नानाजी देशमुख कृषी प्रकल्पाचा आढावा

प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

    दिनांक :14-Jan-2022
|
तभा वृत्तसेवा
अमरावती,
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात प्रकल्प अहवालांची (डीपीआर) प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, तसेच जलसंधारणाची नियोजित कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शुक्रवारी येथे दिले.
 
Nanaji Deshmukh
 
जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह सर्व उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पात 532 गावे समाविष्ट असून, त्यात 355 गावे खारपाणपट्ट्यातील आहेत. पहिल्या टप्प्यात 205 व दुसर्‍या टप्प्यात 327 गावे समाविष्ट आहेत. प्रकल्पांतर्गत 283 गावांमध्ये ग्राम कृषी संजीवनी समितीची स्थापना झाली आहे. योजनेत अद्यापपर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजनांत 10 हजार 470 शेतकर्‍यांना सुमारे 20 कोटी रुपये निधीचा लाभ देण्यात आला. शेतकरी उत्पादक कंपनी, संघ, शेतकरी बचत गट, महिला बचत गट आदी 17 संस्थांना सुमारे 1 कोटी 19 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आले. सक्रिय पूर्वसंमती दिलेल्या गटांची संख्या 30 असून, त्यांच्या लाभाच्या निधीची रक्कम सुमारे 4 कोटी 34 लाख आहे.
 
 
बैठकीत योजनेतील वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. प्रलंबित अर्ज तत्काळ निकाली काढावेत. जलसंधारणाची कामे गतीने राबवावीत. ज्या कामांमध्ये लोकसहभागाची तरतूद आहे, तिथे तो मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. ढाळीचे बांध व जलसंधारणाच्या इतर कामांबाबत कार्यशाळा व भरीव जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.