चीनमध्ये मुसळधार, 12 जणांचा मृत्यू

    दिनांक :21-Jul-2021
|
- रस्त्याला नद्यांचे स्वरूप
- कर्मचार्‍यांचा कार्यालयातच मुक्काम
बीजिंग, 
चीनमधील हेनान प्रांतात मुसळधार पाऊस कोसळत असून, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. सर्वत्र पाणी तुंबल्याने लोकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्व प्रकारची प्रवासी वाहतूकसेवा कोलमडली. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मागील एक हजार वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
 
intre_1  H x W:
 
स्थानिक वृत्तानुसार, हेनान प्रांताची राजधानी झेंगझोऊ येथे मंगळवारी संध्याकाळी 4 ते 5 वाजता दरम्यान सुमारे 201.9 मीमी पाऊस कोसळला. पावसासंबंधी विविध घटनांमध्ये किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास दोन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. कित्येक वाहने रस्त्यांतून वाहून जाताना दिसत असून, मेट्रो स्थानकांमध्ये तलाव तयार झाले आहेत. लोक भुयारी रेल्वेस्थानक आणि शाळांमध्ये अडकले, तर अनेकांना त्यांच्या कार्यालयातच मुक्काम करावा लागला.
 
 
वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा थांबला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर 80 हून अधिक बसगाड्यांचे मार्ग ठप्प झाले. 100 हून अधिक मार्गांवरील बससेवा वळवण्यात आली. भुयारी रेल्वेच्या बोगद्यात पाणी साचल्याने मेट्रो सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. याशिवाय 260 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बचावकार्यासाठी नैसर्गिक आपत्ती निवारण दल, पोलिस आणि अग्निशमन विभाग, स्थानिक प्रशासनाची अनेक पथके निरंतर मदत करीत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, पुढील काही दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.