ऋषिकेशमध्ये भाविकांच्या स्नानावर बंदी

    दिनांक :14-Jan-2022
|
हरिद्वार,
Rishikesh देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून उत्तराखंडमधील हरिद्वार आणि ऋषिकेश इथे मकर संक्रांतीनिमित्त होणारे स्नान बंद करण्यात आले आहे. मकर संक्रांतीनिमित्त याठिकाणी हजारो भाविक स्नानासाठी येत असतात पण वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता स्नान करण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, उत्तराखंड सरकारने खबरदारी घेतली आहे. कुंभ मेळ्यात झालेल्या कोरोनाचा फैलाव लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने मकर संक्रांतीच्या सणाला हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये गंगेत स्नान करण्यास बंदी घातली आहे.
 
kesh
 
Rishikesh तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये माघ मेळा भरला आहे. तिथे मात्र लोकांना स्नानासाठी परवानगी आहे. त्यामुळे तिथे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माघ मेळ्यामध्ये आत्तापर्यंत 70 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उत्तरायणात सूर्याच्या प्रवेशानंतर साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला गंगेत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक हरिद्वार आणि ऋषिकेश येथे असतात. सरकारने कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याची आम्ही अंमलबजावणी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. परराज्यातून आंघोळीसाठी येणाऱ्या भाविकांना परत पाठवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या रुग्णसख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने, हरिद्वारमधील हर की पौरी, ऋषिकेशमधील त्रिवेणी आणि इतर गंगा घाटांवर भाविकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.