अष्टपैलू नेता देवेंद्र फडणवीस

    दिनांक :22-Jul-2021
|
अग्रलेख
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिन. नागपूर नगरीचे सर्वात तरुण महापौर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले पहिले भाजपा नेते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर कमी वयात मुख्यमंत्रिपद सांभाळणारे नेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या नंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण नोंदी फडणवीस यांच्या नावाने आहेत. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून मेयर इन कौन्सिलचा मान प्राप्त करणारेही ते पहिलेच होते. सर्वप्रथम जन्मदिनानिमित्त त्यांना ‘तरुण भारत' व श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेतर्फे हार्दिक शुभेच्छा! 
 
 
devendra_1  H x
 
 
या सर्वांहून महत्त्वाची नोंद आहे ती त्यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला मिळालेल्या दिशेची, त्यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाने प्राप्त केलेल्या मान्यतेची आणि राजकारण-समाजकारणातील त्यांच्या सकारात्मक योगदानाची! जलयुक्त शिवार आणि स्मार्ट महाराष्ट्रसारख्या अनेक योजनांची रुजुवात फडणवीस यांच्या काळात झाली. देवेंद्र सुविद्य आहेत. विधी शाखेचे पदवीधर आहेत. त्यांच्याकडे व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापनातील पदव्याही आहेत. परंतु, या सर्वांहून महत्त्वाचे आहेत ते त्यांचे संस्कार. लोकसेवेचे बाळकडू त्यांना घरातून मिळाले. देवेंद्र यांचे वडील स्व. गंगाधरराव फडणवीस विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित. घरात सतत पै-पाहुण्यांचा राबता. लोकांच्या प्रश्नांवर चर्चा. त्यांच्या सोडवणुकीसाठी करावयाच्या उपायांवर मंथन. अशा घरातून देवेंद्र यांच्यावर समाजकारणाचे संस्कार होत असतानाच, विधी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात त्यांना नागपूर महापालिकेच्या नगरसेवकाची निवडणूक लढण्याची संधी मिळाली. तोवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता युवा मोर्चातील कामांचा अनुभव त्यांना आला होता. आता प्रत्यक्ष राजकारण करायचे होते. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले तेव्हा ते अवघे २२ वर्षांचे होते. पाच वर्षांनी म्हणजे वयाच्या २७ व्या वर्षी त्यांना संधी मिळाली आणि ते नागपूरच्या इतिहासातील सर्वात तरुण महापौर बनले. त्यानंतर त्यांच्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीने जी गती घेतली, तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. १९९९ पासून ते सलग आमदार म्हणून निवडून येत आहेत. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द त्यांना मिळाली. ती त्यांनी गाजवली आणि तिचा वापर लोकाभिमुख पद्धतीने केला. जीवनात आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. अभ्यासू आणि व्यासंगी वृत्ती, झोकून देत काम करण्याचा ध्यास आणि लोकहितासाठी झटण्याच्या तळमळीने त्यांची राजकीय कारकीर्द बहरली आहे. मुख्यमंत्री म्हणून सत्तेत असताना लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देताना विरोधकांना नामोहरम करणारे फडणवीस आणि आता विरोधी पक्ष नेते म्हणून सत्ताधीशांना सळो की पळो करून सोडणारे फडणवीस यांची खरी ताकद त्यांच्या सामाजिक बांधिलकीत आणि समानतेच्या संस्कारात आहे. त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नांवर लढताना किंवा तत्सम समुदायांना न्याय देताना, त्यांच्यासाठी संस्था स्थापन करताना त्यांना कधीही आपपरभावाचा सामना करावा लागला नाही. कुणीही त्यांचा बुद्धिभेद करू शकले नाही. प्रतिमा स्वच्छ असल्यामुळे त्यांच्यातील आक्रमक नेतृत्वाला कधीही माघार घ्यावी लागत नाही. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत अनेकांनी वारंवार प्रयत्न करूनही त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात विरोधकांना यश आले नाही. राजकारण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे, असे मानणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस एक आहेत. त्यामुळे राजकारण हे त्यांच्या दृष्टीने सत्ताकारणाहून लोककारण अधिक आहे. त्याच लोककारणाने त्यांना महाराष्ट्रात आणि देशाच्या पातळीवरदेखील लक्षणीयरीत्या प्रस्थापित केले. नव्या काळातील गरजा ओळखून फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात गुन्हेगारांना शोधण्यासाठी संगणकीकृत ट्रॅकिंग प्रणालीची पायाभरणी केली. त्यांनी आणलेल्या, संकल्पित केलेल्या अशा नावीन्यपूर्ण प्रयोगांची यादी तर फार मोठी होईल.
 
