8 वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरीत

    दिनांक :01-Jan-2022
|
तभा वृत्तसेवा  
वर्धा,  
Shetkari Sahitya Sammelan कल्पनाविश्‍वात रमणार्‍या आभासी शेती साहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्‍या दाहक समस्यांची मराठी साहित्य विश्‍वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषी जगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे रविवार 27 फेब्रुवारी रोजी 8 वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
 

Shetkari Sahitya Sammelan 
 
 
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून 2 कि. मी अंतरावर असलेल्या रावेरी या छोट्याशा खेड्यात सोबत राम नसलेल्या एकट्या भुमीकन्या सीतामाईचे मंदिर आहे. शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. स्त्रित्वाचे आत्मभान आणि आत्मसन्मान जपणारी पावनभूमी म्हणून देशातील एकमेव असलेल्या या सीतामंदिराचे आगळेवेगळे स्थान आहे. शेतीविषयाच्या सखोल अभ्यासक व स्तंभलेखिका प्रज्ञा बापट आठव्या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविणार असून युगात्मा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना ट्रस्टचे ट्रस्टी संजय पानसे संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.
 
 
 
संमेलनाच्या आयोजनाकरिता अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे आणि संयोजक बाळासाहेब देशमुख यांनी कार्यभार स्विकारला असून संमेलनाच्या यशस्वीतेकरिता विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. जयंत बापट, राजू झोटिंग, इंदरचंद बैद, वामन तेलंगे, नामदेव काकडे, राजेंद्र तेलंगे, विक्रम फटिंग यांचा प्रामुख्याने समित्यांमध्ये समावेश आहे.
या संमेलनात उद्घाटन सत्र, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल मुशायरा आणि दिल्ली शेतकरी आंदोलनाने काय कमावले, काय गमावले या विषयावर महाचर्चा असे विविधांगी सत्र असणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आदी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत. रावेरी स्थळाचे वेगळेपण लक्षात घेऊन महिलाविश्‍वाला झुकते माप देण्यात येणार असून सर्व सत्रांच्या अध्यक्षस्थानी महिलाच असणार आहेत, हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली आहे.