गणेशमूर्ती कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी आत्मनिर्भर

- स्वयंप्रेरयणेने मूर्तीत भरले रंग

    दिनांक :03-Sep-2021
|

नागपूर, 
श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडतर्फे प्रकाशित दै. तरुण भारतच्या वतीने रामदासपेठ कार्यालयात आयोजित गणेशमूर्ती कार्यशाळेच्या तिसर्‍या दिवशी प्रशिक्षणार्थींनी रंगकामाविषयी जाणून घेत घडवलेल्या सुबक मूर्तीत स्वयंप्रेरणेने रंग भरले आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 

ganeshmurti prashikshan_1 
 
 
बुधवारी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रशिक्षणार्थींनी मनातील श्रीगणेशाचे प्रत्यक्ष रूप एकाग‘तेने, त‘ीनतेने साकारत श्री गणेशाची मूर्ती कच्च्या स्वरुपात घडविली. गुरुवारी दुसर्‍या दिवशी मूर्तीस सुबक आकार दिला. मोहन झरकर, गौरी देशपांडे, निलेश चव्हाण, मनीषा पाटील, मनोज पाटणकर, सचिन चावरे, महेंद्र वैद्य, सागर देशमुख या प्रशिक्षकांनी मूर्ती व रंगकाम या विषयावर मार्गदर्शन केले. 
 
ganeshmurti prashikshan_1
 
 
मूर्ती घडविण्यापूर्वी रंगांची सखोल माहिती असायला हवी. आधी पिवळा रंग दिल्यानंतर मग सोनेरी रंग दिला तर त्याची चमक देखणी असते. पोस्टल कलरही चालतात. मूर्ती घडविताना, त्यात रंग भरताना सर्वात आधी मनात साठवलेले चित्र डोळ्यासमोर आणावे. कोणता रंग कुठे द्यावा, याचे नियोजन करावे. हे एकदा मनात पक्के झाले की मग रंगकामाला सुरुवात करावी. घाई करू नये. हळुवारपणे रंग द्यावा. रंग फासू नये. हा रंग वाळला की मग आवश्यकता भासेल तसा रंग गडद करावा. मूर्ती कुणाचीही असो, मूर्तीमधील भाव अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याप्रमाणे मूर्ती घडवायची असते आणि रंगकाम करायचे, अशी अत्यंत महत्त्वाची बेसिक माहिती मोहन झरकर यांनी दिली.
 
 
भंडार्‍याचा अथर्व वानखेडे कार्यशाळेत
कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन नागरिकांनी स्वतः गणेश मूर्ती घडवावी व तिची घरी प्रतिष्ठापना करावी. आपण जाणलेला श्रीगणेश प्रत्यक्षात साकारून त्याच्या पूूजनाचा आनंद घ्यावा, असा प्रामाणिक उद्देश असलेल्या या कार्यशाळेला मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त व उत्साहपूर्ण आहे.
 
 
 
अथर्व गोपाल वानखेडे हा भंडारा येथून तीन दिवस रोज आईसह या कार्यशाळेत आला. तेथील जेसीस कॉन्व्हेंटमध्ये तो चवथीत शिकतो. मूर्तीकाम हे त्याच्या अंगभूत असल्याचे त्याच्या आईने सांगितले. त्यातही श्रीगणेशाचे त्याला अगदी लहान असतानापासून आकर्षण. श्रीगणेशाच्या फोटोसमोर तो तासन्तास त‘ीनतेने बघत असतो. मागील वर्षी त्याने श्रीगणेशाच्या काही मूर्ती त्याच्या कल्पनेने तयार केल्या. परिचितांना त्या भावल्या. त्यांनी घरी नेऊन त्यांची प्रतिष्ठापना केली. सिंचन खात्यात कार्यरत त्याच्या वडिलांना तरुण भारताच्या या कार्यशाळेची माहिती मिळाली. अथर्वची मूर्तीकलेची आवड पाहता त्याला कार्यशाळेत पाठविले. ‘या कार्यशाळेत शिकल्यानंतर अधिक चांगल्या सुबक मूर्ती घडवेन’ असे अथर्वने सांगितले.