ममतांचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याची शक्यता

भाजपाच्या प्रतिनिधीची आयोगाकडे तक्रार
मुख्यमंत्र्यांनी स्वत:विरुद्धचे गुन्हे लपविल्याचा आरोप

    दिनांक :14-Sep-2021
|
कोलकाता, 
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची जोरदार मागणी भाजपाच्या निवडणूक प्रतिनिधीने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याविषयी भाजपाच्या प्रतिनिधीने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पत्र लिहिले असून, यात ममता बॅनर्जींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्यात होणारी पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विशेषत: मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर ही निवडणूक अधिकच उत्कंठावर्धक झाली आहे. बंगालच्या मु‘यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी ममतांना त्यांच्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघातून विजय मिळवणे आवश्यक आहे.

natr _1  H x W:
 
ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रियांका टिबरेवाल यांना त्यांच्याविरोधात उभे केल्यानंतर आता भाजपाच्या निवडणूक प्रतिनिधीने ममता बॅनर्जींचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार प्रियांका टिबरवाल यांच्या निवडणूक प्रतिनिधीने ममता बॅनर्जी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत येथील निवडणूक अधिकार्‍यांना पत्र लिहिले आहे. ममता यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:विरुद्ध प्रलंबित असलेल्या पाच गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख केलेला नाही, असे प्रियांका टिबरवाल यांचे प्रतिनिधी सजल घोष यांनी निवडणूक अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.