समस्या सोडवण्याचे कौशल्य!

    दिनांक :12-Sep-2021
|
कशासाठी? यशासाठी!
- डॉ. नितीन विघ्ने
उल्झन से उडान तक
1. एका माणसाने घर बांधायला प्लॉट घेतला; पण प्रत्यक्ष घर बांधताना प्लॉटच्या मधोमध एक मोठ्ठा खडक मधेच पर्वतासारखा उभा होता. त्याने स्वतः खूप प्रयत्न करून त्या खडकाला हलवण्याचा व काढण्याचा प्रयत्न करून बघितला, पण तो खडक काढू शकला नाही. शेवटी त्या खडकाच्या भोवताली बांधकाम केले. काही वर्षांनी घर बांधणारा मालक मरण पावला; त्याचा मुलगासुद्धा म्हातारा झाला, पण तो खडक तेथेच होता. नातू तरुण झाल्यावर त्याने त्या खडकाच्या समस्येवर नव्याने उपाय शोधणे सुरू केले. म्हातार्‍या वडिलांनी त्याला सांगितले की, काही उपयोग नाही. तुझ्या आजोबांनीसुद्धा स्वतः प्रयत्न केलेत, पण यश मिळाले नाही. पण, नातवाने आजोबांच्या व वडिलांच्या समजुतीचा व अपयशाचा विचार न करता प्रयत्न करायचे ठरविले. त्याने एकाच वेळी सहा लोकांना सहा मोठ्या सब्बलच्या मदतीने त्या खडकाला हलवायचा जोरदार प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे तो खडक पूर्ण निघाला. खरं तर त्याच्या आजोबांनी सर्व प्रयत्न एकट्यानेच केले होते. इतरांची मदत घेतलीच नव्हती. त्या मर्यादित प्रयत्न व विचारांच्या आधारावर असे गृहित धरले होते की, हा खडक खूप खोल जमिनीतून वर आला आहे. पण प्रत्यक्षात तसे नव्हते. आजोबांवर विश्वास ठेवून त्याच्या वडिलांनी तो खडक काढायचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. असेच काश्मीरच्या 370 कलम काढण्याबद्दलसुद्धा घडले होते.
 
 
Problem-Solving-Skills_1&
 
2. आशा तिच्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये आली. म्हणाली, ‘‘सर, मला वाचायची खूपच आवड आहे. पण हा माझा बाळ सतत माझ्या मागं-मागं फिरतो. मला अजिबात वाचू किंवा दुसरं कोणतंच काम करू देत नाही. घरी सासू-सासरे आहेत, पण हा त्यांच्या जवळ जात नाही. हा झोपला की, मी थोड्यावेळ मोबाईलवर असते. थोडा वेळ का होईना, मला हा जागा असतानासुद्धा वाचन करता येईल का?’’ तिची समस्या तशी कॉमन होती. मी तिला टेबलवर ठेवायचे एक अलार्म क्लॉक आणायला सांगितले आणि काही सूचना दिल्या तसेच सासू-सासर्‍यांना प्रयोगाची पूर्वकल्पना दिली. आधी बाळाला खाऊ-पिऊ घालून पूर्ण लक्ष फक्त त्याच्यावरच केंद्रित करायला सांगितले. त्यानंतर 10 मिनिटांचा अलार्म लावून तिने बाळाला समजावले की, ‘आई आता अलार्म वाजतपर्यंत पुस्तक वाचणार आहे. तोपर्यंत आई बाळाशी बोलणार नाही.’ तिने हा प्रयोग सुरू केल्यावर सवयीनुसार बाळ तिच्या जवळ आला, पण तिने पुस्तक उघडून वाचायचा अभिनय केला. तो रडायला लागला तरीही अलार्म वाजतपर्यंत ती बाळाशी बोलली नाही. अलार्म झाल्यावर मात्र पटकन त्याला जवळ घेऊन त्याचा लाड केला. रोज ठरावीक वेळी हा प्रयोग चालू ठेवल्यावर बाळ त्या वेळेत शांत राहायला शिकला. तसेच त्याला त्याच वेळेत गुंतविण्यासाठी योग्य तो खेळ आणून दिला. हळूहळू दोन-दोन मिनिटे वाढवत नेऊन अर्धा तासपर्यंत वाढवल्यावर आशा शांतपणे त्या वेळात पुस्तक वाचू शकली. शिवाय मुलाला शिस्त लागली. या प्रकारे बुद्धिचातुर्य व कल्पनाशक्ती वापरून आपण आपल्या अनेक समस्यांचे निराकरण करू शकतो.
 
