इसापूर ग्रामसेविकेवर चौकशीची तलवार

    दिनांक :21-Jul-2021
|
- सरपंच आंबटकर यांनी केली होती तक्रार
 
 
देवळी, 
तालुक्यातील इसापूर येथील माजी ग्रापं ग्रामसेविका पूजा आडे यांनी मालमत्ता कराची वसुली बँक खात्यात जमा न करता ग्रापंला अंधारात ठेवल्याचा आणि नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवकाकडे हिशोब न सोपवल्याची तक्रार इसापूर येथील सरपंच प्रणिता आंबटकर यांनी जिप मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत देवळी पंस गटविकास अधिकारी पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनात दोन विस्तार अधिकार्‍यांनी 20 रोजी ग्रापं कार्यालयाला भेट देऊन दस्तऐवजाची चौकशी करून ग्रामसेविकेचे बयान नोंदविले. 
 
esapur_1  H x W
 
 
पूजा आडे यांच्याकडे इसापूर ग्रापंचा 10 जून पर्यंत प्रभार होता. त्यांच्या कार्यकाळातील मार्च ते मे या तीन महिन्यात मालमत्ता करापोटी जवळपास लाखाची रक्कम झाली. ती रक्कम त्यांनी ग्रापंच्या बँक खात्यात जमा करायला पाहिजे होती. परंतु ते जमा न केल्याचे निदर्शनास येताच ग्रापं कार्यालयात हडकंप माजला. ग्रापंच्या खात्यात पैसे नसल्याने पाणीपुरवठा केंद्र आणि ग्रापं कार्यालयाचा वीज पुरवठा बंद झाला.
 
 
10 जून नंतर नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवकाकडे आडे यांनी हिशोबाचे तपशील हस्तांतरित न केल्याचे समजताच सरपंच आंबटकर यांनी जिप मुख्याधिकार्‍याकडे तक्रार केली. ग्रामसेविका आडे यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या की, एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला दोन वेळा कोरोना संसर्ग आणि विषमज्वराचा त्रास झाला. त्यामुळे ग्रापंचा शिपाई हा कर वसुलीचे काम करीत होता असे त्यांनी सांगितले. आडे यांनी कोरोना संसर्ग झाल्यावर रजा अधिकृतपणे न घेतल्याची माहिती पंचायत समिती सूत्राकडून मिळाली आहे.