कोकणी उंडी

    दिनांक :29-Sep-2021
|
खास कोकणी पद्धतीची उंडी  
 
झटपट तयार होणारी, कमी तेलातील आणि खास कोकणी पद्धतीची उंडी हा पोटभरीचा नाश्ता आहे. चविष्ट आणि सोपी पाककृती असलेल्या या उंड्या कशा बनवायच्या? खाली दिले आहे साहित्य आणि पाककृती...!
  
undi_1  H x W:  
 
गरमागरम उंडी बनविण्यासाठी साहित्य
एक वाटी तांदूळ
पाव वाटी चणा डाळ
पाव वाटी मुगाची डाळ
एक चमचा तेल
पाव चमचा हिंग 
पाव चमचा जीरे
हिरवी मिरची-लसूण पेस्ट
(४ ते ५ हिरव्या मिरच्या आणि १०-१२ लसूण पाकळ्या)
पाव चमचा हळद
एक वाटी फ्रेंच बीन्सचे तुकडे
तीन वाट्या पाणी
चवीपुरते मीठ
 
कृती : तांदूळ, चणा डाळ, मुगाची डाळ एका मोठ्या वाडग्यात एकत्र करून, ३ ते ४ वेळा पाण्याने छान धुवून घ्या. त्यातील पाणी काढून घ्या आणि ते थोडे सुकले की मिक्सरमधून छान बारीक पूड करून घ्या. एका कढईमध्ये तेल तापवून जिरे घाला. जिरे तडतडल्यानंतर, हिंग, हिरवी मिरची-लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या. हळद आणि फ्रेंच बीन्सचे तुकडे घालून छान परतून घ्या. आता या फोडणीत डाळ-तांदूळाची पूड आणि मीठ घाला. छान परतून त्यात पाणी घालून ढवळून घ्या. या मिश्रणाची उकड तयार होईल. ती थंड होऊ लागली की, त्याचे उंडे बनवून घ्या. एका ताटाला तेल लावून त्यावर हे उंडे ठेवा.
 
तयार उंडे स्टीमरमध्ये ठेवून साधारण १५ मिनिटे वाफवून घ्या. गॅस बंद करून झाकण न काढता उंडे त्यातच राहू द्या. दहा मिनिटांनी स्टिमरचे झाकण काढून उंडे ताटात काढा. गरमागरम उंड्यांवर साजूक तूप घालून, हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. आवडीनुसार साजूक तुपाऐवजी कच्चं शेंगदाणा तेल आणि तिखट घालूनही उंडे छान लागतात. चार वाजताचा चटपटीत नाश्ता किंवा पौष्टीक डब्यासाठी नक्की बनवून बघा कोकणी उंडी !
 
टीप -  तांदूळ, चणा डाळ, मुगाची डाळ यांचे एकत्रित पीठ तयार करून ठेवता येईल. फोडणी केली की, झटपट उंडे बनविता येतील.