‘रिंग सेरेमनी’

    दिनांक :15-Sep-2021
|
विनीत भाष्य :
 
- श्रीनिवास वैद्य
  
वैनगंगा नदीच्या काठी असलेल्या आरमोरी शहराच्या पुढे 15 कि.मी., गडचिरोली मार्गावर वैरागड नावाचे लहानसे गाव आहे. एकेकाळी ते समृद्ध असले पाहिजे. तशा खाणाखुणा आजही तिथे दिसतात. फार पूर्वी तिथे हिर्‍यांचा व्यापार होत असे, असे सांगितले जाते. त्या गावी जाण्याचा दोनदा प्रसंग आला. निमित्त होते, आमच्या कुटुंबातीलच एक घटक झालेल्या तरुणाचा साक्षगंध. पाच-पन्नास जणांचाच कार्यक्रम होता. परंतु, त्यासाठी मंडप घातला होता. त्यातील एका पडद्यावर, थर्मोकोलच्या फलकावर ‘रिंग सेरेमनी’ असे रोमन लिपीत लिहिले होते. मला आश्चर्य वाटले. मुळात तसे लिहिण्याची गरजच नव्हती. परंतु, लिहायचेच होते तर, साक्षगंध किंवा साधे शालमुंदी असेही लिहिता आले असते. असो. नेहमीच्या परंपरेप्रमाणे साक्षगंधाचा कार्यक्रम झाला. नंतर एका टीपॉयवर केक आणण्यात आला आणि आता नियोजित वर-वधू दोघेही एकसाथ केक कापतील, असे घोषित झाले. आश्चर्याचा हा दुसरा धक्का होता. साक्षगंधाला केक? मग कळले की, नियोजित वधूने केक बनविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. म्हणून मग, कुठल्याही कार्यक्रमाला केक कापायचा का? असे असेल तर मग तेरवीच्या कार्यक्रमातही केक कापला जाण्याचे दिवस दूर नाही म्हणायचे! हौसेला मोल नसते, असे आपण म्हणतो; परंतु, काही तरी ताळतंत्र नक्कीच ठेवायला हवे, असे मला वाटते.

editp _1  H x W
 
नंतर पुन्हा एकदा या गावी जाण्याचा योग आला. निमित्त होते, नियोजित वराचा वाढदिवस. तिथे गेल्यावर पुन्हा केक आला. मागे पडद्यावर रोमन लिपीत ‘हॅपी बर्थ डे’ची रंगीबेरंगी अक्षरे झळकत होती. आनंदाने मेणबत्त्या विझविण्यात आल्या. नंतर पाच सवाष्णींनी त्याला ओवाळले. त्यावेळी बोडखे असलेल्या त्या वराने डोक्यावर हात धरला. नंतर ‘अक्षत भरण्यात आली’. हा सर्व कार्यक्रम सुरू असताना, माझ्या बाजूला बसलेल्या एका तरुणाने अतिशय मार्मिक भाष्य केले. तो म्हणाला- बायबलमध्ये केक कापल्यानंतर सवाष्णींनी ओवाळणे व अक्षत भरणे कार्यक्रम लिहिला असेल बहुधा. हा असला प्रकार थांबविण्याचे त्याच्या शक्तीपलिकडे असेल आणि म्हणून त्याने तिरकस शब्दबाण चालवून आपला उद्वेग व्यक्त केला. खेड्यातही असा विचार करणारे अन् तेही तरुण आहेत, हे बघून मला समाधान वाटले. परंतु, माझ्यासारख्या शहरी मध्यमवर्गीला या प्रकारावर टीका करणे नैतिक वाटले नाही. कारण, हे सर्व लोण खेडोपाडी जे पसरले आहे, ते शहरातूनच आले आहे. आम्ही आमचे कंबरेचेही सोडून बसलो आणि आता ग्रामीण भागाला कुठल्या तोंडाने म्हणणार?
 