 
3.1984 साली खलिस्तानवादी आतंकवाद्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ठाण मांडले होते. त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे खूपच कठीण काम होते. अशावेळी भारतीय जेम्स बॉण्ड उर्फ अजित डोवाल यांनी रिक्षेवाला बनून माहिती काढली. खलिस्तानवादी आतंकवाद्यांनी त्यांना संशयावरून पकडले. अशा कठीण समस्येच्या प्रसंगी त्यांनी आपण पाकिस्तानचे आयएसआय एजन्ट आहोत असे भासवून, आम्ही तुम्हाला मदत करू सांगत त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या शस्त्र व तयारीची संपूर्ण माहिती काढली. याच माहितीचा उपयोग करून भारतीय सैनिकांनी आतंकवाद्यांवर कमांडो कारवाई करून नियंत्रण मिळविले. अजित डोवाल यांनी या प्रकारे देशाच्या कठीण समस्येच्या अनेक प्रसंगी मग तो सर्जिकल स्ट्राईक असो किंवा 370 कलम काढण्याच्या वेळी असो, प्रत्येक वेळी अत्यंत कल्पकतेने, धैर्याने समस्या सोडविण्याचे अतुलनीय कौशल्य दाखवले. त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी, समर्पणासाठी आणि त्यांच्या देशाबद्दल निर्विवाद दृढनिश्चयासाठी कीर्ती चक्र शौर्य पुरस्कार त्यांना देण्यात आला. ते भारतीय पंतप्रधानांचे पाचवे आणि सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आहेत.
 
 
4.जवळपास गेली दोन वर्षे कोरोनाच्या विषाणूने संपूर्ण जगात वेगवेगळ्या समस्यांना जन्म दिला. कोणाचे दोन्ही पालक तर कुणाचे जवळचे नातेवाईक दगावले. कुणाच्या नोकर्‍या गेल्या. कुणाचा व्यवसाय पूर्ण बंद झाला. अशा जीवघेण्या परिस्थितीत दुष्ट लोकांनी आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. देशविरोधी लोकांनी त्यातसुद्धा आपला स्वार्थ जपण्यासाठी राजकारण करायचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत आपण समस्या निवारण कसे करावे?
 
 
समस्या सोडविण्यासाठी हे करा :
1. Prevention Is Better Than Cure म्हणजे रोग झाल्यावर चिकित्सा करण्यापेक्षा रोग-प्रतिबंध करणेच उत्तम! या तत्त्वानुसार समस्या निर्माणच होऊ नयेत, हा प्रयत्न असावा. उदा. कोरोना होऊच नये यासाठी काळजी घेणे.
2. समस्या निवारण करण्यासाठी आधी समस्येचं पूर्ण स्वरूप नीट समजून घ्या. समस्येबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करा.
3. समस्येचा प्रकार समजून घ्या.
अ. समस्या ज्या व्यवस्थित परिभाषित आहेत. म्हणजे Well Defined Problems
ब. समस्या ज्या नीट परिभाषित नाहीत. म्हणजे Poorly Defined Problems
4. समस्या तयार होण्याची कारणे कोणती?
5. समस्या निवारण करण्यासाठी वेळेची किती मर्यादा उपलब्ध आहे?
6. नंतर त्या समस्येचे कार्याच्या प्राथमिकतेनुसार आणि वेळेच्या मर्यादेनुसार भाग पाडा किंवा मोठ्या समस्येचा एक छोटा प्रातिनिधिक नमुना निवडून त्यावर योग्य ते उपाय लागू पडतात का ते तपासून पहा. जर तो छोटा प्रयोग यशस्वी झाला तर त्या प्रयोगाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करून समस्यांचं निराकरण करता येईल.
7. समस्या निवारण करण्यासाठी उपाय कोणते? त्यापैकी किती पर्याय उपलब्ध आहेत? त्या मधील कोणता पर्याय सगळ्यात उत्तम व उपलब्ध वेळेच्या मर्यादेत उपयुक्त आहे? योग्य आणि उत्तम पर्याय निवडण्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे SMAR तत्त्व त्या उपायाला लागू पडतात की नाहीत ते पहावे.
S = Specific, M= Measurable, A= Achievable, R= Realistic d T= Time Bound
8. समस्या निवारण करण्यासाठी कोणती साधने आवश्यक आहेत? त्यापैकी कोणती साधने प्रत्यक्ष कामाची असून उपलब्ध आहेत? त्या साधनांची उपयुक्तता आणि गुणवत्ता कशी आहे?
9. समस्या निवारण करणार्‍या व्यक्तीसाठी कोणत्या क्षमता, ज्ञान व अनुभव आवश्यक आहेत?
10. समस्या निवारण कार्यासाठी किती व्यक्ती-संख्या आवश्यक आहे? त्यापैकी योग्य क्षमता असणार्‍या किती व्यक्ती उपलब्ध आहेत?
 
