ऋषी सुनक होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान?

    दिनांक :14-Jan-2022
|
लंडन, 
Rishi Sunak : कोरोना टाळेबंदीच्या काळात सामान्य जनता घरात कोंडून असताना जोरदार पार्टी झोडणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या अडचणीत आले आहेत. यामुळेच त्यांच्या खुर्चीलाही धोका निर्माण झाला. वाढत्या दबावामुळे आपल्या बेजबाबदार वर्तनासाठी बोरिस जॉन्सन यांना पदावर पाणी सोडावे लागू शकते, असे म्हटले जात आहे. ब्रिटनचे अनेक खासदार आणि विरोधी पक्षांचे नेते बोरिस जॉन्सन यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करीत आहेत. याच दरम्यान ऋषी सुनक Rishi Sunak हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
 
 
Rishi Sunak
 
ब्रिटिश मीडियाच्या मते, बोरिस जॉन्सन यांना पद सोडावे लागले तर त्यांच्याऐवजी ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदाची संधी मिळू शकते. ऋषी सुनक Rishi Sunak हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. देशात कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीदरम्यान पंतप्रधान जॉन्सन यांनी 2020 मध्ये एक गार्डन पार्टी आयोजित केल्याचे समोर आले. या पार्टीसाठी जॉन्सन यांचे मुख्य खाजगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांच्याकडून अनेकांना मेल धाडण्यात आले. गार्डन पार्टीच्या बातम्यांना दुजोरा देतानाच या पार्टीला उपस्थित राहिल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांनी माफीदेखील मागितली आहे. काही गोष्टी आपल्या सरकारने योग्य पद्धतीने घेतल्या नाहीत, असे स्पष्टीकरण जॉन्सन यांनी दिले. ‘पार्टीगेट’ नावाने हे प्रकरण आता संपूर्ण जगभर ओळखले जाते.
ऋषी सुनक यांच्या नावावर सट्टा
यातच ब्रिटनची एक प्रमुख सट्टा कंपनी ‘बेटफेयर’ने पुढचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक Rishi Sunak यांच्या नावावर सट्टा लावला. अडचणीत सापडलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असून, भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक Rishi Sunak त्यांची जागा घेऊ शकतात, असा दावा ‘बेटफेअर’ने केला. या शर्यतीत ऋषी सुनक Rishi Sunak यांच्यासोबतच लिझ ट्रस (परराष्ट्र मंत्री), मायकेल गोव्ह, माजी परराष्ट्र सचिव जेरेमी हंट, भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रिती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डाऊडेन यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.