नाशिकमध्ये बनावट नोटा छापणार्‍या टोळीचा पर्दाफाश

    दिनांक :14-Sep-2021
|
नाशिक,
कलर प्रिंटिंगचा व्यवसाय बंद असल्याने चक्क बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नाशिक पोलिसांनी हा छापखाना उद्ध्वस्त केला असून, या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केली आहे. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. या छापखान्याचे धागेदोरे लासलगाव जवळील विंचूरपर्यंत असल्याचेही पोलिसांना समजले आहे. अटक केलेल्या आरोपींनी या छापखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो बनावट नोटा छापल्या आहेत.
 
narh _1  H x W:
 
कोरोना तसेच टाळेबंदीमुळे नाशिकमधील काही तरुणांचा रोजगार गेला. कलर प्रिंटिंगचा व्यवसायही ठप्प झाला होता. हाताला काम नसल्यामुळे या तरुणांनी नोटांचा छापखाना सुरू केला. या छापखान्यात आरोपी वेगवेगळ्या बनावट नोटा छापत होते. मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा छापण्याचे काम या तरुणांकडून सुरू होते. विशेष म्हणजे, नोटा छापण्याचे तसेच त्या बाजारात आणण्याचे काम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केले जायचे. मागील तीन महिन्यांपासून दैनंदिन व्यवहारात बनावट नोटा आणल्या जात होत्या. मात्र, हा प्रकार समोर यायला जास्त वेळ लागला नाही. आजूबाजूच्या व्यापार्‍यांना आमच्याकडे बनावट नोटा येण्याचे प्रमाण वाढल्याचे समजले आणि आरोपींच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला.
 
 
राजकीय क्षेत्रातही खळबळ
दरम्यान, या कारवाईत नाशिक पोलिसांनी एकूण सात जणांना अटक केली आहे. कलर प्रिंटरचा व्यवसाय बंद असल्याने बनावट नोटा छापण्याचे धाडस अटक केलेल्या लोकांनी केले. या घटनेमुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय राजकीय व्यक्तींचा यात काही हस्तक्षेप आहे का, याचादेखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातदेखील खळबळ उडाली आहे.