कैलास ठोळे सीमेवर तणाव;तरी व्यापारात वाढ!

    दिनांक :02-Jan-2022
|
Indo-China भारत आणि चीनदरम्यानची स्पर्धा आणि तणावाची माहिती असताना आणि चीन कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नसताना भारत आणि चीनमधला व्यापार मात्र वाढत आहे. गलवान खोर्‍यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या चकमकीत दोन्ही देशांच्या सैनिकांचा बळी गेला. या भागातला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान दीड डझनहून अधिक बैठका झाल्या; परंतु त्याची फलनिष्पत्ती अजून तरी समजलेली नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये भारताच्या हद्दीत चीनने एक गाव वसवल्याचं उघड झालं. त्यानंतर डोकलाम खोर्‍यात भारताला शह देण्यासाठी चीनने भूतानशी करार केला. चीनचा नवा सीमा सुरक्षा कायदा भारताच्या संरक्षण व्यवस्थेसाठी अडचणीचा आहे. एकीकडे या घडामोडी पाहायला मिळत असताना चीनही कोरोनामुळे आर्थिक संकटातून जात होता. जगाने चीनवर बहिष्कार घातला आहे. दुसरीकडे भारत क्वाड परिषदेत सहभागी झाल्यानं ड्रॅगननं मध्यंतरी थयथयाट केला. भारतीय व्यापार्‍यांनी चीनच्या मालावर बहिष्काराची भाषा वापरली. कथित राष्ट्रप्रेमींनी चिनी माल घेणार नाही, अशा भीष्मप्रतिज्ञा केल्या. भारताने चिनी Indo-China कंपन्यांच्या गुंतवणुकीवर काही मर्यादा घातल्या. सरकारला पूर्वकल्पना दिल्याशिवाय गुंतवणूक करता येणार नाही, असा नियम केला. चिनी कंपन्यांची काही कंत्राटं रद्द केली. काही चिनी कंपन्यांवर छापे घातले. या पृष्ठभूमीवर दोन्ही देशांमधला व्यापार-उदीम कमी व्हायला हवा होता. त्यातच कोरोना तसंच चीनमधील आर्थिक परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळेही व्यापारावर परिणाम व्हायला हवा होता; परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. संबंधांमध्ये मोठी कटूता पाहायला मिळत असतानाच Indo-China दोन्ही देशांमधले व्यापारी संबंध मात्र घट्ट होत असल्याचं दिसून येत आहे.
 
 
india-china-trade
 
सरत्या वर्षात भारत आणि चीनमधल्या Indo-China द्विपक्षीय व्यापाराने शंभर अब्ज डॉलर्सचा आकडा ओलांडला; परंतु दोन्ही बाजूंनी याबद्दल फारसं बोललं जात नाही. कारण पूर्व लडाखमधल्या लष्करी संघर्षापासून दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अतिशय नाजूक टप्प्यातून जात आहेत. 2001 मध्ये 1.83 अब्ज डॉलरपासून सुरू झालेला हा द्विपक्षीय व्यापार या वर्षाच्या 11 महिन्यांमध्ये शंभर अब्ज डॉलर इतका वाढला. चीनच्या सामान्य प्रशासनाच्या कस्टम्सच्या आकडेवारीनुसार, भारत-चीन द्विपक्षीय व्यापार 114.263 अब्ज डॉलर इतका झाला आहे, जो जानेवारी ते नोव्हेंबर 2021 दरम्यान 46.4 टक्क्यांनी वाढला आहे. भारताची चीनमधली Indo-China निर्यात 26.358 अब्ज डॉलर झाली आहे. निर्यातीत 38.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर चीनमधून भारताला होत असलेली आयात 87.905 अब्ज डॉलर झाली आहे. म्हणजे ती 49 टक्क्यांनी वाढली आहे.
 
 
एकीकडे द्विपक्षीय व्यापाराने शंभर अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे तर दुसरीकडे भारताची व्यापारी तूटही या 11 महिन्यांमध्ये झपाट्यानं वाढली. व्यापार तूट म्हणजे भारतानं चीनला निर्यात केलेल्या वस्तूपेक्षा आयात केलेल्या वस्तूंचं वाढलेलं प्रमाण. भारतासाठी व्यापार तूट ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ती 61.547 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. त्यात यंदा 53.49 टक्के वाढ झाली आहे. संरक्षण विश्लेषक ब्रह्मा चेलानी यांनी या व्यवसायवाढीपुढे प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनकडून सीमा रेषेच्या उल्लंघनाच्या पृष्ठभूमीवर मोदी सरकार 2021 मध्ये चीनसोबतच्या व्यापारात 50 टक्के वाढ कशी करते, असा त्यांचा सवाल आहे. 5 मे 2020 रोजी भारत आणि चीनमध्ये Indo-China लष्करी संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर पँगाँग तलाव परिसरात दोघांमध्ये हिंसक संघर्ष झाला आणि दोन्ही देशांचे अनेक सैनिक मारले गेले. हळूहळू दोन्ही देशांनी आपापल्या भागात हजारो सैनिक आणि अवजड शस्त्रं तैनात केली. अनेक प्रकारच्या लष्करी आणि राजनैतिक चर्चेनंतर, दोन्ही बाजूंनी फेब्रुवारी 2021 मध्ये पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडे आणि ऑगस्टमध्ये गोगरा भागात माघार घ्यायला सुरुवात केली.
 
