अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्ष;नॉर्दर्न अलायन्सला कोण मदत करणार?

    दिनांक :12-Sep-2021
|
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
सर्वसमावेशक सरकार प्रस्थापनामध्ये अडचणी
तालिबानने मंगळवारी काळजीवाहू मंत्रिमंडळाची घोषणा केली. यात प्रामुख्याने अमेरिका आणि अफगाण सरकारविरुद्धच्या 20 वर्षांच्या संघर्षाचे नेतृत्व करणार्‍या ज्येष्ठ नेत्यांना सर्वोच्च पदे देण्यात आली आहेत. जागतिक दहशतवादी असलेल्या मुल्ला हसन अखुंदझादा याची इस्लामिक अमिरात अफगाणिस्तानचा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांसाठी असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सिराज हक्कानी गृहमंत्री असणार आहे. अमेरिकेने त्याच्यावर 36 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हक्कानी नेटवर्क दहशतवादी गट असून आत्मघाती हल्ल्यांमध्ये या गटाचा समावेश होता. तालिबान सरकारच्या प्रमुख पदांवर दहशतवादी, दहशतवादाचे आरोप असणार्‍यांची वर्णी लागली आहे. जगात पहिल्यांदाच दोनहून अधिक जागतिक दहशतवादी एखाद्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे या दहशतवाद्यांवर निर्बंध घातलेले देश तालिबानला मान्यता कशी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
Saleh 5_1  H x
 
पाकिस्तानकडून हक्कानी नेटवर्कला झुकते माप
सरकार स्थापनेच्या मुद्यावरून तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या नेत्यांमध्ये गोळीबार झाला. संघर्षादरम्यान हक्कानी गटाकडून झालेल्या गोळीबारात मुल्ला बरादर जखमी झाला आहे. तालिबान सरकार स्थापन करण्यासाठी असलेले मतभेद दूर करण्यासाठी पाकिस्तान आयएसआय प्रमुखांनी अफगाणिस्तानचा दौरा केला आहे. पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संघटना आयएसआयच्या मदतीमुळेच तालिबान अफगाणिस्तानात अल्पावधीत परतू शकली, असे पाश्चात्त्य माध्यमांनी म्हटले आहे.
 
 
स्थापना सोहळ्यासाठी पाकिस्तान, कतार, तुर्की, चीन, रशिया, इराणला आमंत्रण
तालिबान्यानं सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी पाकिस्तान, कतार, तुर्की, चीन, रशिया, इराण या देशांना आमंत्रण दिलं आहे. यामागचं कारण नेमके काय? पाकिस्तान आणि चीन हे तालिबानला कशी मदत करते, हे जगजाहीर आहे. तालिबानला वाटते की, आर्थिक मदत मिळण्याकरिता चीन आणि रशिया यांची मोठी मदत होऊ शकते. जर रशिया तालिबानच्या बाजूंनी आला तर तो नॉर्दर्न अलायन्सला मदत करणार नाही आणि त्यांचा लवकर पराभव होईल. तुर्कस्तानकडून लष्करी मदतीची अपेक्षा आहे. इराणकडून सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेल आणि इंधन सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते. पंजशीरच्या संघर्षात पाकिस्तानकडून तालिबान्यांना मदत पुरविण्यात आली. लढाईचे पूर्ण नियोजन पाकिस्तानी सैन्याने केले; ज्यामध्ये सैन्याचा कमांड कंट्रोल, लढाईचे प्लॅनिंग, चीनच्या मदतीने इंटेलिजन्स गोळा करणे, दारूगोळ्याची मदत, पाकिस्तानमधून आणलेले काही कडवे दहशतवादी आणि सर्वात महत्त्वाचे की, तालिबानच्या लढणार्‍याचे नेतृत्व पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फॉर्सेसचे अधिकारी आणि जवानांनी केले. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयनं तालिबानला पंजशीरवर हल्ल्यासाठी समन्वय केले आहे.
 