 
समस्या निवारण पद्धती
समस्या निवारण करण्यासाठी व्यवस्थापनशास्त्रात अनेक पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. उदा. Hypothesis Testing म्हणजे गृहितक चाचणी. म्हणजे समजा असं केलं तर काय होईल आणि तसं केलं तर काय होईल या पद्धतीने पद्धतशीर संशोधन करून समस्या निवारण करण्याचे मार्ग शोधून काढतात. समस्या निवारण करण्याच्या अनेक पद्धती असू शकतात. त्यापैकी काही खाली आकृतीमध्ये दिल्या आहेत.
1. कॉग्निटिव्ह, 2. इनसाईट फुल, 3. इंनोव्हेटिव्ह, 4. होलिस्टिक, 5. सिन्थेसाईज्ड, 6. इनक्विझिटिव्ह, 7. फ्लेक्सिबल, 8. इन्फॉर्मशन बेस्ड व 9. पॅटर्न डिस्कव्हरी इत्यादी.
 
समस्या निवारणातील अडथळे
1. नकारात्मक दृष्टिकोन (Negative Mind-Set) : नकारात्मक दृष्टिकोन हाच सर्वात मोठा अडथळा आहे. कारण सर्व साधने, वेळ, उपयुक्त माणसे असतानासुद्धा निव्वळ नकारात्मक विचारांमुळे सगळी उपलब्ध असलेली संसाधने निरुपयोगी ठरतात. कारण ती मुळी वापरल्याच जात नाहीत.
2. कार्यात्मक मर्यादा किंवा पंगुत्व : नेहमीच्या ठरावीक पद्धतीनेच समस्या तपासणे हा मोठा अडथळा आहे. मर्यादित विचारसरणी व पंगुत्व लोकांना उपाय शोधण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व भिन्न पर्यायांना पूर्णपणे पाहण्यापासून प्रतिबंधित करते.
3. अपूर्ण माहिती व गृहितके (Assumptions) : एखाद्या समस्येला सामोरे जाताना लोक सहसा अडथळे आणि अडथळ्यांबद्दल गृहितक किंवा समजूत बनवतात; जे काही उपायांना प्रतिबंध करतात. उदाहरण क्रमांक 1 च्या न हलणार्‍या खडकाच्या उदाहरणातून हेच शिकायचे की, अपयशी गृहितकांवर विश्वास ठेवून समस्या कायम ठेवू नका. नवीन उत्साहाने जोरदार पण पद्धतशीर प्रयत्न करा; यश मिळेलच!
 
 
वर दिलेल्या उदाहरणांमधून आणि माहितीतून हे स्पष्ट होतं की, समस्या जगाची असो, देशाची असो, संस्थेची असो की व्यक्तीची; प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी समस्या सोडविण्याचे कौशल्य आत्मसात करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सफलतेसाठी प्रत्येकाला आयुष्यात व्यक्तिगत, व्यावसायिक व सामाजिक या तीनही स्तरावर लक्ष द्यावं लागतं. या प्रत्येक बाबतीत येणार्‍या समस्यांचे निर्माण होण्याचे कारण, स्वरूप व प्रमाण वेगवेगळं असतं. तसेच त्या समस्या सोडविण्याची पद्धतसुद्धा एकदम वेगळी असू शकते, पण या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्याला जे कौशल्य आवश्यक असतं, ते मात्र आपल्या बुद्धी, कल्पकता, चिकाटी, सखोल निरीक्षण व विश्लेषण करण्याची क्षमता, शिक्षण, अनुभव याच गोष्टींवर अवलंबून असतं. या शिवाय आज प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. जो या स्पर्धेला तोंड देऊ शकत नाही त्याला वेगवेगळ्या समस्यांना समोर जावं लागतं. तेव्हा स्पर्धेत यशस्वी होण्यासाठीसुद्धा तीच कौशल्यं आपल्याला मदत करू शकतात.
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।
नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः॥
प्रयत्नं किंवा उद्योग केल्यानेच मनोरथ किंवा कार्य पूर्ण होतात, सुस्त बसलेल्या सिंहाच्या जबड्यात किंवा मुखात कधी हरिण स्वतःहून प्रवेश करीत नसते.
 
(लेखक सायकॉलॉजिस्ट, करीअर कौन्सेलर व सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आहेत)
- 9822462968 
••