काश्मीर पुन्हा नंदनवन म्हणून ओळखले जाईल

    दिनांक :21-Jul-2021
|
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
काश्मीरची वाटचाल स्थैर्य व शांतीकडे सुरू झाली असून, सर्वसामान्य नागरिक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीरचे योगदान अनन्यसाधारण आहे. हा प्रदेश लवकरच आपले गतवैभव प्राप्त करील व पुन्हा देशाचे नंदनवन होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज बुधवारी येथे केले.
 
maha_1  H x W:
 
साहित्य, संस्कृती, भाषा संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करणार्‍या हिंदी काश्मीर संगम संस्थेच्या वतीने आज राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व साहित्यिक व समाजसेवक यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. हिंदी काश्मीर संगम-काश्मीर अनुष्ठानच्या अध्यक्ष तसेच लेखिका व समाजसेविका डॉ. बिना बुदकी यांच्या ‘केसर की क्यारी में आग की लपटे आखिर कब तक’ पुस्तकाचे तसेच ‘कश्मीर संदेश’ या नियतकालिकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल म्हणाले, काश्मीर 700 ते 800 वर्षांपूर्वी भारताचे गौरव समजले जात होते. आता पुन्हा काश्मीरला गतवैभव मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेथील सामान्य नागरिकही शांतता निर्माण होण्यासाठी सकारात्मक आहेत. अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
 
 
काश्मीर ही अभिमन्यू गुप्त, भरतमुनी, कल्हण प्रभृतींची तसेच काश्मिरी शैव तत्त्वज्ञानाची भूमी असून, काश्मीरमध्ये भारतीय नाट्यशास्त्र, काव्य आणि साहित्याला महत्त्वपूर्ण स्थान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 70 वर्षांनंतर काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरू असून, ते लवकरच यशस्वी होतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. काश्मीरमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार होणे ही गौरवास्पद बाब आहे. मात्र, संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
काश्मीरमध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या डॉ. बिना बुदकी यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौरवार्थींनी भविष्यात साहित्य, शिक्षा आणि लोकसेवेचे कार्य अवरित सुरू ठेवावे, अशी अशा राज्यपालांनी व्यक्त केली.