आम्हाला जगात प्रथम क‘मांकाचा संघ व्हायचेय् : शमशेर सिंह

    दिनांक :14-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणे ही भारतीय पुरुष हॉकी संघाची केवळ सुरुवात आहे. एक संघ म्हणून आमच्याकडे अजून बरेच लक्ष्य आहे. आम्हाला जगातला अव्वल क्रमांकाचा संघ व्हायचे आहे, असे भारताचा आक्रमक हॉकीपटू शमशेर सिंह म्हणाला. अलिकडेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने प्रेरणादायी कामगिरी केली. भारताने जर्मनीला 5-4 अशा गोलफरकाने पराभूत करून कांस्यपदक जिंकले. तब्बल 41 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे पदक मिळाले आहे.
 
natr _1  H x W:
 
अनेक लक्ष्यांमधील ऑलिम्पिक पदकाची कामगिरी आम्ही फत्ते केली, परंतु आम्ही गत काही वर्षांपासून जगातील सर्वोत्तम संघ होण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे तो म्हणाला. भविष्यात होणार्‍या प्रत्येक सामन्यात विशेषत: एफआयएच हॉकी प्रो लीगसारख्या मोठ्या स्पर्धेतील सामन्यात आम्ही शंभर टक्के योगदान देणार आहोत. जर आम्ही प्रत्येक सामन्यात आपल्या कामगिरीत सुधारणा करीत राहिलो, तर एक दिवस आम्ही निश्चितच जगात प्रथम क‘मांकावर असणार आहे, असे तो म्हणाला.
 
 
टोकियो ऑलिम्पिकला नेहमीच माझ्या हृदयात एक विशेष स्थान असेल. कारण माझ्या कारकीर्दीतील सुरुवातीच्या काळातच मी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाचा सदस्य होतो, हे माझे भाग्य समजतो. एक संघ म्हणून आमच्यासाठी ही केवळ सुरुवात आहे, याची मला जाणीव आहे, असेही तो म्हणाला. आम्ही भविष्यात आणखी चांगली कामगिरी करू शकतो, यावर माझा विश्वास आहे. आगामी काळात आम्ही आपल्या ध्येय धोरणांच्या दिशेने काम करणार आहोत, असे त्याने सांगितले.
 
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला इतिहास रचण्यास कोणते योगदान दिले, असे विचारले असता 24 वर्षीय शमशेर म्हणाला की, आम्ही मैदानावर कधीही हार न मानण्याची वृत्ती जोपासली. कांस्यपदकाच्या लढतीत आम्ही जर्मनीविरुद्धच्या पिछाडीवर असतानाही संधींवर विश्वास ठेवणे कधीच सोडले नाही व गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहिलो. आम्हाला कल्पना होती की, जर आम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणत राहिलो, तर शेवटी विजय आमचाच होईल आणि शेवटी तेच घडले.