दोन मात्रा घेतलेल्यांना निर्बंधमुक्त केले पाहिजे

    दिनांक :21-Jul-2021
|
- अजित पवार यांचे मत
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले गेले पाहिजे आणि दोन मात्रा घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी देण्यात आली पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यामुळे आता लसीकरण पूर्ण झालेल्यांना निर्बंधांमधून सूट दिली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
mah_1  H x W: 0
 
राज्यात कोरोनाचा धोका पाहता, लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जावे, अशी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. मात्र बाधितांच्या संख्येत अपेक्षित घट झालेली नाही, सोबतच संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका आहे. गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश आहेत. या पृष्ठभूमीवर निर्बंध कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आता अजित पवारांनी याविषयावर भाष्य केले आहे.
 
पुढचे 120 दिवस महत्त्वाचे
अनेक ठिकाणी लोक मुखाच्छादन न घालता फिरताना दिसत आहेत. अशी बेफिकिरी योग्य नाही. पुढचे 100 ते 120 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका टाळायचा असेल तर, या दिवसांमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले गेले पाहिजे. असेही अजित पवार यावेळी म्हणाले.