 
 
उत्कृष्ट संसदपटू असणे वेगळे आणि लोकप्रशासनात अशी गती असणे वेगळे! त्यासाठी वेगळी नजर असावी लागते; ती नजर देवेंद्र यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासन गतिमान व लोकाभिमुख केले. उत्कृष्ट संसदपटू ते आहेतच. सत्तेत आणि विरोधात असताना संसदीय आयुधांचा वापर कसा करावा, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिलेला आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हे देवेंद्र यांचे स्वप्न होते. ते आता पूर्णत्वाला येत आहे. हा महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा महाराष्ट्राच्या विकासाला वेगळे वळण लागणार आहे. अशी स्वप्ने पाहायला आणि प्रत्यक्षात आणायलादेखील धाडस लागते. पदांमुळे माणसं मोठी होत नाहीत; कार्यकुशल माणसांमुळे त्यांना मिळालेली पदे मोठी होतात. देवेंद्र यांनी नगरसेवकपद-आमदारकीपासून प्रदेशाध्यक्षपद असो, मुख्यमंत्रिपद असो किंवा विरोधी पक्षनेतेपद असो, प्रत्येक पदाला मोठेपण बहाल केले. ओघवते वक्तृत्व, निर्भय स्वभाव, नावीन्याची व प्रयोगशीलतेची आवड आणि लोककल्याणाच्या ध्यासातून हे राजकीय व्यक्तिमत्त्व घडले, असे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राला एक मातब्बर नेता मिळाला, असे म्हटले पाहिजे. राजकारणात तोंडपाटीलकी करणे आणि टीकाटिप्पणी करणे हे सर्वांत सोपे काम आहे. अनेकांनी ते पूर्णवेळ स्वरूपात स्वीकारलेले आपण सारे रोजच पाहतो. देवेंद्र यांचा पिंड वेगळा आहे. त्यांच्या आक्रमक स्वभावाला विधायकतेचे वळण आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या विविध समित्यांवर काम करताना त्यांची आक्रमकता कमी होते आणि विधायकता वाढते. मात्र, तोडीस तोड उत्तर देताना त्यांची आक्रमकता शिगेला पोहोचते. त्यांच्या व्यासंगामुळे त्यांना केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगाच्या पातळीवर दखलपात्र होता आले.
 
 
ग्लोबल पार्लमेंटेरियन्स फोरम ऑन हॅबिटॅट फॉर एशिया रिजनमधील योगदानासह पर्यावरण शिखर परिषदेतील सहभाग, आपत्ती व्यवस्थापनातील जागतिक परिषदांमध्ये सहभाग अशा अनेक संधी त्यांना मिळाल्या. आशिया व युरोपातील तरुण राजकीय नेत्यांच्या परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. उत्तम वक्ते ते आहेतच. हाच वक्ता विधिमंडळ कामकाजात उत्तम संसदपटू म्हणून नावारूपाला आला. कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनने त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार दिला. याशिवाय, अनेक संस्था-संघटनांनी त्यांना त्यांच्या राजकीय-सामाजिक योगदानाबद्दल सन्मानित केले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून देवेंद्र सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. प्रत्येक सरत्या वर्षागणिक त्यांचे सामाजिक जीवन अधिकाधिक बहरते आहे. संधी अनेकांना मिळतात. पदेही मिळतात. संधीचे सोने करणारे आणि पदांना मोठेपण बहाल करणारे लोक मात्र थोडे असतात. सत्तेत असताना मोह टाळणे सर्वांत कठीण असते आणि निर्धाराची परीक्षा केवळ कसोटीच्या क्षणी होऊ शकते. अशा परीक्षांत जे यशस्वी होतात, त्यांचे जीवन लौकिकाच्या सरधोपट प्रवाहाहून वेगळ्या अशा स्वरूपात विकसित होते. असे भाग्य फार कमी लोकांना लाभते. देवेंद्र फडणवीस या भाग्याचे धनी आहेत. उत्तम संस्कार, उत्तम बुद्धिमत्ता, उत्तम वक्तृत्व, उत्तम व्यासंग आणि उत्तम विचारसरणी यांचा संयोग त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला आहे. नागपूरच्या मातीत रुजलेले-वाढलेले फडणवीस सध्या राज्याच्या पातळीवर मातब्बर नेत्यांमध्ये गणले जातात. ही मान्यता त्यांनी कष्टाने कमावलेली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना एका संस्कृत सुभाषितातील वर्णन स्मरते...
‘विपदि धैर्यमथाभ्युदये क्षमा
सदसि वाक्पटुता युधि विक्रमः
यशसि चाभिरुचिव्र्यसनं श्रुतौ
प्रकृतिसिद्धमिदं हि महात्मनाम्।।'
विपत्तीच्या वेळी धैर्य, समृद्धीच्या काळात सहनशीलता, सभेत वाक्पटुता, युद्धात पराक्रम, यशाची आकांक्षा आणि शास्त्रांच्या अध्ययनातील आसक्ती ही लक्षणे मोठ्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वात असतात, असा याचा अर्थ. देवेंद्र यांना भविष्यात आणखी मोठे कार्य करायचे आहे. त्यासाठी ईश्वराने त्यांना लोकसेवा करण्यासाठी दीर्घायुरारोग्य द्यावे, ही प्रार्थना.