सिद्धू यांच्या नियुक्तीचे राजकीय परिणाम

    दिनांक :22-Jul-2021
|
दिल्ली वार्तापत्र
श्यामकांत जहागीरदार
पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आपली नियुक्ती करून घेण्यात अखेर नवज्योतसिंग सिद्धू यशस्वी झाले. यामुळे पंजाब प्रदेश काँग्रेसमधील पेचप्रसंग सुटला की चिघळला, याचे उत्तर आता नाही तर काही महिन्यांनंतर मिळणार आहे. मात्र, आज पहिल्या फेरीत तरी सिद्धू यांनी मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर मात केली, असे म्हणावे लागेल. यातून अमरिंदरसिंग काही बोध घेत आपल्या वागणुकीत सुधारणा करतील की आपले आक्रमक राजकारण तसेच सुरू ठेवतील, हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र, प्रदेश अध्यक्ष म्हणून सिद्धू यांची वाटचाल त्यांना वाटते तितकी सोपी राहणार नाही. अमरिंदरसिंग गटाकडून सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून कराव्या लागणाऱ्या वाटचालीत काटे पेरण्याचे काम झाल्याशिवाय राहणार नाही, यात शंका नाही.
 
navjot_1  H x W
 
 
२०१५ मध्ये ज्या पद्धतीने अमरिंदरसिंग यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद मिळविले होते, अगदी त्याच पद्धतीने सिद्धू यांनी अध्यक्षपद एकप्रकारे आपल्याकडे हिसकून घेतले. २०१५ मध्ये प्रतापसिंग बाजवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी अमरिंदरसिंग यांनी राज्यातील आमदारांना आपल्या बाजूला वळवून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद मिळविले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बाजवा काँग्रेसला जिंकून देऊ शकत नाही, याची खात्री पटल्यामुळे राज्यातील आमदारांनी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी आपली ताकद अमरिंदरसिंग यांच्या पाठीशी उभी केली होती. त्याच इतिहासाची यावेळी सिद्धू यांनी पुनरावृत्ती केली.
 
 
कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वात २०२२ ची विधानसभा निवडणूक आपण जिंकू की नाही, याबाबत आमदार आणि काँग्रेस नेत्यांच्या मनात साशंकता होती. याउलट सिद्धू यांच्या नेतृत्वात आपण निवडणूक जिंकू शकू, असा विश्वास काँग्रेसच्या बहुसंख्य आमदार आणि नेत्यांच्या मनात निर्माण झाला. त्यामुळेच नाईलाजाने अमरिंदरसिंग यांचा दबाव झुगारून काँग्रेसच्या नेतृत्वाला सिद्धू यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालावी लागली. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलेल्या बऱ्याच आश्वासनांची पूर्तता अमरिंदरसिंग यांनी केली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि जनतेच्या मनातही अमरिंदरसिंग यांच्याबद्दल काहीशी नाराजी आहे. याचा सिद्धू यांना फायदा झाला. गंमत म्हणजे आतापर्यंत अमरिंदरसिंग यांना विरोध करणाऱ्या प्रतापसिंग बाजवा यांनी सिद्धू यांच्या अध्यक्ष म्हणून झालेल्या नियुक्तीनंतर पुन्हा अमरिंदरसिंग यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
 
 
नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करताना काँग्रेसच्या नेतृत्वाने विशेषत: अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एका दगडात अनेक पक्षी मारले गेले की नाही, हे कळायला थोडा वेळ लागणार आहे. पहिला म्हणजे यातून गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांच्या सर्व म्हणजे फक्त तीन मुख्यमंत्र्यांना एक संदेश दिला. कोणाही मुख्यमंत्र्याची मनमानी यापुढे पक्षात चालणार नाही; काँग्रेस नेतृत्व म्हणेल, तेच त्यांना मान्य करावे लागेल, हा पहिला आणि काँग्रेस नेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा दुसरा संदेश सिद्धू यांच्या नियुक्तीतून देण्यात आला. तिसरा महत्त्वपूर्ण संदेश म्हणजे यापुढे कुरघोडीच्या पक्षांतर्गत राजकारणामुळे कोणावर पक्ष सोडण्याची वेळ येऊ दिली जाणार नाही. ज्योतिरादित्य शिंदे प्रकरणातून काँग्रेसच्या नेतृत्वाला आलेले हे शहाणपण म्हणावे लागेल.
 
