रात्रीच्या पावसाने अकोल्यात हाहाकार, पहा व्हिडीओ...

    दिनांक :22-Jul-2021
|
- मोर्णा नदीच्या काठच्या परिसरात भरले पाणी
अकोला,
बुधवार 21 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुरु झालेल्या पावसाने अकोल्यातील मोर्णा नदीला पूर आल्याची परिस्थिती आहे. शहरातील नदीच्या किनार्‍यावरील सर्वच सखल भागात पाणी साचले आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत कुठलिच यंत्रणा शहरातील सखल भागातील पाणी काढण्यासाठी उतरली नव्हती. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आज परिचय आला आहे. तर पोलिसांनी रात्री सखल भागातील नागरीकांना आपत्तीचा इशारा देत सजग ठेवण्याचे काम केले. दरम्यान मोर्णा नदीतून 1915 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. तरची पातळी 273.55 मिटर होती. तर उंची ही 4.95 मिटर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 
 
akola_1  H x W:
 
शहरातील गंगानगर, अनिकट, दगडीपुल, राजेश्वर सेतू, कौलखेड, कामखेडा, ड्रिमलँड सिटी नगर, न्यू तापडीया नगर नाला फुटल्याने लोकांच्या घरात पाणी गेल्याचे चित्र होते. या भागात नागरीकांच्या घरात पाणी गेल्याने रात्री मोठी अडचण झाली आहे. शहरातील सखल भागात अनेक रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. शहरातील नालेसफाईचा बोजवारा उडाला असून प्रशासनाने सकाळी कामाला लागण्याची गरज होती. पण, सकाळी 8 वाजेपर्यंत महापालिका व जिल्हा प्रशासनाचे कुठलेच वरीष्ठ अधिकारी पुर परिस्थिती व नागरीकांचे झालेले नुकसान पाण्यासाठी व त्यांच्या बचावाच्या सजगतेसाठी समोर आले नसल्याची माहिती मिळाली आहे.
 
 
 
शहरात आज सकाळी मोर्णा नदीवरील तीन पुलांवर नागरीकांची गर्दी होती. दगडी पुलावरुन पाणी गेले नव्हते. तर दगडी पुलाच्या खालून मोर्णा नदीचे पाणी वेगाने शहराच्या बाहेर जात होते. राजेश्वर सेतुवरुन मोर्णा नदी दूथडी भरून वाहत होती. तर नागरीकांना येथून हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागत होते. शहरातील हाहाकाराची परिस्थिती असताना महापालिका व जिल्हा प्रशासनाने त्वरीत दखल घेण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. तसेच ज्यांचे मोठे नुकसान झाले त्यांना आर्थिक भरपाई शासनाने देण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. शहरातील अनेक गोदामांमध्ये पाणी भरल्याने पाणी उपसण्याचे काम या ठिकाणी होत होते. शहरातील रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने अकोलेकरांचे जनजीवन आज विस्कळित झाले आहे. प्रशासनाने त्वरीत पुढाकार घेत नागरीकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज आहे. आज गुरुवार, 22 जुलै रोजी देखील हवामान खात्याने अकोल्यात पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरीकांच्या जीव व मालमत्तेच्या रक्षणासाठी सुरक्षित स्थळी नेण्याची गरज आहे. त्याच बरोबर कोरोना पासून फैलाव होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज नागरीकांनी व्यक्त केली.
 
 
 
जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी बॅरेज मधून सर्व द्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या ठिकाणचे बॅरेजचे सर्व दारे उघडण्यात आली आहे. रात्री 3 वाजता पुर्णा नदीला पुर आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आज सकाळी 6.00 वा पूर पातळी 255.60 मी असुन 07 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पूर विसर्ग 763 घमीप्रसें आहे. असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पूर्णा नदीच्या पाण्याचा विसर्ग पाहता अकोला अकोट मार्गावरील गांधीग्राम येथे देखील पूर्णा नदी दूथडी भरुन वाहत होती. दरम्यान काटेपुर्णा प्रकल्पात 136 मिमी. पावसाची नोंद झाली. तर महान येथील काटेपुर्णा प्रकल्पात आज सकाळी पाण्याची पातळी वाढून ती 44.83 दलघमी इतकी झाली आहे. तर धरणाचे पाणी ही 52 टक्के भरल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.