शरद पवारांची उंची किती?

    दिनांक :14-Jan-2022
|
प्रासंगिक
- मोरेश्वर बडगे
Sharad Pawar : यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री बनून दिल्लीला गेले तेव्हा ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’, असे म्हटले गेले. आता सह्याद्री तर सोडा, पण कात्रजच्या घाटाच्या उंचीचीही माणसे नाहीत. पण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar हे एकाच वेळी हिमालय आणि सह्याद्री आहेत, असे काहींना वाटते. शरद पवारांसमोर तुमची उंची काय, असा प्रश्न भाजप नेत्यांना विचारून शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी नवीच चर्चा छेडली आहे. तसे पाहिले तर चंद्रकांतदादा पाटील यांचे दोन साधे प्रश्न होते... उद्धव ठाकरे घराबाहेर कधी येणार? आणि दुसरा प्रश्न होता, शरद पवार Sharad Pawar पंतप्रधान कधी होणार? भाजप नेत्याच्या या खोचक टिप्पणीवर राऊत उसळले. तुमच्यासारख्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही, असे राऊत म्हणाले. पवार सह्याद्री केव्हापासून झाले, असा प्रश्न महाराष्ट्राला आता पडला तर नवल नाही. पवार कधीही सह्याद्री नव्हते आणि आताही नाहीत. स्वबळावर सरकार बनवण्याइतपत आमदार त्यांना कधीही निवडून आणता आले नाहीत. जमेल त्याच्या कुबड्या घेऊन पवार सत्ता भोगत आले. सध्या तर ते फक्त आणि फक्त साधे राज्यसभा खासदार आहेत; पण हे वास्तव कोणी पचवायचे? ते सह्याद्री आहेत तर त्यांच्या छत्रछायेत महाराष्ट्राचे हाल का सुरू आहेत? तीन महिन्यांपासून महाराष्ट्र बेवारस आहे.
 
 
sharad pawar 3
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणाने घरी आहेत. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे, हे समजू शकते. पण म्हणून राज्याचा कारभार ठप्प ठेवायचा का? पवारांप्रमाणे Sharad Pawar उद्धव हेही अजित किंवा दुसर्‍या कुणाकडे चार्ज द्यायचा धोका पत्करायला तयार नाहीत. तरीही पवार बैठका घेत आहेत. पवारांना 50 वर्षांचा अनुभव आहे तर मग महाराष्ट्राची फजिती का सुरू आहे? राज्याचे प्रश्नं साचले आहेत. कोरोना संकटात दारू दुकाने सुरू, पण शाळा बंद आहेत. अवकाळी पावसाने शेती बुडाली. मात्र, सरकार दरबारी त्याची साधी चर्चाही नाही. एसटी संप दोन महिन्यांपासून सुरू आहे. पवारांनी संपकरी कर्मचार्‍यांना चर्चेला बोलावले नाही. कामगार संघटनांना बोलावले. संप कसा मिटणार? साधा संप मिटवू शकत नाही, त्या नेत्याला सह्याद्री कसे म्हणायचे?
 
