ओडिशा कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचेसुद्धा आयोजन करण्याची शक्यता

- ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड संघाचा सहभाग अनिश्चित

    दिनांक :14-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
यावर्षी भारतात 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे, परंतु आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) या विश्व हॉकी स्पर्धेचे आयोजन करणार्‍या शहराचे नाव अद्याप जाहीर केले नाही. या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत लखनौ आणि आता ओडिशाचे नावसुद्धा चर्चेत आहे.
 
natr _1  H x W:
 
या विश्वचषक स्पर्धेत 2016 सालचा विजेता भारतीय संघ आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी झुंजणार आहे. स्पर्धा सुरू होण्यास केवळ दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अशातच हॉकी इंडियानेच यजमान शहराचे नाव निश्चित करावे, अशी एफआयएचची इच्छा आहे. वरिष्ठ गट महिलां हॉकी विश्वचषक स्पर्धा 5 ते 16 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या पोटचेफस्ट्रममध्ये होणार आहे. आगामी कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमान शहर अद्याप निश्चित झाले नाही, असे एफआयएचच्या संचार विभागाने सांगितले. तथापि, या स्पर्धेच्या तयारीसाठी आम्ही हॉकी इंडियाच्या कायम संपर्कात आहोत व एका भव्य स्पर्धेच्या आयोजनाची प्रतीक्षा करीत आहोत. या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत तीन शहरांच्या यादीत गुवाहाटी तिसर्‍या क‘मांकावर आहे. स्पर्धेचे आयोजन करु इच्छिणार्‍या राज्याशी चर्चा सुरु आहे.
 
 
टोकियो ऑलिम्पिकनंतर भारतीय संघांचे प्रायोजकत्व 2032 पर्यंत वाढवणारे ओडिशा राज्य 2023 पुरुषांच्या विश्वचषकाचेही यजमानपद भूषविणार आहे. यापूर्वी 2018 साली झालेली पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा ओडिशामधील भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होती. तसेच भारताने 2106 साली जिंकलेल्या कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले होते. दोन्ही शहरांमध्ये पायाभूत सुविधा व जागतिक स्पर्धांचे आयोजन करण्याचा अनुभव आहे.
 
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड माघार घेण्याची शक्यता
भारतात होणार्‍या कनिष्ठ पुरुषांच्या व दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या कनिष्ठ महिलांच्या हॉकीविश्वचषक स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड माघार घेण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवरील प्रवासनिर्बंधामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा स्पर्धेतील सहभाग अनिश्चित असल्याचे ऑस्ट्रेलियातील हॉकीच्या सूत्रांनी सांगितले. कनिष्ठ विश्वचषकात सहभागी होणार्‍या संघांच्या अडचणी संदर्भात एफआयएच लवकरच निर्णय घेणार आहे, असे ओशनिया हॉकी महासंघाचे महासचिव बॉब क्लॅक्सटन यांनी सांगितले.