गोव्यात भाजपा 38 जागांवर लढणार

    दिनांक :14-Jan-2022
|
-पणजी, 
40 सदस्यीय गोवा विधानसभा Goa assembly निवडणुकीत भाजपा 38 जागा लढविणार आहे. आज शुक्रवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला. पुढील महिन्यात एकाच टप्प्यात गोव्यात मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, या 38 जागांवरील उमेदवारांची घोषणा भाजपा रविवारी किंवा सोमवारी करण्याची शक्यता आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपा गोव्याचे  प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत बैठकांचे सत्र सुरू आहे.
 
 
bjp flag
 
बेनॉलिम आणि नुवेम या दोन जागांवर भाजपा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देईल. या दोन्ही ठिकाणी पक्षाच्या चिन्हाचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती बैठकीनंतर सूत्राने दिली. विशेष म्हणजे, Goa assembly ख्रिश्चनांचे प्राबल्य असलेल्या या दोन्ही जागांवर मतदारांनी आजपर्यंत कधीच भाजपाला मतदान केले नाही. बेनॉलिम जागेवरील विद्यमान आमदार चर्चिल अलेमावो हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटवर विजयी झाले होते. मात्र, अलिकडेच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर, नुवेम जागेवरील काँग्रेसचे आमदार विलफ्रेड डिसुजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे गोव्यातील वरिष्ठ नेते उद्या शनिवारी दिल्लीला जाणार असून, संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेत्यांना सादर करतील. त्यानंतर दोन दिवसांतच उमेदवारांची औपचारिक घोषणा केली जाईल, असे सूत्राने सांगितले.