प्राणवायूच्या कमतरतेमुळे मृत्यू नाही, हा राज्यांचाच दावा

    दिनांक :21-Jul-2021
|
- भाजपाचा जोरदार हल्लाबोल
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
प्राणवायूच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नसल्याच्या केंद्र सरकारच्या दाव्याचा भाजपाने आज बुधवारी पुनरुच्चार केला. यासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेले आरोप खोडून काढताना, प्राणवायूच्या कमतरतेमुळे देशात मृत्यू झाल्याबाबतचा दावा आतापर्यंत एकाही राज्याने केला नाही. त्यांनी न्यायालयांमध्येही तसेच शपथपत्र सादर केले आहे, याकडे भाजपाने लक्ष वेधले.
 
natr_1  H x W:
 
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, केंद्र सरकारच्या निवेदनातील तीन गोष्टी महत्त्वपूर्ण आहे. पहिली म्हणजे आरोग्य हा राज्याच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे, दुसरी, आम्ही फक्त कोरोनाबळींबाबत राज्यांनी पाठवलेली आकडेवारी संग्रहित करतो आणि तिसरी म्हणजे, केंद्राने दिशानिर्देश जारी केले असून, त्यानुसार राज्य आपल्या येथील मृत्यूचे आकडे जाहीर करू शकतात.
 
 
प्राणवायूच्या कमतरतेमुळे राज्यात झालेल्या मृत्यूचा आकडा कोणत्याही राज्याने आतापर्यंत पाठवला नाही, त्याचप्रमाणे आमच्या येथे प्राणवायूच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचेही कोणत्याही राज्याने आतापर्यंत म्हटले नाही. राज्यांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारेच केंद्राने संसदेत निवेदन केले. केंद्र कोणतीच आकडेवारी तयार करत नाही. राज्यांच्या आकडेवारीच्या आधारेच केंद्र सरकारने संसदेत उत्तर दिले. विरोधी पक्ष याप्रकरणी कारण नसताना राजकारण करीत आहेत. विरोधी पक्षांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असल्याचा आरोप पात्रा यांनी केला.
 
खोटे बोलणे राहुल गांधींचा छंदच
कोरोनाची साथ असो की लसीकरण प्रत्येक मुद्यावर खोटे बोलणे, संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे, लोकांची दिशाभूल करणे, हा राहुल गांधीचा छंद आहे, असा टोला पात्रा यांनी लगावला. कोरोना काळातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खोटे बोलत होते. जयपूर गोल्डन रुग्णालयात प्राणवायूच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नाही, असे दिल्ली सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या रुग्णालयात झालेले मृत्यू हे अत्यवस्थतेमुळे झाले, न की प्राणवायूच्या कमतरतेमुळे, असे यात नमूद असल्याकडे पात्रा यांनी लक्ष वेधले.
 
महाराष्ट्र, छत्तीसगडचीही तीच भूमिका
आमच्या राज्यात प्राणवायूच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड सरकारनेही म्हटले आहे. विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांनीही प्राणवायूच्या कमतरतेमुळे आपल्या राज्यात मृत्यू झाल्याचे कधी म्हटले नाही, असे पात्रा यांनी सांगितले.