मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या : आधुनिक भारताचे बीज रोवणारा ‘समाजसेवी अभियंता’

आज राष्ट्रीय अभियंता दिन

    दिनांक :15-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
भारताचे महान स्थापत्य अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावात झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागात शिक्षण घेतले. येथूनच त्यांनी 1883 मध्ये अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.
 
natr_1  H x W:
 
पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या ज्ञानाचा समाजहितासाठी वापर करताना सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांनी द‘खन क्षेत्रात पाटबंधार्‍यांच्या अनेक योजना यशस्वी केल्या. त्यांनी स्वयंचलित पूरनियंत्रण द्वारप्रणाली (अ‍ॅटोमॅटिक फ्लड कंट्रोल डोअर सिस्टीम) विकसित केली आणि त्याचे पेटंटही मिळविले. या प्रणालीचा पहिला उपयोग 1903 साली पुण्याजवळील खडकवासला धरणात करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. एवढेच नव्हे, तर आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध ‘तिरुमाला-तिरुपती’ येथील रस्तेबांधणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. अनेक वर्षे त्यांनी म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणूनही कार्य केले. तेथे त्यांची ओळख ‘म्हैसूर राज्याचे पिता’ अशी होती. यावरून त्यांचे कार्य केवढे महान होते याची प्रचीती येते.
 
 
त्यांच्या कार्याची दखल घेत लंडन येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनीअर्सने’ त्यांना सन्माननीय सदस्यत्व दिले होते. तसेच बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचीही अभ्यासवृत्ती त्यांना मिळाली होती. 1917 मध्ये त्यांनी बंगळुरू येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच 1923 च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. या थोर अभियंत्याने इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या. त्याबद्दल ब्रिटिश सरकारनेदेखील त्यांचा विशेष गौरव केला. स्वातंत्र्यानंतर 1955 साली त्यांचा ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यांच्या अपूर्व अशा देशकार्याचा हा सन्मान होता.
 
 
या थोर अभियंत्याने एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशात अनेक शास्त्रज्ञ अभियंते तयार व्हावेत आणि त्यातून देशाची प्रगती व्हावी या हेतूने सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून घोषित केला गेला. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन अनेक समाजसेवी अभियंत्यांनी देशनिर्मितीच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे.