सिंधू, लक्ष्य सेन उपांत्य फेरीत

    दिनांक :14-Jan-2022
|
- इंडिया ओपन बॅडमिंटन
- नागपूरच्या मालविका बन्सोडचे आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली, 
India Open Badminton : दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू व जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनने शुक‘वारी येथे योनेक्स-सनराईज इंडिया ओपन बॅडमिंटन India Open Badminton स्पर्धेत अनुक‘मे महिला व पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध शानदार विजय नोंदविले. सायना नेहवालवर खळबळजनक विजय नोंदविणार्‍या नागपूरच्या मालविका बन्सोडचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टातआले. मालविकाला आकर्षी कश्यपकडून पराभव पत्करावा लागला. माजी विश्वविजेती व अव्वल मानांकित सिंधूने आपल्या देशाच्या अस्मिता चालिहा हिला 36 मिनिटांत 21-7, 21-18 असे नमविले, तर लक्ष्य सेनने एच. एस. प्रणॉयची चिवट झुंज 14-21, 21-9, 21-14 अशी मोडून काढली. हे सर्व उपांत्यपूर्व सामने भारतीय खेळाडूंदरम्यानच खेळल्या गेले.
 
 
India Open Badminton
 
हैदराबादच्या 26 वर्षीय सिंधूला आता महिला एकेरीच्या अंतिम चारमध्ये थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपानिडा कातेथोंगविरुद्ध सामना करावा लागणार आहे. सुपानिडाची उपांत्यपूर्व फेरीतील प्रतिस्पर्धी सिंगापूरच्या येओ जिया मिनला ताप आल्यामुळे तिने स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे सुपानिडाला पुढे चाल मिळाली. तिसर्‍या मानांकित लक्ष्य सेनचा उपांत्य फेरीत मलेशियाच्या एनजी त्झे योंगविरुद्ध सामना होईल. महिलांच्या अन्य उपांत्य फेरीत आकर्षी कश्यपचा सामना दुसर्‍या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानशी होईल. शुक‘वारी आकर्षीने नागपूरच्या मालविका बन्सोडचा 21-12, 21-15 असा पराभव केला. बुसाननने उपांत्य फेरी गाठताना अमेरिकेच्या लॉरेन लॅमचा 21-12, 21-8 असा पराभव केला.
 
 
पुरुष दुहेरीत दुसर्‍या मानांकित सात्विकसाईराज रन्कीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने सिंगापूरच्या ही योंग काई टेरी व लोह कीन हेनवर 21-18, 21-18 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. हरिता मानाझील हरिनारायण व अश्ना रॉयनेही महिला दुहेरीत रुद्राणी जैस्वाल व जमालुद्दीन अनीस कोवसार या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत 21-16, 21-16 असा पराभव करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला. पुरुष दुहेरीत ईशान भटनागर व साई प्रतीक के. या जोडीने मलेशियाच्या तिसर्‍या मानांकित ओंग येव सिन व तेओ ई यी या जोडीवर अवघ्या 19 मिनिटांत 7-21, 7-21 असा विजय मिळविला. मिश्र दुहेरीत, वेंकट गौरव प्रसाद व जुही दिवांगन या भारतीय जोडीचा, चेन तांग जी व पेक येन वेई या मलेशियाच्या जोडीकडून केवळ 23 मिनिटांत 10-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. नितिन एचव्ही व अश्विनी भट या अन्य एका भारतीय जोडीला सिंगापूरच्या ही योंग काई टेरी व टॅन वेई हान या जोडीकडून 15-21, 19-21 असा पराभव पत्करावा लागला.