मुख्यमंत्री ठाकरेंच्या ताफ्यात शिरली आलिशान गाडी

- व्यापार्‍याच्या विरोधात गुन्हा

    दिनांक :14-Sep-2021
|
मुंबई, 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात सोमवारी सायंकाळी अचानक आलिशान गाडी शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यापार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे गृहविभागासोबतची बैठक संपवून निवासस्थानी निघाले होते. त्याचवेळी एक मर्सिडिज मु‘यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली. या प्रकरणी संबंधित मर्सिडिजचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी त्यांच्या वाहनाच्या मागेपुढे सुरक्षा वाहनांचा ताफाही चालतो. मुख्यमंत्री पोलिस मुख्यलयात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसोबतची बैठक संपवून वर्षा निवास्थानी परत येत असताना ही घटना घडली.
 
maha _1  H x W:
 
मलबार हिलदरम्यान एक मर्सिडिज मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात शिरली आणि चालक अतिशय वेगाने कार चालवत होता. त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी वेगाने जाणारी कार थांबवली आणि चौकशी केली असता, चालक मोठा व्यापारी असल्याचे आणि तो मलबार हिल परिसरातच राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 279 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 179 आणि 177 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जिममधून त्याच्या घराकडे जात होता आणि कानाला इअरफोन लावला होता, त्यामुळे त्याचे वाहन कुणासोबत जात होते, हे त्याला माहीत नव्हते. निष्काळजीपणे वाहन चालवल्याने चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने आरोपीला जामीनही मिळाला आहे.