 
तसाही ग्रामीण भाग हा शहराभिमुख असतो. शहरात जे काही आहे किंवा घडत असते, ते म्हणजे आधुनिक, तो म्हणजे विकास अशी त्याची श्रद्धा असते आणि त्यानुसार हा भाग स्वत:ला बदलवीत असतो. शहरात जमिनीवर टाईल्स आल्या. खेडोपाडीही लोकांनी शेणाने सारवलेल्या जमिनीवर टाईल्स लावल्या. आता शहरात मातीच्या जमिनीची टूम येत आहे. शहरातील लोकांना चोवीस तास दुधाचा मुबलक पुरवठा व्हावा म्हणून, विदेशी वंशाच्या गायी पाळण्याचा सल्ला ग‘ामीण भागाला देण्यात आला. शहराला मुबलक दूध मिळू लागले. परंतु, या विदेशी वंशाचे बैल शेतीच्या कामासाठी निरुपयोगी असल्याने, ग‘ामीण भागातील कृषि-चक‘ व कृषि-तंत्र धोक्यात आले. आता शहरात देशी गाईच्या दुधाला भलतेच महत्त्व आले आहे. शहरी मध्यमवर्गीयांच्या या वागण्याने ग्रामीण भाग गोंधळलेला आहे. हातचे, आपले पारंपरिक सोडून शहराचे ऐकायचे, तर काही काळानंतर शहरे पारंपरिकतेकडेच वळताना दिसतात. भाकरी खाणे दारिद्र्याचे लक्षण आहे, हे शहराने खेडोपाडी बिंबविले. आता खेडोपाडी ज्वारी गेली. कुणी पेरतदेखील नाही. तिथे गहू आलेत. परंतु, शहरात मात्र भाकरी खाणे प्रतिष्ठेचे आणि आरोग्याचे मानले जाऊ लागले. आता ग‘ामीण भागात पुन्हा एकदा ज्वारीचा पेरा कुणी वाढवायचा? पारंपरिक दंतमंजन खरखरीत असल्याने दातांना इजा होऊ शकते, म्हणून चोपडे मंजन वापरण्याच्या जाहिरातींचा मारा करण्यात आला. बोटांनी दात घासणे, अनारोग्याचे व मागासलेले ठरविण्यात आले. त्यामुळे खेडोपाडीही टूथब्रश व टूथपेस्ट आली. शहरात मात्र बोटांनी दात घासणे व खरखरीत दंतमंजन वापरण्याची प्रथा सुरू होत आहे. पुरेसे अन्न मिळावे म्हणून शहरांनी रासायनिक खते व संकरित बियाण्यांची शिफारस केली. आता धान्याचा मुबलक साठा उत्पन्न होत असल्यानंतर, शहरे म्हणतात की, नैसर्गिक अथवा सेंद्रिय शेती करा. नुसता गोंधळ सुरू आहे. आणि मग शहरातील विचारवंत आपला समाज कुणीकडे चालला आहे, यावर चिंतन व चिंता करीत बसतात. त्यावर प्रबंध लिहितात. पदव्या मिळवितात. पगारवाढ किंवा प्रचंड मानधन कमवितात. ग्रामीण भाग मात्र या गोंधळाच्या सरोवरात डुबक्याच मारीत राहतो.
 
 
आमच्या गावात मदर टेरेसा कॉन्व्हेंट आहे. आता मदर टेरेसा व आमच्या गावाचा काय संबंध? ही व्यक्ती ना जातीची, ना पातीची, ना प्रांताची, ना भाषेची अन् ना देशाची! तरीही या नावाने कॉन्व्हेंट काढण्यात आले. संचालक मंडळींना त्याचे काहीही वाटत नसावे. शहरात आहे, म्हणून खेड्यातही याच नावाने कॉन्व्हेंट काढले असावे. कॉन्व्हेंटला अशाच प्रकारचे नाव देतात, असेही कदाचित त्याच्या मनात असावे. आता नावच द्यायचे तर एखाद्या स्थानिक महापुरुषाचे नाव देता आले असते. आमचे गाव घोराडचे संत केजाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले गाव आहे. सर्व गावकर्‍यांची संत केजाजी महाराजांवर नितांत श्रद्धा आहे. त्या केजाजी महाराजांचे नाव देता आले असते. ते पसंत नसेल तर, एखाद्या भारतीय महापुरुषाचे नाव? तेही नसेल तर स्वत:च्या आईवडिलांचे किंवा पूर्वजांचेही नाव देता आले असते. पण, नाही; मदर टेरेसांचे नाव दिले. आता ग्रामीण भागात ‘आई, बाबा, बाबाजी, माय’ हे शब्द तर केव्हाच अस्तंगत झाले आहेत. ‘पपा, मम्मी’ या शब्दांनी जागा घेतली आहे. चैत्र गौरीचे हळदीकुंकू, भराडी गौर इत्यादी निमित्ताने आप्तस्वकीयांचे एकत्रीकरण होत असे. मूळ उद्देश तोच होता. परंतु, त्याला मागासलेले, पुरुषप्रधान संस्कृतीचे लक्षण ठरविण्यात आले. लोकांनी या कार्यक‘मांना नाके मुरडली. परंतु, शहरात आप्तस्वकीयांच्या एकत्रीकरणाची गरज भासू लागती तर, हळदीकुंकूसार‘या कार्यक‘मातील अनिष्ट प्रथा बाजूला सारून पुन्हा त्या प्रकारांचा अवलंब करण्यात आला नाही. त्याऐवजी किटी पार्टी, ‘भिशी’, वाढदिवसाचे समारंभ यांचा आधार घेण्यात आला. आता हेच लोण खेडोपाडी पोहोचले आहे.
 
