पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार!

    दिनांक :14-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात इंधन दरवाढीचा मार यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार विचार करीत आहे. इंधनावर देशभरात ‘एक दर, एक कर’ हे धोरण अवलंबिण्याचा प्रस्ताव केंद्रासमोर आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना इंधन दरवाढीबाबात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
 
nmatr _1  H x W
 
जीएसटीवर मंत्र्यांची समिती देशभरात ‘एकच दर’ या स्वरूपात पेट्रोलियम उत्पादनावर कर लावण्याच्या विचारात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच लखनौ येथे झालेल्या 45 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. जीएसटीत कोणताही बदल करण्यासाठी समितीच्या तीन चतुर्थांश मान्यतेची गरज असते. या जीएसटी परिषदेत सर्व राज्यांचे प्रतिनिधी असतात. यातील काहींनी इंधन जीएसटीच्या कक्षेत सामावून घेण्यास विरोध केला. कारण, इंधनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर आकारणी होते. राज्याला मिळणारा महसूल केंद्राच्या कक्षेत आणण्यासाठी राज्याच्या प्रतिनिधींचा नकार आहे.
 
 
यावर्षी मार्च महिन्यात एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाने आपल्या अहवालात म्हटले होते की, जर पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणले गेले तर केंद्र आणि राज्याच्या महसुलात केवळ 0.4 टक्के म्हणजे एक लाख कोटी रुपये कमी होतील. पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले गेले, तर देशभरात पेट्रोल 75 रुपये आणि डिझेल 68 रुपये प्रति लीटर या दराने मिळेल.