कधी सुरळीत होणार जनजीवन?

    दिनांक :15-Sep-2021
|
 
 
कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही. दररोज 25 हजारांपेक्षा जास्त नवे बाधित वाढत आहेत आणि समस्या वाढवत आहेत. तिसर्‍या लाटेची भीती आधीच मनावर दडपण आणणारी ठरली आहे. त्यात दुसरी लाट अजून गेली नसल्याने हे दडपण कमालीचे वाढले आहे. एप्रिल-मे 2021 मध्ये जी परिस्थिती होती, तशी परिस्थिती आल्यास, तिचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत का, हाही प्रश्नच आहे. प्राणवायू, रेमडेसिव्हिर इंजेक्शन यांचा पुरेसा साठा आपल्या देशात जरूर झाला आहे. पण, वैद्यकीय क्षेत्रावर येणारा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण झालेली नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कोरोनाचा विषाणू एवढ्यातच पूर्णपणे नष्ट होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे कोरोनासंबंंधीचे जे नियम आहेत, ते सगळ्यांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत, ही आजची खरी गरज आहे. कारण, वारंवार येणारी लाट, त्यामुळे लागू करावे लागणारे निर्बंध आपल्याला परवडणारे नाहीत. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेदरम्यान लागलेल्या निर्बंधांनी असं‘य लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे देशात जी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे, ती नजिकच्या भविष्यात नियंत्रणात येईल, याची कुठलीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांच्या बाबतीत जी परिस्थिती उद्भवली आहे, ती अवर्णनीय आहे.
 
agr_1  H x W: 0
 
घराघरांमध्ये जी समस्या पालकांना मुलांच्या बाबतीत भेडसावत आहे, तीसुद्धा गंभीर आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आभासी शिक्षणाला मुलं कंटाळली आहेत. शाळेत जाऊन प्रत्यक्ष वर्गखोलीत मिळणारे शिक्षण आणि इंटरनेटच्या माध्यमातून दिले जात असलेले शिक्षण यात फार अंतर आहे. जवळपास 37 टक्के विद्यार्थी अशा आभासी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड विकसित होताना दिसतो आहे आणि यातून मानसिक आजार बळावण्याची शक्यताही अधिक आहे. ही गंभीर बाब ओळखून सरकारने शिस्तीचे पालन करायला लावत दोन पाळ्यांमध्ये वर्गखोल्यांमधील शिक्षण सुरू करायला हवे. अन्यथा, जी समस्या उभी होईल, त्यातून बाहेर पडणे केवळ अशक्य होईल. आज बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होते आहे. हॉटेलांमधील गर्दी वाढली आहे. रस्त्यांवरील गर्दीवर तर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे मंदिरे, शाळा-महाविद्यालये बंद ठेवून फार काही साध्य करता येईल, असे समजण्याचे कारण नाही. देशाच्या अनेक भागांमध्ये मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पण, महाराष्ट्रात मात्र मंदिरांबाबत सरकार कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. दिवाळीनंतर विचार करू, असे सरकारने म्हटले आहे. मनुष्याला जसे देवाचे दर्शन घेण्याची आस लागली आहे, तशीच आस देवालाही भक्तांच्या भेटीची लागली आहे. यात अतिशयोक्ती काहीच नाही. ज्या मंदिरांमध्ये दिवसाला शंभर-दोनशेच्या वर भाविक दर्शनासाठी येत नाहीत, अशी राज्यभरातली सगळी मंदिरं खुली करायला काय हरकत आहे?
 
 
 
दुसर्‍या लाटेत देशातल्या दहा मोठ्या शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले होते, त्यापैकी आठ शहरे महाराष्ट्रातील होती. याचा विसर पडता कामा नये. आजही केरळ आणि महाराष्ट्रच कोरोनाच्या बाबतीत आघाडीवर आहे. केरळमधील स्थिती महाराष्ट्रापेक्षा जास्त गंभीर असली तरी महाराष्ट्रानेही देशाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रासार‘या प्रगत आणि पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या राज्याला शिस्त पाळता येत नाही, ही बाब दुर्दैवी आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लोक नियमांचे पालन करीत नाहीत, बेशिस्त वागत आहेत आणि टाळेबंदी लावून राज्याचे नुकसान करू नये, अशीही मागणी करीत आहेत. शासन-प्रशासन हतबल आहे. काय निर्णय करावा, यावरून सरकारमधील तीन पक्षांमध्ये मतभेद आहेत. केंद्र सरकारनेही महाराष्ट्रातील कोरोना स्थिती गंभीर असल्याचे अनेकदा म्हटले आहे. आता नागरिकांनीही बेजबाबदारपणे वागत सगळे काही सरकारवर सोडून चालायचे नाही. परिस्थिती हाताबाहेर गेली तर सरकारचा मृत्यू होईलच, पण आपलाही मृत्यू अटळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शंभर वर्षांपूवी आलेल्या प्लेगच्या साथीने जग जेवढे हादरले नव्हते, त्यापेक्षा जास्त कोरोना विषाणूच्या येण्यामुळे हादरले आहे, जनमानस घाबरले आहे.
 