 
पवार Sharad Pawar काहीही करू शकतात असे बोलले जाते, पण हा भुलभुलय्या आहे. जनसंघाचा भाजप झाला. त्यानंतर 1980 च्या निवडणुकीत भाजपला 15-16 जागा मिळाल्या. पवारांच्या Sharad Pawar समाजवादी काँग्रेसला तेव्हा 55 जागा मिळाल्या होत्या. इतक्या वर्षांनंतर तेच पवार राष्ट्रवादी म्हणून 56 आमदारांवर थांबून आहेत आणि भाजप 105 जागांवर पोहोचला आहे. कुठाय सह्याद्री? फक्त एकदा म्हणजे 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 71 जागा जिंकल्या. 25 वर्षांतला राष्ट्रवादीचा हा सर्वोच्च स्कोअर! काँग्रेसच्या आश्रयाने त्यांना केंद्रात आणि राज्यात सत्ता गाजवायला मिळाली. त्यांच्याएवढे राजकीय उन्हाळे-पावसाळे पाहिलेला नेता आज देशात दुसरा नाही. पण आज वयाच्या 81 व्या वर्षीही 56 आमदार निवडून आणण्यासाठी त्यांना पावसात भिजत सभा करावी लागते; तेव्हा कुठे जाते त्यांची उंची? पवारांच्या Sharad Pawar तुलनेत ममतादीदी, जगनमोहन रेड्डी हे लिंबूटिंबू! त्यांच्यापेक्षा कितीतरी नंतर राजकारणात आलेल्या ममतादीदीने स्वबळावर बंगाल तीनदा जिंकला. जगनमोहन यांनी काँग्रेसशी दोन हात करून स्वबळावर सत्ता मिळविली. उद्धव ठाकरे घ्या. बाळासाहेब नसताना त्यांनी 57 आमदार निवडून आणले. पवारांचे काय? काड्या, कसरती, कोलांटउड्या मारण्यात त्यांची 50 वर्षे गेली. नेहमी स्वत:भोवती संभ्रमाचे जाळे विणून शेवटी स्वत:च त्यात गुरफटण्याच्या स्वभावामुळे त्यांची सारी मेहनत वाया गेली. सोनिया गांधींना विदेशी म्हणणे आणि पाच वर्षांनी त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणे, हे कुठल्या सह्याद्रीच्या व्याख्येत बसते? तरीही राष्ट्रवादी नावाचे दुकान चालू आहे. कधी काँग्रेससोबत आणि आता शिवसेनेसोबत. ‘जिधर दम, उधर हम’ या नेमक्या शब्दात पवारांच्या कामाचे वर्णन करता येईल. तीनदा मुख्यमंत्री आणि 10 वर्षे केंद्रीय कृषिमंत्री होते. त्या काळात देशात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या. काय ही उंची? हे वय तसे नातवासोबत खेळायचे, पण पवारांना ते सुख नाही. घरी बसले तर दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादी फुटते. म्हणून पवार एक दिवसाचीही सुट्टी घ्यायला तयार नाहीत. पुतण्यावर विश्वास नाही आणि मुलीच्या हाती पक्ष देता येत नाही, अशा कात्रीत पक्ष जमेल तसा जिवंत ठेवण्याची त्यांची धडपड चालू आहे.
 
 
पवारांनी Sharad Pawar आयुष्यात सारे कमावले, पण पंतप्रधान व्हायची त्यांची महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिली. राजीव गांधी यांच्या निधनानंतर पवारांनी पंतप्रधानपदालाच धडक मारली होती; पण उडी कमी पडली. दिल्लीच्या राजकारणात टिकले असते तर आज चित्र वेगळे असते. पण त्यांचाही जीव मुंबईतच घुटमळत राहिला. दिल्लीत बसून ते सुधाकरराव नाईकांची रेकी करीत बसले. त्यामुळे त्यांचे पार्सल परत राज्यात आले. आता तीन राज्यांत निवडणूक लढण्याची घोषणा पवारांनी Sharad Pawar केली तेव्हा सारा इतिहास आठवला. काहीही आणि कसेही करून पवारांना मैदानात राहायचे आहे. कधीतरी आपलीही लॉटरी लागेल, असे त्यांना वाटते. बारामतीचा हा पक्ष उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडीत लढणार. गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस आणि तृणमूलसोबत बोलणी सुरू आहेत. म्हणजे इथेही सर्कस! कधी ममतांना जवळ करायचे तर कधी अखिलेशला. मग राहुल गांधींचे काय? महाआघाडीतले मित्रपक्ष राज्याबाहेर पवारांना विचारत नाहीत, हे पुन्हा एकदा दिसले. पण उत्तरप्रदेशचा निकाल पवारांनी कालच जाहीर करून टाकला. काका युपीला निघाले. पंतप्रधानपदाचा मार्ग युपीमधून जातो, असे म्हणतात. त्या हिशोबाने ते इकडे जात असावेत. पण इकडे शिवसेनाही लढते आहे. म्हणजे महाराष्ट्रात आघाडी आणि तिकडे बिघाडी? शिवसेना यूपीएमध्ये जाणार होती; त्याचे काय झाले? ‘काँग्रेस घेईना, आघाडीत राष्ट्रवादी इज्जत देईना’ अशी शिवसेनेची अवस्था आहे, पण गप्पा मात्र सह्याद्री आणि हिमालयाच्या...! 
 
- 9850304123
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)