दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे जाळे

- दोन पाकिस्तान्यांसह सहा दहशतवाद्यांना अटक
- महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेशात सणासुदीला हल्ल्याचा कट उधळला
- अनीस इब्राहिमने उपलब्ध केला निधी

    दिनांक :14-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त केल्याची खळबळजनक माहिती दिल्ली पोलिसांनी आज मंगळवारी दिली. विविध राज्यांत कारवाई करून नवरात्र आणि रामलीलेदरम्यान महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उधळण्यात आला. या कारवाईत दोन पाकिस्तान्यांसह एकूण सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या हल्ल्यांसाठी दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने पाकिस्तानातून निधी उपलब्ध केला, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलिस आयुक्त नीरज ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
natr _1  H x W:
 
महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात कारवाई करून सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने महाराष्ट्रातून जान मोहम्मद अली शेख, दिल्लीतून ओसामा सामी, उत्तरप्रदेशच्या रायबरेली येथून लाला व झीशानला तर मोहम्मद आमिर जावेद आणि अबु बाकरला लखनौ येथून अटक केली. यातील ओसामा आणि झीशान असे नाव असलेल्या पाकड्यांना त्याच देशात प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसोबत या सर्वांचा संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
 
 
दिल्ली पोलिसांनी विविध राज्यांमध्ये केलेल्या कारवाईत या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यापैकी दोघांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला जात आहे. हा कट पाकिस्तानात रचल्याची गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशार्‍याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती नीरज ठाकूर यांनी दिली.
 
 
जान मोहम्मद शेखला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली, तर तीन दहशतवाद्यांना उत्तरप्रदेश एटीएसच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. यातील दोन दहशतवाद्यांना मस्कतमार्गे पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी नेण्यात आले होते. या दोघांना एके-47 रायफलसह इतर घातक शस्त्रांतून गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
 
 
पाकिस्तानातील शिबिरात बांगला भाषकही
घातक शस्त्रे हाताळण्यासाठी पाकिस्तानातील प्रशिक्षण शिबिरात 14 ते 15 बांगला भाषकांचा गटदेखील सहभागी झाला होता, अशी कबुली अटक केलेल्या दोन पाकिस्तान्यांनी दिली. देशात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी पाकिस्तानात समन्वय प्रस्थापित करण्यात आल्याचे या माध्यमातून समोर आले. या हल्ल्यांसाठी पाकिस्तानात दोन चमू तयार करण्यात आल्या. यातील एक चमू दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमची आहे. हवालाच्या माध्यमातून दहशतवाद्यांना निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अनीसवर होती, असे ठाकूर यांनी सांगितले.
 
 
रामलीला आणि नवरात्रीच्या काळात नेमके कुठे आयईडी पेरायचे याची माहिती घेण्याची जबाबदारी दुसर्‍या चमूवर होती. अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून स्फोटके, शस्त्रास्त्रे आणि काडतुसे जप्त करण्यात आली, असे ठाकूर यांनी सांगितले.
पुलवामात दहशतवादी हल्ला, सहा नागरिक जखमी
श्रीनगर, 
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी आज मंगळवारी पोलिस पथकावर हल्ला करण्यासाठी फेकलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात सहा नागरिक जखमी झाले आहेत. हा हल्ला पुलवामातील मु‘य चौकात करण्यात आला. येथून जात असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. मात्र, त्यांचा नेम चुकल्याने या ग्रेनेडचा रस्त्याच्या बाजूला स्फोट झाला, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली आहे.