मेघे रुग्णालय समूह व केट्टो ऑर्गनायझेशन यांच्यात सामंजस्य करार

    दिनांक :03-Sep-2021
|
- रुग्णांच्या आर्थिक मदतीसाठी क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म
 
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
मेघे रुग्णालय समूह व केट्टो ऑर्गनायझेशन यांच्यात आर्थिक मदतीचा प्राथमिक स्त्रोत म्हणून मेडिकल क्राउडफंडिंगसाठी सामंजस्य करार करण्यात आला. शालिनीताई मेघे हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे आयोजित करारनामा सभेत मेघे रुग्णालय समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव आणि केट्टो ऑर्गनायझेशनच्या उपाध्यक्ष डॉ. सोनिया बसू यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. मध्यभारतातील सर्वात मोठा खाजगी रुग्णालय समूह आणि दक्षिणपूर्व आशियातील सर्वाधिक विश्वासार्ह क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म यांच्यात झालेला हा असा पहिलाच सामंजस्य करार आहे. 

meghe_1  H x W: 
 
 
अनेकदा आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती निर्माण होते तर काही वेळेस अवयव प्रत्यारोपण, न्यूरोसर्जरी यासारख्या उपचारात सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य यंत्रणा सहाय्य करण्यात अपयशी ठरतात. अशावेळी गरजू रुग्णांना अगदी मूलभूत स्तरावर मेडिकल क्राउड फंडिंगमुळे आर्थिक पाठबळ प्राप्त होईल, असा विश्वास दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा नागपूरच्या मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे यांनी व्यक्त केला. ज्यांना तातडीने पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी मेडिकल क्राउडफंडिंग हा उत्तम पर्याय आहे, असे डॉ. सोनिया बसू यांनी सांगितले.
 
 
 
मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मागील 30 वर्षांपासून अतिविशेष वैद्यकीय सुविधा आणि विशेषज्ञांच्या माध्यमातून मध्यभारतात, विशेषतः ग्रामीण भागात सातत्यपूर्वक आरोग्यसेवा प्रदान करीत आहे. तर जीवनावश्यक सेवा आणि सामान्यांच्या आर्थिक स्थितीतील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने मुंबई येथे वरुण शेठ, झहीर एडनवाला आणि अभिनेता कुणाल कपूर यांनी केट्टो ऑर्गनायझेशनची स्थापना केली आहे. केट्टो ऑर्गनायझेशन लोकांना अतिगंभीर आजार आणि वैद्यकीय समस्या, महिला सक्षमीकरण, नैसर्गिक आपत्ती, शिक्षण, प्रवास, अल्पकालीन व आपत्कालीन गरजा, विविध स्पर्धा, कला, क्रीडा, प्राणी कल्याण आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी निधी निर्माण करण्याचे कार्य करते. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी रुग्णालये, स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक पातळीवर केट्टो काम करीत आहे. विविध कारणांसाठी केट्टोद्वारे दरवर्षी 300 कोटींचा निधी उभारला जातो. वैद्यकीय पूर्ततेसाठी क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे केट्टो ऑर्गनायझेशनने एक दशलक्षाहून अधिक निधी उभारणी सुरू केली आहे.