 
पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात जसा वाद आहे, तसाच वाद काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यातील वाद नवीन नाही. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राज्याचे आरोग्यमंत्री सिंहदेव यांच्यातील वादाने अद्याप उग्र रूप घेतले नसले, तरी वेळीच त्यावर तोडगा काढण्यात आला नाही तर तो चिघळू शकतो. पंजाबमध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून सिद्धू यांची नियुक्ती करीत सोनिया गांधी यांनी या दोन राज्यांतील मुख्यमंत्र्यांना बंडखोरांशी जुळवून घ्या; समन्वयाने काम करा, असा संदेश दिला आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात जसे तणावाचे संबंध आहेत, तसेच राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यातही आहे. सिद्धू यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यामुळे राजस्थानात सचिन पायलट यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता बळावली आहे. हा संदेश पोहोचल्यामुळेच अशोक गहलोत यांनी सिद्धू यांच्या नियुक्तीचे जरा उशिराच स्वागत केले.
 
 
सिद्धू यांना पंजाब काँग्रेसमध्ये तसेच आपल्या मंत्रिमंडळातही अमरिंदरसिंग यांनी काम करू दिले नाही. टोकाचा विरोध करीत एकप्रकारे त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आणली होती. यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाने अमरिंदरसिंग यांना धडा शिकवला, असे म्हणावे लागेल. आपल्यावर सोशल मीडियातून केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेबद्दल सिद्धू यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी आता केली आहे. जोपर्यंत सिद्धू माफी मागणार नाही, तोपर्यंत आपण सिद्धू यांना भेटणार नाही, अशी अटही त्यांनी घातली आहे. सिद्धू यांचा स्वभाव पाहता ते अमरिंदरसिंग यांची जाहीर माफी मागण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे सिद्धू यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यावरही पंजाबमधील पेचप्रसंग सुटला, असे म्हणता येणार नाही. राज्यातील विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल, तसा या दोघांमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात खरा वाद राज्यातील तिकीट वाटपावरून उद्भवणार आहे. कारण निवडणुकीनंतर ज्याचे जास्त आमदार निवडून आलेले असतील, त्याचा मुख्यमंत्रिपदावरचा दावा मजबूत होणार आहे. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त समर्थकांना उमेदवारी देण्याचा या दोन्ही नेत्यांचा प्रयत्न राहणार आहे. यात आणखी एक शक्यता विचारात घ्यावी लागेल, ती म्हणजे अमरिंदरसिंग आणि सिद्धू हे दोघेही मुख्यमंत्रिपदाचा आपला दावा मजबूत करण्यासाठी एकदुसऱ्याचे उमेदवार पाडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. यात या दोन नेत्यांपैकी कोणताही गट जिंकला तरी काँग्रेस पराभूत होणार आहे. परिणामी काँग्रेसची राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता मावळणार आहे.
 
 
सकृतदर्शनी तरी विधानसभा निवडणूक कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असे दिसते. त्यामुळे उमेदवारी वाटप करताना अमरिंदरसिंग यांच्या समर्थकांना जास्त प्राधान्य मिळू शकते. सिद्धू यांच्या जास्त समर्थकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला तर तो अमरिंदरसिंग खपवून घेणार नाहीत. सिद्धू प्रकरणात एक पाऊल मागे घ्यावे लागले असले, तरी पंजाबच्या राजकारणातील आपले महत्त्व कमी करण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वाचा कोणताही प्रयत्न अमरिंदरसिंग यापुढे खपवून घेणार नाही. वेळ पडली तर ते बंड करण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. सिद्धू यांना राजकीय बळ देण्याच्या काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात अमरिंदरसिंग नवा राजकीय पक्षही काढू शकतात. अमरिंदरसिंग यांचे बंड कोणत्याही स्थितीत काँग्रेसला परवडणारे नाही. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात काँग्रेसच्या नेतृत्वाला तोलूनमापून पावले टाकावी लागणार आहेत. सिद्धू आणि अमरिंदरसिंग यांच्यात सामंजस्य घडवून आणण्याचे काम काँग्रेसच्या नेतृत्वाला करावे लागणार आहे. सिद्धू आणि अमरिंदरसिंग हे दोघेही प्रचंड इगो असलेले नेते आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दोघांमध्ये टोकाचे वैमनस्य आले आहे. त्यामुळे ते एकदुसऱ्याशी कितपत जुळवून घेतील, याबाबत शंका वाटते. सिद्धू आणि अमरिंदरसिंग हे दोघेही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा सोडत एक पाऊल मागे जात असतील, तर त्याचा फायदा पंजाबमध्ये काँग्रेसला होऊ शकतो. पण हे दोन्ही नेते आपापल्या भूमिकेवर ताठ राहिले तर राज्यात काँग्रेसला कोणीही वाचवू शकणार नाही. हातातील आणखी एक राज्य गमावण्याची वेळ काँग्रेसवर आल्याशिवाय राहणार नाही.
९८८१७१७८१७