झणझणीत झिरकं !

    दिनांक :03-Aug-2021
|
नेहमीच भाजीपोळी आणि त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. पावसाळ्याच्या दिवसात, काहीतरी चमचमीत आणि गरमागरम खाण्याची इच्छा होते. अशा वेळी आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणा-या पदार्थांचा वापर करून, खास गावराणी पद्धतीचं झिरकं बनवता येतं. नाशिककडे केल्या जाणा-या आणि वेगळंच नाव असलेल्या या पदार्थासाठी साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.
 
 
zirka _1  H x W
 
झिरकं बनविण्यासाठी साहित्य : हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, सुकं खोबरं, तीळ, कोथिंबीर, मोहरी, हळद-हिंग आणि चवीनुसार मीठ
 
कृती : एका खोलगट पॅनमध्ये वाटीभर शेंगदाणे रंग बदलण्याइतपत भाजून घ्यावे. त्यातच, सुकं किसलेलं खोबरं, अर्धा चमचा पांढरे तीळ छान भाजून घ्यावेत. हे मिश्रण थंड करून घ्या. आता १०-१२ लसूण पाकळ्या, ५-६ हिरव्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घ्याव्या. आता त्यात भरपूर कोथिंबीर घालून वाटून घ्यावी. लसूण ठेचा आणि कोथिंबीर वाटण वेगळे ठेवावे. भाजलेले शेंगदाणे आणि इतर साहित्याची बारीक पूड करून घ्यावी. आता जिरं-हिंग, गोडलिंब याची फोडणी करावी. त्यात लसूण-मिरचीचा ठेचा घालावा. हळद घालून परतून घ्या. आता या मिश्रणात पाणी घालून, त्यात उरलेली दोन्ही वाटणे घालावीत. साधारण ७-८ मिनिटे उकळून घ्यावे. झणझणीत झिरकं आमटी तयार आहे. वाफाळलेल्या भातासोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत आस्वाद घ्या ! नक्की बनवून बघा!