यशोमतींनी पंतप्रधान मोदींचे आभार मानावे

माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा सल्ला
जलजीवनसाठी केंद्राकडून भरीव निधी

    दिनांक :14-Jan-2022
|
तभा वृत्तसेवा
अमरावती,
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर जलजीवन मिशनचा 300 कोटी रुपये निधी आणल्याचा डांगोरा पिटत आहे; परंतु 2019 पासून जलजीवन मिशनची स्थापना करून महाराष्ट्राला 7064 कोटी रुपये देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानायला यशोमती ठाकूर विसरल्या. कृतघ्नपणा सोडून गोरगरीब जनतेपर्यंत थेट नळाद्वारे देशभरात 8 कोटी कुटुंबांना पाणी देण्यार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद द्यावेत, असा सल्ला डॉ. अनिल बोंडे यांनी दिला.
 
Yashomati
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून अर्थसंकल्पातील केंद्राचा हिस्सा राज्यासाठी चार पटीने वाढवला आहे. 2020-21 मध्ये महाराष्ट्राला देण्यात आलेला निधी 1,829 कोटी रुपये होता, तो वाढवून 7,064 कोटी रुपये करण्यात आला आहे. 2021-22 मध्ये 2,584 कोटी रुपये महाराष्ट्राला 15 व्या वित्त आयोगाचे अनुदान म्हणून देण्यात आले आहेत. 2025-26 पर्यंत पुढील पाच वर्षासाठी 13,628 कोटी रुपयांचा निश्चित निधी उपलब्ध आहे. सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रामध्ये पिण्यासाठी, मध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी, हात धुण्यासाठी आणि शौचालयात वापरण्यासाठी नळाच्या पाण्याची सुनिश्चिती करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आजपर्यंत महाराष्ट्रातील 71,062 शाळा आणि 71,386 अंगणवाडी केंद्रांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.
 
 
महाराष्ट्रात एकूण 1.42 कोटी ग्रामीण कुटुंबापैकी 95.52 लाख कुटुंबाना 15 ऑगस्ट 2019 रोजी नळाचे पाणी उपलब्ध होते. गेल्या 26 महिन्यात 47.08 लाख कुटुंबांना जलजीवनमधून नळाच्या पाण्याचे कनेक्शन देण्यात आले. जल जीवन मिशन विकेंद्रित पद्धतीने अंमलात आणली जाते, ज्यामध्ये स्थानिक ग्राम समुदाय नियोजनापासून ते अमलबजावणीपर्यंत आणि व्यवस्थापनापासून संचालन आणि देखभाल करण्यापर्यंत महत्वाची भूमिका बजावते. सार्वजनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून, देशातील 2,000 हून अधिक पाणी गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा सर्वसामन्यांसाठी खुल्या करण्यात आल्या, जेणेकरून त्यांना त्यांच्या पाण्याच्या नमुन्यांची चाचणी नाममात्र किमतीत करता येईल.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7,064 कोटी रुपये वाढवून दिल्यामुळे अमरावतीला 300 कोटी मिळाले. त्यामुळे 300 कोटी आणल्याचा डांगोरा पिटू नये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यशोमती ठाकूर यांनी आभार मानायला हवे असे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.