 
31 जुलै रोजी दोन्ही बाजूंमध्ये चर्चेची बारावी फेरी पार पडली. काही दिवसांनंतर, दोन्ही देशाच्या सैन्याने गोगरा इथे चर्चेची प्रक्रिया पूर्ण केली होती. प्रदेशात शांतता आणि संयम पुनर्संचयित करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं. ज्या अंतर्गत दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि सर्वोच्च लष्करी कमांडर संपर्कात राहिले आणि तणाव नियंत्रित केला गेला. लडाखमधल्या वादामुळे व्यापार वगळता इतर सर्व संबंध ठप्प झाले होते. या वर्षी नोव्हेंबरमध्ये सिंगापूरमध्ये एका पॅनल चर्चेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की, भारत आणि चीन आपल्या संबंधांमधल्या अगदीच वाईट टप्प्यामधून जात आहेत. कारण चीनने अनेक करारांचं उल्लंघन केलं आहे. भारत आणि चीनच्या नात्यात अनेक शक्यता आणि आव्हानं आहेत. गेल्या वर्षीही काही आव्हानं होती. पूर्व लडाखमधल्या वादानंतर दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला आणि दोन्ही उपक्रम अयशस्वी झाले. Indo-China दोन्ही देशांमधल्या संबंधांवर चीनच्या दृष्टिकोनाच्या विषयावर वांग यांनी मिस्री यांच्या भेटीदरम्यान सांगितलं होतं की, परस्पर संबंधांशिवाय दोन्ही बाजूंना एकत्र आणणं खूप कठीण आहे.
 
 
भारत आणि चीनमधला Indo-China व्यापार सरत्या वर्षी विक्रमी पातळीवर पोहोचला. 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दोन्ही देशांमध्ये एकूण 8.57 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला; जो मागील पूर्ण वर्षाच्या तुलनेत 46.4 टक्के अधिक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या 11 महिन्यांमध्ये भारताने चीनकडून 6.59 लाख कोटी रुपयांचा माल आयात केला. त्याचबरोबर चीनने भारताकडून एकूण 1 लाख 98 हजार कोटी रुपयांच्या वस्तू आयात केल्या. भारताची व्यापार तूट वाढून 4.61 लाख कोटी रुपये झाली आहे. ती आतापर्यंतची सर्वाधिक आहे. दोन्ही देशांमधल्या विक्रमी व्यापाराचा हा आकडा जगाला चकित करणारा आहे. गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंना 50-50 हजारांहून अधिक सैनिक तैनात आहेत. ही संख्या 1962 च्या युद्धानंतरची सर्वाधिक आहे. भारतासोबतच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून 2021 हे वर्ष चीनसाठी खूप चांगलं आहे. सीमावादावर कमांडर स्तरावरील बारावी चर्चा अयशस्वी होऊनही दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात समन्वय अबाधित आहे. चीन सरकारने जारी केलेल्या व्यापार आकडेवारीनुसार, भारतासोबतच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून 2021 हे वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. 2020 मध्ये चीनचा भारताशी Indo-China व्यापार 6 लाख 60 हजार कोटी रुपयांचा होता. यापैकी सुमारे 50.28 अब्ज डॉलरची चीनमधून भारतात आयात करण्यात आली.
 
 
या अगोदर 2019 मध्ये भारताने चीनकडून Indo-China सर्वाधिक विद्युत यंत्रसामग्री आणि उपकरणं (20.17 अब्ज डॉलर) आयात केली. याशिवाय 8.39 अब्ज डॉलरची सेंद्रिय रसायनं, 1.67 अब्ज डॉलरची खतं ही भारतातली सर्वोच्च आयात होती. 2014-15 ते 2019-20 या वर्षांदरम्यान झालेल्या व्यापार डाटावरून दिसून येतं की, भारत कमी मूल्याच्या कच्च्या मालाची निर्यात करतो तर उच्च मूल्याच्या उत्पादन वस्तूंची आयात करतो. भारत चीनला Indo-China लोहखनिज आणि पेट्रोलियम इंधनाची निर्यात करतो. भारतातून चीनला Indo-China होणार्‍या निर्यातीत प्रामुख्याने लोहखनिज, पेट्रोलियम इंधन, सेंद्रिय रसायनं, शुद्ध तांबं, सुती धागे यांचा समावेश होतो. याशिवाय निर्यात होणार्‍या खाद्यपदार्थांमध्ये मासे आणि सीफूड, काळी मिरी, वनस्पती तेल, चरबी इत्यादी पदार्थ प्रमुख आहेत. ग्रॅनाईट ब्लॉक्स आणि इतर बांधकाम दगड आणि कच्चा कापूसदेखील निर्यात केला गेला. चीनमधून भारतात आयात करण्यात आलेल्या प्रमुख वस्तू म्हणजे स्वयंचलित डाटा प्रोसेसिंग मशीन आणि युनिट्स, टेलिफोन उपकरणं आणि व्हिडिओ फोन, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, ट्रान्झिस्टर आणि सेमीकंडक्टर उपकरणं, प्रतिजैविकं, खतं, ध्वनी रेकॉर्डिंग उपकरणं आणि टीव्ही कॅमेरा, ऑटो घटक आणि अ‍ॅक्सेसरीज आणि प्रकल्प वस्तूंचा समावेश आहे. भारत आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर तयार उत्पादनं आयात करतो. इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर मार्केटमध्ये चीनचं वर्चस्व आहे. म्हणजेच शत्रुत्वाची, विरोधाची धार तेज असताना आणि दोन्ही देश सीमांवर एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नामध्ये असताना व्यापारातल्या वाढीबाबत मात्र सजग आहेत.
(लेखक आर्थिक घडामोडींचे जाणकार आहेत.)
••