 
ही परभृत मानसिकता शहरानेच ग्रामीणांच्या अंगात मुरविली आहे, असे मला वाटते. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे पश्चिमेकडे तोंड वासून बसण्याची मानसिकता अंगी शिरली, असा युक्तिवाद इथे करता येईल. त्यात सत्यांश असेलही. परंतु, इतकी पश्चिमाभिमुखता? की, स्वातंत्र्यानंतर 100 वर्षे होत असतानाही, अजूनही आम्हाला ‘स्व’चे भान येऊ नये? या संदर्भात पूजनीय श्रीगुरुजींनी असल्या मानसिकतेच्या भारतीयांना चांगलेच खडसावले आहे. ते म्हणतात- ‘व्यक्तिगत आणि कौटुंबिक असे दोन पैलू असलेले आपले जे जीवन आहे, ते आपल्या राष्ट्रजीवनाच्या ऐतिहासिक लक्षणांशी जुळणारे आहे किंवा नाही याचाही आपण विचार केला पाहिजे. म्हणजेच आपल्या राष्ट्रात जे महान् गुण असल्यामुळेच त्याचे एक वैशिष्ट्य सार्‍या जगात प्रस्थापित झालेले आहे, त्या गुणांचा आविष्कार आपल्या दैनंदिन जीवनात होतो की नाही? राष्ट्राविषयी आपल्या अंत:करणात स्वाभिमान जागृत असल्यामुळे आपले जीवन व्यतीत करण्याची आपली जी पद्धती आहे, ती स्वत्वाने परिपूर्ण आहे की नाही?’ मोंगल जेव्हा आक‘मण करण्यासाठी येथे आले तेव्हा त्यांच्या प्रभुत्वामुळे त्यांची भाषा, त्यांचा वेष आणि त्यांच्या जीवनाच्या अनेक पद्धतींचा आपण स्वीकार केला, हे आपले फार मोठे दुर्दैव होय. मोंगलानंतर युरोपियन आले. त्यांचेही आपण सर्व प्रकारे अनुकरण केले. दुसर्‍यांच्या केवळ संपर्कामुळेच त्याच्या जीवनाची पद्धती स्वीकारणारा स्वाभिमानशून्य आणि स्वातंत्र्यशून्य असतो.
 
 
लवचिकता असावी. दुसर्‍यांचे चांगले सर्व काही घेण्यासही हरकत नाही. परंतु, हे करताना स्वत:चेच मूळ उखडून टाकण्याची संधी दुसर्‍यांना देण्यात काय हंशील आहे? पाण्याच्या प्रवाहातील लव्हाळे लवचिकता दाखवत पाण्याचा वेगवान प्रवाह स्वत:वरून जाऊ देतात, परंतु प्रवाह रोडावताच ते पुन्हा ताठ होऊन जगू लागतात; स्वत:ची मुळे प्रवाहाला उखडू देत नाहीत. ही स्वाभाविक प्रवृत्ती त्या लव्हाळ्यात असते, तर मानवात आणि त्यातही भारतीयांमध्ये का नाही, याचाही विचार व्हायला हवा. एवढेच नाही तर, शहरी मध्यमवर्गीयांनी आधुनिकतेच्या नावावर हा जो वैचारिक, सांस्कृतिक व सामाजिक गोंधळ घातला आहे, त्याचे प्रायश्चित्त कुणी व कसे घ्यायचे, याचाही विचार करून ठेवायला हवा, असे वाटते.