तैवानला मदत केल्यास जपानवर अण्वस्त्र हल्ला

    दिनांक :21-Jul-2021
|
- चित्रफीत जारी करीत दिली धमकी
बीजिंग, 
तैवानला मदत करण्याची चूक केल्यास जपानवर अण्वस्त्र हल्ला केला जाईल, अशी धमकी देणारी चित्रफीत चिनी कम्युनिस्ट पार्टीने (सीपीसी) जारी केला आहे. तैवानच्या प्रश्नावर चीनने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली असली, तरी अशाप्रकारची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी पहिलांदाच दिली आहे.
 
intre_1  H x W:
 
सीपीसीच्या परवानगीने शिगुवा या डिजिटल मंचावर ही चित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे, असे वृत्त एका पाश्चिमात्त्य देशातील वाहिनीने दिले आहे. जपानने तैवानला मदत केल्यास आम्ही आधी अणुबॉम्ब वापरू आणि जपान बिनशर्त आत्मसमर्पण करेपर्यंत अण्वस्त्र हल्ले सुरूच राहतील, असे चीनने म्हटले आहे. 20 लाख लोकांनी शिगुवा मंचावर ही चित्रफीत पाहिली. नंतर ती हटवण्यात आली. परंतु, या चित्रफितीची प्रत यू-ट्यूब आणि ट्विटरवर सामायिक करण्यात आली आहे.
 
 
तैवानच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करू, अशी भूमिका जपानने दोन आठवड्यांपूर्वी घेतल्यानंतर चीनकडून ही धमकी देण्यात आली आहे. जपानचे उपपंतप्रधान तारो असो म्हणाले की, जपानने तैवानचे संरक्षण केले पाहिजे. तैवानमध्ये कोणतीही मोठी घटना घडल्यास जपानच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत जपान आणि अमेरिकेला तैवानच्या संरक्षणासाठी एकत्र काम करावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते.