पुलगावचा प्रसिद्ध गणेशोत्सव

राहिल्या फक्त आठवणी

    दिनांक :14-Sep-2021
|
अविनाश भोपे
पुलगाव, 
राज्यात ख्याती असलेल्या येथील गणेशोत्सवातील गर्दी, रोषणाई, स्वयंचलित देखावे, जत्रेतील दुकाने, सर्कस, विविध आकर्षणे आता काळाच्या पडद्याआड गेली. ब्रिटिशांनी सुरू केलेला मुंबई हावडा रेल्वे मार्ग, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट ही कापुस उत्पादक क्षेत्रे, नदीमुळे उपलब्ध मुबलक पाणी त्यामुळे उद्योगासाठी पुलगावची निवड केली. त्यामुळे गणेश स्थापनेची परंपरा येथील भारत गिरणीत सुरू झाली. 
 
ganeshotsav_1  
 
 
तत्कालीन संचालक जयकृष्णपंत दीक्षित, रामचंद्र भार्गव, सखाराम कृष्ण पाठक, गंगाधर गाडगीळ, रावबहादूर खरे यांनी गणेशोत्सवाला स्वरूप द्यायला सुरुवात केली. येथील कॉटन मिल मधील गणेशोत्सवामध्ये गायन, नकला, सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, आदी विविध कार्यक्रमांचा साज चढला. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करून ब्रिटिश राजवटी विरुद्ध आवाज उठविला जात होता. या कापड गिरणीला सुरवातीला गणेश मिल आणि व्यापार चिन्ह श्री गणेश होते. तेच ठप्पे कापडावर मारले जायचे. दीक्षितानंतर नागरमल पोद्दार यांनी गिरणी चालवली. हनुमानप्रसाद नेवटिया यांनी 1939 च्या दरम्यान ही कापड गिरणी विकत घेतली.
 
 
 
आपल्या व्यापाराच्या प्रचारासाठी मिल मालकांनी गणेशोत्सवाला भव्य स्वरूप द्यायला सुरुवात केली. गिरणीवर विद्युत रोषणाई केली जाई. उद्यानाच्यावर व गिरणीच्या बाहेरील भागात स्वयंचलित धार्मिक देखावे सादर केले जात. मुख्य सभागृहात गणेशासमोर रोज स्वयंचलित बदलते देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असायची. गणेशोत्सव बघण्यासाठी येणार्‍या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दुकाने मिलपासुन तर लंगडा जिन (आताचे बस स्टॉप) पर्यंत लागायची. सर्कस मैदानावर मीना बाजार, आकाश पाळणे, मौत का कुआ, विविध खाद्य पदार्थ यांची रेलचेल असायची.
 
 
 
80 आणि 90 च्या दशकातील जीवनकाळ ज्यांनी आपल्या डोळ्याने पाहिला आहे, त्यांच्या आठवणीमध्ये पुलगावचा गणेशोत्सव हा स्वर्णिम इतिहास असून पुलगावच्या गतवैभवाचे प्रत्यक्षदर्शी असल्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यात दिसून येतो. विदर्भात पुलगावचा गणेशोत्सव ही पर्वणी होती. मिल ते सर्कस मैदान पर्यंतचा 2 किमी रस्ता भाविकांच्या गर्दीने दहा दिवस सदैव गजबजलेला असायचा. या उत्सवाच्या तयारीसाठी मिल मधिल अनेक अधिकारी, कामगार, कारागीर महिनाभर आधीपासून मिल मध्ये कामाला लागायचे. मिल बाहेरील काही कला क्षेत्रातील तज्ज्ञ विनामूल्य सेवा देत होते. झांकी देखावे बघण्यासाठी दूरवरून लोकं पुलगावला धडकत असे. मिलमधील सर्व इमारतीवर केल्या जाणारी आकर्षक रोषणाई डोळ्याचे पारणे फेडत असे. अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देण्यासाठी निघणार्‍या मिरवणुकीतील गर्दीसाठी पुलगावला जागा कमी पडत होती. दहा दिवसाच्या गणेशोत्सवात कोट्यवधीची उलाढाल होत असे. नजिकच्या काळात शहरातील गणेशोत्सव मंडळांनी गावात विविध देखावे निर्माण करून व शेवटल्या दिवशी मिरवणुकीत देखावे व आकर्षक बँड पथकासह सहभागी होऊन रंगत आणली होती. पुलगाव मिलच्या मिरवणुकीत चाळीसगावचे प्रसिद्ध बॅण्ड पथक सर्वांचे आकर्षण होते.