आता खास वातानुकूलित गाडीतून नेपाळपर्यंत श्रीराम दर्शन

भारतभरातील रामायण स्थळेही पाहता येणार
7 नोव्हेंबरला दिल्लीहून सुटणार

    दिनांक :15-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
देशभरातील श्रीराम मंदिरे तसेच नेपाळच्या रामजानकी मंदिरापर्यंत भारतीय रेल्वे एक अनोखा प्रवास रामभक्तांसाठी घडवून आणणार आहे. 7 नोव्हेंबरपासून 17 दिवसांच्या या प्रवासासाठी आयआरसीटीसीने जय्यत तयारी केली असून, एका खास वातानुकूलित रेल्वेगाडी प्रवाशांसाठी सज्ज होत आहे.
 
natr_1  H x W:
 
ही विशेष रेल्वे गाडी भगवान श्रीरामांच्या जीवनाशी संबंधित सर्व ठिकाणांना भेट देईल. ‘देखो अपना देश’ या संकल्पनेवर धावणारी ही रेल्वेगाडी डिलक्स एसी असेल. ही गाडी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून 7 नोव्हेंबर रोजी रवाना होईल. येथून ती थेट श्रीरामांचे जन्मस्थान अयोध्येला जाईल. तेथे नंदिग्राममधील रामजन्मभूमी मंदिर, हनुमान मंदिर आणि भरत मंदिराचे दर्शन भाविकांना घडविण्यात येईल. अयोध्येनंतर ही गाडी नेपाळ येथील सीतामढीला जाईल.
 
 
नेपाळच्या जनकपूरस्थित श्रीराम जानकी मंदिराचे दर्शन भाविकांना घडविण्यात येईल. गाडीचा पुढील थांबा भगवान शिवाची नगरी वाराणसीत राहील. तेथून पर्यटक बसेसने काशीच्या प्रसिद्ध मंदिरांसह सीता समाहित स्थळ, प्रयाग, शृंगवेरपूर आणि चित्रकूटला भेट देतील.
 
 
7500 किमीचा एकूण प्रवास
ही गाडी चित्रकूटहून नाशिकला पोहोचेल. जिथे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देता येईल. नाशिकनंतर प्राचीन किष्किंधा नगरी म्हणजे सध्याचे हम्पी येथे गाडीचा पुढील थांबा असेल. या गाडीचा शेवटचा थांबा रामेश्वरम असेल. तेथे पर्यटकांना प्राचीन शिव मंदिर आणि धनुषकोडीच्या दर्शनाचा लाभ होईल. रामेश्वरम्हून निघून 17 व्या दिवशी ही गाडी दिल्लीला पोहोचेल. हा संपूर्ण रेल्वेप्रवास सुमारे 7500 किमीचा आहे.
 
 
गाडीत वाचनालयापासून फूट मसाजपर्यंत सुविधा
अत्याधुनिक सुविधांसह ही रेल्वेगाडी पूर्णपणे वातानुकूलित आहे. प्रवासी डब्यांव्यतिरिक्त यात दोन कोचमध्ये रेस्टॉरंट्स, अत्याधुनिक स्वयंपाकघर (पँट्री कार) आणि प्रवाशांसाठी फूट मसाज, वाचनालय, आधुनिक आणि स्वच्छ शौचालये आणि शॉवर क्यूबिकल्स यासार‘या सुविधा असतील. सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात सुरक्षा रक्षक, इलेक्ट्रॉॅनिक लॉकर्स आणि सीसीटीव्ही कॅमेरेही राहणार आहेत.