हेरगिरीच्या आरोपात डीआरडीओच्या चार कंत्राटी कर्मचार्‍यांना अटक

    दिनांक :14-Sep-2021
|
बालासोर, 
गोपनीय माहिती पाकिस्तानी हेराला पुरवण्याच्या आरोपाखाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओच्या येथील एकीकृत चाचणी केंद्रावरील चार कंत्राटी कर्मचार्‍यांना आज मंगळवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही कर्मचारी गोपनीय माहिती पाकिस्तानी हेरांना पुरवत आहेत. पाकिस्तानी हेरांसोबत आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे बालासोर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
natr _1  H x W:
 
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पोलिस अधीक्षक आणि काही पोलिस निरीक्षकांचा समावेश असलेल्या पोलिस पथके तयार करण्यात आली. या पथकांनी डीआरडीओच्या कंत्राटी कर्मचार्‍यांवर छापेमारी करून त्यांना ताब्यात घेतले. विदेशी हेरांना गोपनीय माहिती देऊन बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोप या चार कंत्राटी कर्मचार्‍यांवर ठेवण्यात आला आहे. त्यांच्याकडून काही आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असल्याचे स्पष्ट करीत डीआरडीओच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी प्रतिकि‘या व्यक्त करण्यास नकार दिला.