जपानच्या हद्दीत रशियन विमानाची घुसखोरी

लढाऊ विमानांनी पिटाळले

    दिनांक :14-Sep-2021
|
टोकियो, 
चिनी पाणबुडीनंतर रशियाच्या अँटोनोल एएन-26 या विमानाने जपानच्या हद्दीत घुसखोरी केली. त्यानंतर जपान हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी या विमानाला आपल्या देशाच्या हद्दीतून पिटाळून लावले. रशियाच्या या विमानाने रविवारी होक्काइडो बेटाजवळ हवाई हद्दीचे उल्लंघन करत कथित दोन वेळेस जपानच्या भागात घुसखोरी केली. याआधी चीनची एक पाणबुडीदेखील जपानच्या सागरी सीमेजवळ गस्त घालताना आढळून आली होती.
 
inte _1  H x W:
 
जपानच्या परराष्ट- मंत्रालयाने रशियन राजदूताला बोलावणे धाडत या कृतीबद्दल हरकत नोंदवली. त्याशिवाय जपानच्यावतीने रशियाला या घटनेचा निषेध करणारे पत्र पाठवण्यात आले आहे. जपानच्या हद्दीत घुसखोरी करणारे हे विमान लष्करी नव्हे तर नागरी विमान असल्याचा दावा करण्यात येत आहे.
 
 
वादाचे कारण काय?
जपान कुरील बेटांवर आपला दावा सांगतो. जपान या बेटांना उत्तर क्षेत्र संबोधतो. सोव्हिएत महासंघाने या बेटांना दुसर्‍या महायुद्धा दरम्यान ताब्यात घेतले होते. तेव्हापासून या बेटाच्या अधिकारावरून वाद सुरू आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मागील काही दशकांपासून राजनयिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनीदेखील रशियासोबत हा वाद संपवण्यासाठी प्रयत्न केले होते. कुरील बेटांच्या संरक्षणासाठी रशियन नौदलाकडून गस्त घातली जाते. रशियाचे पूर्व आरमारावर पॅसिफिक महासागर क्षेत्रातील सुरक्षितेची जबाबदारी आहे. या आरमारामध्ये काही घातक युद्धनौका आणि पाणबुडींचा समावेश आहे. रशियन नौदलाकडून या भागात युद्ध सराव आणि क्षेपणास्त्र चाचणी केली जाते.