डॉ. शैलजा रानडे यांना संस्कृत साधना पुरस्कार

    दिनांक :14-Sep-2021
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
येथील ज्येष्ठ शिक्षक आणि संस्कृतच्या अभ्यासक डॉ. शैलजा मधुकर रानडे यांना महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

sadhana puraskar_1 & 
 
 
नागपूरला झालेल्या खास समारंभात डॉ. शैलजा व त्यांचे पती मधुकर रानडे यांना उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, उज्जैनच्या महर्षी पाणिनी संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजयकुमार आणि माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 
 
संस्कृत भाषा अध्ययन, अध्यापन, संशोधन, लेखन, प्रचार या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना हा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जातो. 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
 
 
येथील विवेकानंद विद्यालय आणि कला आणि वाणिज्य महाविद्यालयात संस्कृत शिक्षक म्हणून डॉ. शैलजा रानडे यांनी अध्यापन कार्य केले. व्याकरण सुरभि, निबंधज्योत्स्ना, स्वप्नवासवदत्त, अभिज्ञान शाकुंतल, तीन नायिका, कालिदास कथा, सुभाषित रसास्वाद, शुकनासोपदेश, पाणिनीय व्याकरण, संस्कृत बडबडगीते या पुुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.
 
 
 
स्वाध्याय मंडळ किल्लापार्डीचे परीक्षा केंद्र सलग 25 वर्षे चालविणे, संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या केंद्राधिकारी, विद्यावर्धिनी यवतमाळ शाखेतर्फे 12 वर्षे संस्कृत पाठांतर स्पर्धा, 1990 पासून संस्कृत भारतीच्या अध्यक्ष, कालिदासाच्या ‘मेघदूत’चे समश्लोकी भाषांतर, गीर्वाण भारती व वेदामृतधारा या लेखमाला, पाठ्यपुस्तक मंडळ पुणे आणि अमरावती विद्यापीठ अभ्यास मंडळाचे सदस्य हेही डॉ. रानडे यांचे उल्लेखनीय कार्य आहे.