गणरायाच विलगीकरणात!

    दिनांक :11-Sep-2021
|
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाला 10 दिवसांसाठी या राज्य सरकारने विलगीकरणात ठेवले आहे. कोरोना झालेल्या रुग्णांचीसुद्धा अंतर ठेवून भेट घेऊ दिली जाते. मात्र, आपल्या लाडक्या बाप्पाची भेट यांनी नाकारली आहे. भेटायचेच असल्यास आभासी पद्धतीने भेटण्याचे फर्मानच या तुघलकी सरकारने काढले आहे.
 
 
corona-gardi_1  
 
प्राचीन काळात देशात राजेशाही व्यवस्था होती. यात अनेक असे राजे होऊन गेले, ज्यांनी आपल्या प्रजेच्या हितासाठी कार्य केले आहे तर काही असेही राजे होऊन गेले आहेत, ज्यांनी प्रजेचा नाही तर केवळ स्वत:चा स्वार्थ बघितला आहे. यात सर्वात पहिल्या क्रमांकावर नाव येते ते 14 व्या शतकातील शासनकर्ते मुहम्मद बीन तुघलक यांचे. दिल्लीच्या तख्तावर तब्बल 26 वर्षे अधिराज्य गाजवणार्‍या या राजाला ओळखले जाते, ते त्याच्या चुकीच्या निर्णयाने! आजही कुठलाही चुकीचा निर्णय किंवा अन्यायकारक कायदा लागू करण्याचा प्रयत्न लोकशाहीत केला तर त्याला 21 व्या शतकातदेखील ‘तुघलकी फर्मान’ असेच संबोधले जाते. आता इतका प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर लोकशाहीच्या या काळात तुघलकी शासन काय होते, याची प्रचिती महाराष्ट्रातील जनतेला येत आहे. हिंदुहृदयसम्राटांचा मुलगा सध्या तख्तावर बसलाय्... तोच सल्ले देत आहे आणि तोच हिंदू सणांवर निर्बंधदेखील लादत आहे. गणपती बाप्पाचे दर्शन आभासी करण्याचे निर्देश दिलेत. राम मंदिर पायाभरणीचा कार्यक्रम आभासी करण्याचा सल्लादेखील बसल्या जागेवरून दिला होता. त्यांच्या राज्यात संताची हत्या होत आहे, ब्र देखील उच्चारला नाही, निषेध देखील नोंदवला नाही; आता ते संवैधानिक पदावर आहेत.
 
 
मर्यादा असतील पण त्यांच्या पक्षाच्या वतीने कोणी, नाहीच नाही... तसे यांच्या पक्षात गटार गप्पा करणारे, नसते चकाट्या पिटणार्‍यांची कमी नाही... हे लोक यांचा संबंध नसलेल्या विषयात नाक खुपसताना नेहमी दिसतात... जगाला तत्त्वज्ञान शिकवतात. पण शपथ आहे, यातील कोणीही संताच्या झालेल्या हत्याकांडावर बोलतील तर... हिंदुहृदयसम्राटांचा मुलाच्या कार्यकाळात हिंदूंच्या सणांवर निर्बंध आहेत. मंडई सुरू आहे आणि तेथे मोठी गर्दी उसळते. वृत्तवाहिनीवाले दादरची मंडई रोज दाखवून दाखवून थकलेत आता... मातोश्रीपासून तसे फार अंतर नाही बरं का...! बरं, राज्यात बंद काय आणि सुरू काय? केवळ मंदिर आणि रंगमंदिर दोनच बंद आहेत. बाकी सगळं सुरू... मॉल सुरू... बाजार सुरू, बार सुरू... डान्सबार सुरू... पब सुरू... बीच सुरू... बस सुरू... (मुंबईत प्रचंड गर्दी असते), रेल्वे सुरू... मग केवळ मंदिरांनी काय घोडं मारलं यांचं! निर्बंध केवळ सणवारंं आणि देवळांवरच का घालता? केवळ मंदिरांमुळे कोरोना वाढतो, असे म्हणायचे आहे का? आता लसीकरण झाल्याचा भलामोठा आकडा, मोठ्या दिमाखात राज्य सरकार जाहीर करतं. मग लसीकरण होऊनही लोकांनी घरातच बसायचं का? यामुळे सरकारला आता कोरोना आवडायला लागला की काय? असे वाटू लागले आहे.
 
