18 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

    दिनांक :14-Sep-2021
|
नागपूर, 
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये आतापर्यंत पहिला आणि दुसरा डोज मिळून एकूण 18 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 13 सप्टेंबरपर्यंत नागपूर शहरातील 12 लाख 74 हजार 937 नागरिकांनी पहिला डोज व 5 लाख 51 हजार 115 नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. 
 
corona vaccine_1 &nb
 
 
आतापर्यंत पहिला आणि दुसरा असे मिळून एकूण 18 लाख 26 हजार 52 कोरोना लसींचे डोज मनपाच्या लसीकरण केंद्रांसह, शासकीय व खाजगी केंद्रांमधून देण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी घेत नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस मिळावी यासाठी मनपाद्वारे विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत. लसीकरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मनपाची आरोग्य चमू झोपडपट्टी भागांमध्ये जाऊन लसीकरणासाठी नागरिकांचे समुपदेशन करते व ज्यांनी अद्यापही लस घेतली नाही, त्यांचे तिथेच त्यांच्या घरी लसीकरण करण्यात येत आहे.
 
 
 
नागपुरात टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू करण्यात आले. प्रथम चरणात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, दुसर्‍या चरणात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील गंभीर आजार असणारे, तिसर्‍या टप्प्यात 45 वर्षावरील सर्व व्यक्ती, चौथ्या टप्प्यात 30 वर्षावरील सर्व व्यक्ती तर पाचव्या टप्प्यात 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले. प्रारंभी मनपा व शासकीय रुग्णालये मिळून केवळ चार केंद्रांवर सुरू करण्यात आलेले लसीकरण आज 160 पेक्षा अधिक केंद्रांवरून होत आहे. गर्दीचे योग्य नियोजन आणि व्यापक जनजागृतीमुळे नागपूर शहराने लसीकरणाच्या पहिल्या डोजचा 10 लाखांचा टप्पा 5 ऑगस्ट रोजी पार केला.
 
 
 
तर आज दोन्ही डोजचा आकडा 18 लाखांच्यावर पोहोचला आहे. यामध्ये 75 हजार 496 आरोग्य कर्मचारी, 92 हजार 312 फ्रंट लाईन वर्कर, 18 ते 44 वर्ष वयोगटातील 7 लाख 11 हजार 679 व्यक्ती, 45 ते 60 वर्ष वयोगटातील 4 लाख 43 हजार 138 व्यक्ती, 45 ते 60 वर्ष वयोगटातील गंभीर आजार असलेले 1 लाख 31 हजार 562 व्यक्ती तर 60 वर्षावरील 3 लाख 71 हजार 865 अशा एकूण 18 लाख 26 हजार 52 व्यक्तींनी पहिला व दुसरा डोज घेतला आहे.
 
 
 
नागरिकांचे अभिनंदन
कोरोना काळात नागरिकांनी पाळलेले निर्बंध, आजही सुरू असलेली त्याची अंमलबजावणी, नागरिकांचे मिळत असलेले सहकार्य आणि नागरिकांनी लसीकरणाला दिलेला प्रतिसाद यामुळे नागपूर शहर कोरोनावर नियंत्रण मिळवू शकले, अशी प्रतिक्रिया देत, महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूरकरांचे अभिनंदन केले आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या संपूर्ण आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. योग्य नियोजनाच्या भरवशावरच नागपुरातील लसीकरण उद्दिष्टपूर्तीकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.