श्रीवल्ली गाण्याच्या मराठी आवृत्तीची धूम

निंबोरा गावच्या विजयने बनविले गाणे

    दिनांक :14-Jan-2022
|
तभा वृत्तसेवा
अमरावती,
साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या ‘पुष्पा द राईज’ या तेलगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका उडवून दिला आहे. तेलगूनंतर हा चित्रपट मल्याळम ,कन्नड आणि हिंदी या भाषेत देखील प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याच्या मराठी आवृत्तीची सोशल मिडीयावर धूम सुरू आहे. हे गाणे तिवसा तालुक्यातल्या निंबोरा गावातल्या विजय खंडारे याने तयार केले आहे. आतापर्यंत या गाण्याला 20 लाख लोकांनी पाहिले आणि 1 लाख 9 हजार लोकांनी लाईक केले आहे.
 
Srivalli song
 
चित्रपटा प्रमाणेच चार भाषेत देखील हे गाणे तयार झाले आहे. विजयने दोन आठवड्यापूर्वी मराठी भाषेतले हे गाणे युट्यूबवर प्रेक्षकांसाठी टाकले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे विजयने स्वतःहा हे गाणे हिंदीतून मराठीत अवघ्या दोन तासात तयार केले. अमरावतीच्या एका स्टुडीओत ते रेकॉर्ड केले. त्यानंतर शुटींग करण्यात आले. विजयने पुष्पाचा आणि त्याची पत्नी तृप्ती खंडारे हीने श्रीवल्लीची भूमिका या गाण्यात केली आहे. 3 मिनिट 44 सेकंदाचे हे गाणे आहे. चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन, अभिनेत्री रश्मीका मंदना तसेच या गाण्याचा मूळ गायक श्रीथ श्रीरावसह चित्रपटाच्या टीमनेही गाणे पाहिले असल्याचे विजय खंडारे याने सांगितले. विजयला या गाण्याचे चित्रिकरण करायला तीन दिवस लागले. सहकलाकार म्हणून गावातीलच राधीका नागरगोटी, सुहासिनी गुल्हाने, मनीष पतंगे, रोशन चौधरी यांनी उत्तम भूमिका साकारली आहे.
 
 
विजय खंडारे युट्यूबवर तसा प्रसिद्ध आहे. पत्नी तृप्तीला सोबत घेऊन तो ग्रामीण जिवनाशी निगडीत, आसपास घडणारे किस्से यावर अभ्यास करून नवनवीन व्हिडियो बनवतो. त्याचे बहुतांश व्हिडिओ विनोदी असल्याने तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. पूर्वी विजयची टिकटॉक स्टार म्हणून ओळख होती.
 
 
एखाद्या व्हिडिओ बनवायचा असल्यास त्याला खर्च येतो. व्हिडिओत मुख्य भूमिका साकारणारे कलाकार महागडे कपडे परिधान करतात. पण, विजय आणि त्याच्या टीमने कमी खर्चात हे गाणे बनवले आहे. तो आणि त्याची पत्नी अगदी साध्या पेहराव करून आणि मोबाईलने शुटींग करतात. कॅमेरामन म्हणून त्याची बहीण आचल खंडारे त्याला मदत करते.
 
 
विजय सामान्य कुटुंबातला
विजय अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेला युट्युब स्टार आहे. विजयचे वडील नारायण खंडारे हे हातगाडीवर एक छोटा व्यवसाय करतात. त्याची आई गृहिणी आहे. विजयने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून पूर्वी त्याने हमालीचे काम देखील केले आहे. जिद्द आणि कला त्याच्या अंगी आहे. त्यातूनच तो लोकांच्या पसंतीला उतरला आहे.