सोमय्या ईडीकडे, मुश्रीफ पवारांकडे?

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    दिनांक :14-Sep-2021
|
मुंबई, 
ग्रामविकास मंत्री हसन मश्रीफ यांच्याविरोधातील पुरावे घेऊन भाजपाचे नेते किरीट सोमय्या आज मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीकडे गेले, तर हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण आले. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी याबाबतचे तपशील अधिकृतरीत्या समोर आलेले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
 
ngag _1  H x W:
 
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील 2700 पानांचे पुरावे ईडीच्या कार्यालयात जमा केले आहेत. त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांनी आज दुपारी ईडीच्या कार्यालयात सादर केले. ईडीच्या अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांना कागदोपत्री पुरावे दिले आहेत, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. हसन मुश्रीफ सोमवारी बोलत होते. त्यांना मी आज सांगतो की, सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात घोटाळा केला. या कंपनीत शेतकरी नव्हे, तर हसन मुश्रीफ व त्यांचे कुटुंबीय समभागधारक आहेत. शेतकर्‍यांनी या साखर कारखान्यामध्ये गुंतवणूक केली आहे. पण, हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबातील सहा व्यक्तींचा सहभाग यात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला .
 
 
अबिद हसन मुश्रीफ, नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला अबिद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावाने 13 कोटी 30 लाख 49 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. हसन मुश्रीफ यांनी बेकायदेशीर सावकारी करीत 78 कोटी 91 लाख 51 हजार 830 रुपयांचे समभाग घेतले, असा आरोप सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी ईडीचे कार्यालय गाठल्यानंतर धास्तावलेले हसन मुश्रीफ तातडीने शरद पवार यांच्या भेटीला गेले. तथापि, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप बाहेर आले नाही. आघाडी सरकारच्या भ‘ष्टाचाराविरोधात भाजपाने व्यापक मोहीम हाती घेतल्याने आघाडीतील मंत्र्यांना घाम फुटला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.