 
अजूनही संकट टळलेले नाही. 2021 हे नवे वर्ष तर 2020 पेक्षाही जास्त भयंकर असणार आहे, अशी भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने फार पूर्वी केली होती, त्याची प्रचिती आम्ही एप्रिल-मे महिन्यात घेतलीच, आजही घेत आहोत. 2021 च्या पहिल्या पाच महिन्यांत कोरोनाने जे थैमान घातले होते, ते लक्षात घेता नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. 2021 हे वर्ष सुरू होऊन आठ महिने पूर्ण झाले आहेत आणि सगळे काही चांगले व्हावे, अशी प्रत्येकाची सदिच्छा आहे. सध्या राज्यात गणेशोत्सव सुरू आहे. प्रत्येक जण आशावादी आहे. विघ्नहर्त्याला साकडे घालतो आहे. पण, विघ्नहर्ता आपले तेव्हाच ऐकेल, जेव्हा आपण शिस्तीचे पालन करू. सकारात्मक विचार केला आणि त्यानुरूप आपली वर्तणूक ठेवली तर सगळे काही चांगले होईल, याबाबत आश्वस्त राहिले पाहिजे. पण, गेले दीड वर्ष राहिलेल्या आणि अजूनही अस्तित्वात असलेल्या कोरोना महामारीमुळे जगाचे जे प्रचंड नुकसान झाले आहे, ते भरून निघण्यास बराच कालावधी लागणार आहे. मानवतेवर गंभीर आघात करणार्‍या कोरोनाने मनुष्याला कायमचा धडाही शिकवला आहे. त्यातून बोध घ्यायचा की आणखी नुकसान करवून घ्यायचे, हे आपल्यालाच ठरवायचे आहे. महामारीचे मोठे दुष्परिणाम जगाला पुढील अनेक वर्षे भोगावे लागणार आहेत.
 
 
देशात लसीच्या 75 कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत. मात्र, दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची सं‘या अवघी 19 कोटी आहे. शिवाय, 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे लसीकरणाने अजून पाहिजे तसा वेग घेतलेला नाही. केंद्र सरकारने सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला असल्याने आणि उत्पादनही वेगाने सुरू असल्याने 75 कोटींचा आकडा आपण पार करू शकलो, हा तसा एक विक‘मच मानला पाहिजे. कारण, जगातल्या अनेक शक्तिशाली देशांच्या तुलनेत आपली टक्केवारी तशी चांगली आहे. पण, सर्वांना दोन डोस मिळायला अजून बराच अवकाश आहे. डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असला तरी पूर्ण लोकसंख्येला दोन्ही डोस डिसेंबरपर्यंत दिले जातील, याची शाश्वती नाही. अशी परिस्थिती असतानाही आम्ही बेशिस्त वागून स्वत:वरील आणि प्रशासनावरील ताण वाढवत आहोत, ही लाजिरवाणी बाब होय. भारतासारख्या प्रचंड लोकसं‘या असलेल्या देशात कोरोनाने पहिल्या लाटेत अमेरिका, इटलीत घातला तसा गोंधळ घातला नव्हता, त्याचेही कारण होते. केंद्र सरकार आणि सगळ्या राज्य सरकारांनी प्रारंभापासूनच जी काळजी घेतली, सतर्कता बाळगली, उपाय केलेत त्यामुळे आपल्याकडे कोरोनाने एका विशिष्ट प्रमाणाबाहेर हातपाय पसरले नव्हते. परंतु, दुसर्‍या लाटेत आपल्या देशातही प्रचंड दहशत निर्माण झाली होती. दररोज हजारो लोक मृत्युमुखी पडल्याचे आपण पाहिले. आपल्यापैकी अनेकांच्या जवळची माणसं आपल्याला अकाली सोडून गेलीत, त्याचे दु:ख अजूनही आपण विसरलेलो नाही.
 
 
ही बाब लक्षात घेऊन तरी सगळ्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करायला नको? शाळा-महाविद्यालये आणि मंदिरे सोडलीत तर टाळेबंदी पूर्णपणे उठल्यासारखीच आहे. त्यामुळे कसेही वागण्याची आपल्याला मोकळीक मिळाली आहे, या भ्रमात नागरिक सर्व व्यवहार बिनधास्तपणे करू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी घ्यावयाची काळजी घेताना दिसत नाहीत. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात 130 कोटी लोकांना ही लस वेळेत टोचली जाणे तसे अवघडच आहे. त्यामुळे प्रत्येकाला लस टोचली जात नाही, तोपर्यंत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. लोकसंख्येचा आकार, भौगोलिक परिस्थिती असे मुद्दे लक्षात घेता आणखी किमान सहा महिने तरी लागतील, असे गृहित धरायला हरकत नाही. कोरोना विषाणूने सगळ्यांनाच प्रभावीत केले आहे. प्रत्येकावर त्याचा परिणाम झाला आहे. प‘त्येकाने आपापल्या परीने विषाणूचा मुकाबला केला आहे. सर्वाधिक फटका तर देशातल्या विद्यार्थ्यांना बसला आहे. मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून अभ्यास जारी ठेवणे तसे कठीण काम. त्यामुळे विद्यार्थी आता कंटाळले आहेत. शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचा जो आनंद आहे, सवंगड्यांसोबत खेळण्याचा जो आनंद आहे, त्यालाही ते मुकले आहेत. त्यांचा शारीरिक विकास खुंटल्यासारखा झाला आहे. विद्यार्थ्यांचे हे जे नुकसान झाले आहे, ते मोजण्याच्या पलीकडे आहे. वर्गात विद्यार्थी शिकत असताना त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासातही भर पडत असते. त्यापासूनही तो वंचित राहिला आहे.