पंतप्रधान मोदी क्वाड संमेलनात होणार सहभागी

- अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार

    दिनांक :14-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
भारत आणि अमेरिकेसह चार देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या क्वाड या संघटनेच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. क्वाड संमेलनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी अमेरिकेचा दौरा करणार आहेत. 24 सप्टेंबर रोजी क्वाड संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे प्रमुख पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे एकमेकांसमोर बसून चर्चा करणार आहेत.
 
natr _1  H x W:
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या संमेलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन तसेच जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा हेदेखील सहभागी होणार आहेत. अमेरिकेच्या व्हॉईट हाऊसमध्ये हे चारही नेते परस्परांशी संवाद साधतील. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांनी एका पत्रकार परिषदेत क्वाड लीडर्स समिटची घोषणा केली. राष्ट्रपती ज्यो बायडेन प्रथमच क्वाड शिखर संमेलनाचे यजमानपद भूषवणार आहेत. या निमित्ताने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ज्यो बायडेन यांची दुसर्‍यांदा मोदींशी प्रत्यक्ष भेट होणार आहे.
 
 
कोरोना काळातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा परदेश दौरा आहे. याअगोदर त्यांनी बांग्लादेशला भेट दिली होती. कोरोनाचा संसर्ग, भारत-प्रशांत महासागर क्षेत्र, सायबर स्पेस तसेच तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर या चारही देशांत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या संमेलनानंतर 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करण्याची शक्यता आहे. क्वाड ही चीनविरोधी देशांची हातमिळवणी असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी क्वाडला आशियन नाटो म्हणूनही संबोधले होते. नाटो ही अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युरोपियन देशांची तयार करण्यात आलेली सैन्य संघटना आहे. परंतु, विरोधकांचे आरोप भारतासह इतर सदस्य देशांकडून अनेकदा फेटाळण्यात आले आहेत.