पेंचमधील किंगफिशर वाघाला सुटली खाज ... बघा व्हिडीओ

    दिनांक :14-Sep-2021
|
- पर्यटकांना पाण्यात पोहत असताना वाघाचे दर्शन
- वाघाचा व्हीडीओ व्हायरल
नागपूर, 
अभयारण्यात वाघाचं दर्शन व्हावं म्हणून पर्यटक तासनतास जंगलात वाट पाहत असतात. पण वाघाची झाडाझुडपातून झलक नव्हे तर तो झाडासोबत खेळत असेल किवा पाण्यात पोहत असेल तर...! पर्यटकांसाठी तो आनंदाचा क्षण असतो. पेंच व्याघ्र प्रकल्पात गेलेल्या पर्यटकांना किंगफिशर नावाच्या वाघाने अशा प्रकारे दर्शन दिले. किंगफिशरच्या कृतीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. तो व्हीडीओ व्हायरल झाला आहे. जानेवारी महिन्यात वाघाने हरणाच्या पाडसाची शिकार केल्याचा व्हीडीओ एका पर्यटकाने व्हायरल केला होता. 
 
waghh _1  H x W
 
 
तणाव घालविण्यासाठी पर्यटक जंगल भ्रमंतीला पसंती देतात. यातही पेंच व ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पहिली पसंती असते. महाराष्ट्राच्या सीमेवरील पेंच व्याघ्र प्रकल्पात अलिकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी वाघाची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक तासनतास प्रतीक्षा करतात. अलिकडेच येथील किंगफिशर नावाच्या वाघाने पर्यटकांना दर्शन दिले.
 
 
 
जंगलातील कुठल्यातरी मोठ्या झाडाजवळ दोन पायावर उभा राहून किंगफिशर नावाचा हा वाघ जणू झाडासोबत खेळत असल्याचे ते चित्र मोबाईलमध्ये कैद केले आहे. किंगफिशर झाडाजवळ आपली उंची मोजत असल्याची चर्चा आहे. तर वन्यजीव तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात ओलसर त्वचेवर सुटणारी खाज झाडाच्या लाकडावर घासून दूर करतो ही एक नैसर्गिक कृती आहे.
 
 
 
दुसऱ्या व्हीडीओत किंगफिशर वाघ अतिशय शांतपणे पाण्यात पोहत आहे. पाण्याचा मनमुराद आनंद घेत असल्याचा व्हीडीओसुध्दा व्हायरल झाला आहे. पर्यटकांना वाघाचे अशा प्रकारे दर्शन झाल्यास आपली जंगल सफारी पूर्ण झाल्याचा आनंद असतो. हे दोन्ही व्हीडीओ चार दिवसातील आहेत. वाघाच्या या कृत्याचा पर्यटक आनंद घेत आहेत.