 
तालिबानविरोधातील संघर्ष सुरूच राहील- नॉर्दर्न अलायन्स
पंजशीर प्रांतावर निर्णायक ताबा मिळविल्याचा दावा तालिबानने केला आहे. दुसरीकडे, तालिबानविरोधातील संघर्ष सुरूच राहील, असे नॉर्दर्न अलायन्सने (उत्तर आघाडी) म्हटले आहे. अमरुल्ला सालेह, अहमद मसूद ताजिकिस्तानमध्ये असल्याचे वृत्त आहे. रेझिस्टन्स फोर्सचे प्रवक्ते आणि अहमद मसूद यांचे निकटवर्तीय समजले जाणारे फहीम दश्ती हे ठार झाले आहेत. या मोहिमेचे नेतृत्व नॉर्दर्न अलायन्सचे प्रवक्ते फहीम दश्ती यांनी केले होते, जे नंतर मारले गेले. अफगाणिस्तानातील पंजशीर असा एकमेव प्रांत आहे, जिथं अजूनही तालिबान्यांना कब्जा मिळजवता आलेला नाही. अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केलेल्या देशातील 34 प्रांतांपैकी पंजशीर प्रांताने तालिबान्यांना आव्हान दिले होते. पंजशीरमधील नॉर्दन अलायन्सने प्रतिहल्ला करीत तालिबान्यांचे मोठे नुकसान केले होते. यावेळी झालेल्या चकमकीत सुमारे 600 हून अधिक तालिबानी ठार झाले होते तर एक हजारहून अधिक जणांनी शरणागती पत्करली होती. तालिबान्यांचा पंजशीरविरुद्धचा संघर्ष खूप जुना आहे.
 
 
पंजशीर ताब्यात आणायचा तालिबानचा प्रयत्न
15 ऑगस्टला काबुलवर कब्जा करून अफगाणिस्तानवर सत्ता गाजवू पाहणार्‍या तालिबानला पंजशीर खोर्‍यातून नॅशनल रेझिस्टन्स फोर्सेसच्या लढवय्यांनी दिलेले जबरदस्त आव्हान मोडून काढण्यासाठी तालिबानने सध्या आकाशपाताळ एक केले आहे. काबुलच्या उत्तरेस असलेले पंजशीरचे दुर्गम खोरे ताब्यात मिळविण्यावर घनघोर लढाई सुरू आहे. सरकार स्थापन करायच्याही आधी पंजशीर ताब्यात आणायचा तालिबानचा प्रयत्न आहे. अफगाण उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी तालिबानला ललकारले आणि पंजशीरमध्ये आश्रय घेतला, तेव्हापासून पंजशीर खोरे हे प्रकाशझोतात आहे. अहमद मसुदच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानातील काही तालिबानविरोधी शक्ती तेथे एकवटल्या आहेत व लढत आहेत. अफगाणिस्तानमधील सोव्हियत आक्रमणाच्या काळात अहमदशहा मसूद यांनी पंजशीरमध्ये त्यांना पाऊलही ठेवू दिले नव्हते. तालिबान्यांनी जेव्हा सोव्हिएतांच्या गमनानंतर आपले क्रूर शासन लागू केले तेव्हाही पंजशीर विरोधात होता. 11 सप्टेंबरच्या जागतिक व्यापार केंद्रावरील हल्ल्याच्या दोनच दिवस आधी अहमदशहा मसूद यांची टीव्ही कॅमेर्‍यात ठेवलेल्या शक्तिशाली बॉम्बच्या स्फोटाद्वारे अल कायदाच्या दहशतवाद्यांनी हत्या केली, परंतु आज मसूद यांचेच सुपुत्र अहमद मसूद आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकत तालिबानसमोर बंडाचे निशाण घेऊन ठामपणे उभे आहेत.
 