 
कोरोना आहे टाळेबंदी लावा. लोकांना घरात बसवा... कामं करायला नको... प्रश्न सोडवायला नको... उत्तरं द्यायला नकोत... कुणी आंदोलन, निदर्शनं करायला नकोत. जर कुणी आंदोलन करतोच म्हटलं किंवा जाब विचारतोच म्हटलं तर कोरोनाच्या नावाखाली त्याच्यावर पोलिसी बळाचा वापर करून मुस्कटदाबी करायचीदेखील संंधी मिळते. मुख्यमंत्री काय म्हणाले होते? ऑक्सिजनचा वापर 700 मेट्रिक टनच्या वर गेल्यास मी टाळेबंदी लावेल... मग गेलाय् का वापर याच्यावर? मग नेमकी प्रत्यक्ष काय आकडेवारी आहे जरा कळूतरी द्या. आपल्या सोयींनी लाट येते आणि जाते... सोयीने निर्बंध लादले जातात... हे काय चाललंय् या राज्यात? निवडणुका, सत्ताधारी पक्षांच्या यात्रा, पक्षांचे मेळावे, नेत्यांचे वाढदिवस हे चालतात... (विरोधी पक्षांचे चालत नाहीत, कोरोना वाढीस वाव मिळतो... त्यामुळे त्यांच्या अशा कार्यक्रमांवर गुन्हे दाखल केले जातात) आणि केवळ दहीहंडी, शोभायात्रा, गणेशोत्सव, गुढीपाडवा, शिवजयंतीनेच कोरोना वाढतो, असे यांना म्हणायचे आहे काय? एकीकडे कुणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये... अशा वल्गना करायच्या आणि जेव्हा हिंदुत्वासाठी काही करायची वेळ आली की, शेपूट घालायचे! कारण काय तर आपल्या सहकार्‍यांना याचं वावडं आहे म्हणून हे सगळं चाललं आहे का?
 
  
बरं, आरोग्य मंदिरं बंद करून, मंदिरं उघडायची का, असा प्रश्न मुख्यमंत्री करतात; याचे नवल वाटते... म्हणजे काही एक उघडायचं म्हटलं तर दुसरं काही तरी बंद करायचे, असा काही नियम आहे का? तसा मागील काळात काही अनुभव आला नाही. हे सगळं करून राज्यात कोरोनाचे बाधित कमी झालेत का? नाहीच ना... पहिल्या लाटेतही तुम्ही प्रथम आणि दुसर्‍या लाटेतही मागे नाही... मग तो बाधितांचा आकडा असो किंवा मृत्यू दर असोत... मग यावर रोख लावण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी काय उपाययोजना केल्यात? मागील दोन वर्षांपासून आरोग्य कर्मचारी भरलेत का? नाही..., ऑक्सिजनची क्षमता वाढवली का? नाही..., डॉक्टर्सच्या नियुक्त्या झाल्यात का? नाही..., राज्य शासनात एकूणच रिक्त असलेल्या जागा भरल्या का? नाही..., पोलिस भरती करण्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्र्यांनी केली होती, झाली का भरती? नाही..., रेमडेसिविर किंवा अन्य उपचारांसाठीच्या औषधांची व्यवस्था झाली का? नाही..., लसी स्वत: राज्य सरकार मागवणार होतं... बनवणार होतं... विदेशातून मागविण्याची परवानगी आणि राज्यात बनविण्याची परवानगी मागितली होती केंद्र सरकारला. केंद्र सरकारने तत्काळ परवानगी दिली होती. मग मागविल्या का लसी? किंवा हापकीनला बनविण्याची परवानगीदेखील केंद्र सरकारने दिली होती. निधीदेखील देऊ केला होता. बनविल्या का राज्यात लसी? नाही... मग तुम्ही उपाययोजना काय करताहात? हे बंंद आणि ते बंद... त्यातही सारं सुरू आणि केवळ धार्मिक सणांवर आणि मंदिरांवर यांची संक्रांत... अरे करायचंच असेल तर, ज्या-ज्या ठिकाणी गर्दी होते, नियमांचं पालन होत नाही, त्यावर काही नियंत्रण आणता येते का? ते बघावे... त्यावर काहीही एक उपाययोजना करायच्या नाहीत, ते सगळं राजरोसपणे चालणार आणि निर्बंध केवळ सणांवर लादणार. असे कसे चालेल?
 
 
मुळात कोरोनाचे गांभीर्य सर्वांनाच आहे. धोका वाटला तर लोक निर्बंध पाळतातच. मागच्या वर्षी लोकांनी कडक काटेकोर नियमांचं पालन करून दाखवलंच ना... परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे कारण म्हणजे तुमचा ढिसाळ कारभार आणि अव्यवस्था होती. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही. पक्षपात करू नका. ज्या मुहम्मद तुघलकाप्रमाणे फर्मान आपण सोडत असता, तो देखील म्हणे, हिंदूच्या दिवाळी आणि होळीसारख्या सणांमध्ये सहभागी व्हायचा... देखो जमता है तो... 
 
- 9270333886