे. सरस्वती आपल्या सांस्कृतिक जीवनाचे नर्तन, नाट्य, संगीत, कला, साहित्य व जीवनमूल्याचे अमर स्पंदन आहे. हाच तिच्या वीणा झंकाराचा मधुर नाद आहे. सरस्वती आमची प्रज्ञा, बुद्धी, प्रतिभेची अखंड मूर्ती आहे. तिचे वंदन ही मातृत्वाची मंगलमय धारणा आहे.
- 9422501194