 
मदत जरूरी
तालिबानने पंजशीर खोर्‍याची कोंडी केलेली आहे. तुंबळ लढाईमध्ये 600 हून अधिक तालिबान्यांना यमसदनी पाठविल्याचे वृत्त रशियाच्या स्पुतनिक वृत्तसंस्थेने दिलेले आहे. त्यामुळे पंजशीरमधील प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आणि कोण विजयाच्या दिशेने चालले आहे, हे समजणे कठीण आहे. परंतु ज्या निर्धाराने आणि प्रखरपणे अहमद मसूद आणि त्याच्या लढवय्यांनी तालिबान्यांच्या विरोधात संघर्ष पुकारला आहे, तो महत्त्वपूर्ण आहे. पंजशीर सर करण्यासाठी तालिबानने अल कायदाचीही मदत घेतली आहे आणि पाकिस्तानी सैन्यही तालिबानच्या मदतीला धावलेले आहे. पाकिस्तानी सैनिकांची ओळखपत्रे रेझिस्टन्स फोर्सेसच्या हाती लागली. रावळपिंडीच्या पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयातून पंजशीरमधील लढाईवर नजर ठेवली जात आहे. पाकिस्तानी लष्कराने आपली ड्रोन आणि इतर युद्धसामग्री तालिबानच्या मदतीस तेथे तैनात केली आहे. तालिबानशी असलेले पाकिस्तानचे साटेलोटे तर जगजाहीर आहेच; पण आयएस-खोरासान आणि अल कायदाच्या निःपातासाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यावा यासाठी अमेरिका पाकिस्तानवर दबाव आणत असल्याची बातमी आहे. पंजशीर सर करण्यासाठी तालिबान अल कायदापासून पाकिस्तानपर्यंत सर्वांची मदत घेताना दिसते आहे. मात्र, अहमद मसूद यांना फारशी मदत मिळाली नाही.
 
 
पंजशीरचा पराभव का होत आहे?
विविध गट एकत्र नसल्यामुळं हे घडलं का? खरे म्हटले तर नॉर्दर्न अलायन्स अजून पूर्णपणे तयार झालेले नाही. उझबेकी आणि तुर्कमेनिस्थानी यांचा या लढाईमध्ये फारसा वाटा दिसत नाही. याशिवाय पाकिस्तानी सैन्याने लढाईमध्ये हेलिकॉप्टर, फायटर ए क्राफ्ट, स्मार्ट शस्त्रांचा वापर करून मदत केली. जिथे जिथे गुप्तहेरांकडून माहिती मिळाली होती तिथे तिथे नॉर्दर्न अलायन्सच्या सैन्याचा पराभव झाला. अमरुल्लाह सालेह यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आणि अनेक नेत्यांना मारण्यात आले. चीनकडे असलेले सॅटेलाईट टेक्नॉलॉजीचा वापर करून मसूदचे सैन्य कुठे आहे, याची नेमकी माहिती दिली. ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आर्मेनिया आणि अझरबैजानच्या लढाईमध्ये तुर्कस्तानच्या ड्रोन्स विजयामध्ये फारच मोठा वाटा होता. तशाच प्रकारे तुर्कस्तान ड्रोन्सचासुद्धा वापर इथे करण्यात आला.
 
 
आता अमरुल्लाह सालेह कोणती भूमिका घेणार? ते तालिबानसमोर पुन्हा आव्हान उभे करू शकतील का? असे प्रश्न उभे राहात आहेत. लष्करी नेता अहमद मसूद आणि राजकीय नेता अमरुल्लाह सालेह हे ताजिकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत. त्यांच्यामध्ये हा लढा पुढे चालवण्याची क्षमता आहे, परंतु त्याकरिता त्यांना सेंट्रल रिपब्लिकच्या देशांचा सपोर्ट मिळणे गरजेचे आहे. याशिवाय एक महाशक्ती म्हणजे अमेरिका किंवा रशिया यांच्याकडून मदत अपेक्षित आहे. मात्र, ही मदत सध्या मिळतांना दिसत नाही. त्यामुळे सध्या चाललेला धडा किती दिवस चालेल, यावर प्रश्नचिन्ह आहे. पंजशीर अजेय राहिले तर हा काटा आपल्या वाटेत सलत राहील, याची तालिबानला कल्पना आहे. या घडीला उर्वरित जग पंजशीरच्या लढ्याकडे त्रयस्थपणे नुसते बघत बसणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. पंजशीरला आज मदतीची जरूरी आहे
 
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
- 9096701253 
••